ग्लोबल वॉर्मिंग : धोक्याचा इशारा

ग्लोबल वॉर्मिंगच्या विषयावर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. आता या चिंतेत अजूनच भर पडली आहे. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने भविष्यात जाणवणार्‍या दुष्परिणामांचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’ (आयपीसीसी)चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ - दी फिजिकल सायन्स बेसिस’ च्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. भारताला येत्या काही काळात तीव्र चक्रीवादळांचा फटका बसणार आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार पूर येऊ शकतील, हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये हिमकडे कोसळू शकतील आणि त्या सगळ्याच्या परिणामी सागरातल्या पाण्याची पातळी वाढण्याचा धोका आहे, असे अहवालात म्हटले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान व त्याचे जागतिक दुष्परिणाम यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदलाबाबतच्या समितीने जगभरातील २३४ शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून हा जवळपास तीन हजार पानी अहवाल तयार केला आहे. या अहवालातील निष्कर्ष हे अत्यंत धक्कादायक व चिंतनीय असून, त्यावर ऊहापोह होणे गरजेचे आहे.



पृथ्वीची तापमानवाढ ही मानवासाठी धोक्याची घंटा 

अलीकडच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, दरडी - हिमकडे कोसळणे यासारख्या घटना वाढत चालल्या आहे. मानवी कृत्यांमुळेच हवामानबदल, तापमानवाढ हे दुष्परिणाम घडत आहेत, यात कोणतीच शंका नाही. मानवी हस्तक्षेपामुळे १९७० पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्या गोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली. १९९०च्या दशकापासून आक्रि्टक समुद्रातील बर्फाळ भागात ४० टक्के घट झाली, तर १९५०पासून वसंत ऋतुतील बर्फावरण घटले आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधले आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चालला आहे. ही तापमानवाढ सर्वत्र दिसणार आहे. तुम्हाला कुठेही सुरक्षित ठिकाण नसेल. कुठेही पळण्यास किंवा लपण्यासही जागा नाही. पृथ्वीची तापमानवाढ ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे, असेही अहवालात अधोरेखित केले आहे. यामुळे ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न आता आणखी जटिल होण्याची चिन्हे आहेत. हिंदी महासागराच्या प्रदेशाचे तापमान वेगाने वाढत आहे. त्याचाच अर्थ असा, की त्या भागात सागरी पातळीही वाढणार आहे. समुद्र पातळीत वारंवार वाढ होत राहिली, तर त्यातून सखल किनारपट्टी भागात पूरस्थिती निर्माण होईल. तसेच किनारपट्टीची धूपही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याशिवाय उष्णतेच्या लाटा तीत्र होणे, अतिवृष्टी, हिमनद्यांचे वितळणे यासारख्या आव्हानांशी भारतासारख्या देशाला सतत मुकाबला करावा लागेल. अतिवृष्टी व त्यातून निर्माण होणार्‍या पूरस्थितीचा अनुभव भारतासारख्या देशासाठी नवीन नाही. ढगफुटीसदृश पाऊस, अतिवृष्टीमुळे आलेले पूर, दरडी कोसळणे अशा घटना सध्या वारंवार घडताना पहायला मिळत आहेत. वाशिष्ठी नदीच्या किनार्‍यावरील चिपळूण पाण्यात बुडणे असो वा कोल्हापूर, सांगलीसारख्या शहरांना पुराने वेढणे असो. निसर्ग किती रौद्र होऊ शकतो, याचीच ही उदाहरणे. तिकडे चीन, बेल्जिअम, जर्मनीतही अशीच पूरस्थिती बघायला मिळाली. या सार्‍यामागे हवामान बदल वा ग्लोबल वार्मिंग हा घटक प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे दिसून येते. हवामान बदलाची वा तापमानवाढीची ही प्रक्रिया काही नैसर्गिक नव्हे. तर त्यामागे मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोड करून रस्ते, पूल उभारणे, डोंगर फोडून बोगदे काढणे म्हणजेच केवळ विकास का, याचा कुठेतरी विचार व्हावा. 

पर्यावरणाचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची हीच वेळ

कोणत्याही देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते. केरळ, कोकणपासून, उत्तराखंडपर्यंत हेच पहायला मिळते. त्यात वाढते औद्योगिकीकरण, कार्बन वायू उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण आदी घटक तापमानवाढीस कारणीभूत ठरताना दिसतात. त्यात नदीपात्रात केली गेलेली अवैध बांधकामे, नैसर्गिक ओढ्या-नाल्यांचे प्रवाह संकुचित करणे या गोष्टी पूरस्थितीत भर घालतात. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची कास धरल्याशिवाय मानवी जीवन पुढे जाऊ शकत नाही, हे खरेच. परंतु, विकासाची नेमकी व्याख्या काय, हेही ठरवायला हवे. देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते. याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपणच कारणीभूत आहोत. कारण आपण जितकी जीवाश्म इंधने जाळतो, तितक्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड इत्यादी हरितगृह वायू निर्माण होतात. पृथ्वीच्या सभोवताली असणार्‍या वातावरणातील तपांबर आणि स्थितांबरात या वायूचे दाट आवरण बनते. पूर्वीच्या काळी सूर्यापासून येणारी उत्सर्जित उष्णता काही प्रमाणात परावर्तित होऊन, या वातावरणाच्या थरांतून बाहेर फेकली जात होती; त्यामुळे पृथ्वी इतकी तापत नव्हती. आता या हरितगृह वायूंचे जाड पांघरूण ही उष्णता बाहेर पडू देत नाही. त्याउलट याच वायूंच्या आवरणाला आदळून ती पुन्हा परावर्तित होऊन पृथ्वीपर्यंत पोहोचते. यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढीव तापमानामुळे पृथ्वीच्या एकूणच नैसर्गिक प्रक्रिया बदलत चालल्या आहेत. यात ध्रुवीय बर्फाचे वितळणे, महासागरात कमी दाबाचे पट्टे तयार होणे, समुद्रातील प्रवाह बदलणे, मान्सूनच्या नियमिततेत फरक पडणे या आणि अशा अनेक गोष्टी परिणामस्वरूप घडत आहेत. पुढच्या टप्प्यात उष्णता वाढण्याबरोबरच थंडीचे प्रमाण कमी होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय हरित वायू उत्सर्जनाचे प्रमाण न घटल्यास जागतिक तापमानवाढ १.५ डिग्री किंवा २ डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे कठीण जाऊ शकते. २ डिग्रीमध्ये वणवे लागून जंगलेच्या जंगले खाक होतील. त्यातून झाडे, पशू, पक्षी अशी निसर्गाची साखळीच नष्ट झाली, तर ही हानी किती मोठी असू शकते, याची कल्पना करता येईल. म्हणूनच पर्यावरणाचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची हीच वेळ आहे.

Post a Comment

Designed By Blogger