तिसर्‍या लाटेला आमंत्रण नको

राज्यात १५ ऑगस्टपासून दुकाने, उपाहारगृहे आणि मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यासाठी जनमताचा रेटा वाढला होता. लसीकरण पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. अखेर रेल्वे, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स आदी सुरू करून अर्थचक्र अधिक गतिमान करण्याबरोबरच राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र हे करतांना यापुढे राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. दुसर्‍या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवण्यात आला आहे. भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका बसला महाराष्ट्राला. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. आता महाराष्ट्रात ऑक्टोंबरमध्ये तिसरी लाट येवू शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करतांना राज्य सरकारने संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे.



तिसर्‍या लाटेत राज्यात ६० लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची भीती

राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होतांना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ दिवसांपूर्वी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिली होती. मात्र हॉटेल्स, मॉल्ससह अनेक दुकाने रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याची मागणी सातत्याने होत होती. पुणे व कोल्हापूरसह अनेक ठिकाणी व्यापार्‍यांनी आक्रमक भुमिका देखील घेतली होती. गत दीड वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात भरडल्या गेल्यामुळे त्यांची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. लॉकडाऊनचा फटका बसल्याने व्यापारउदिम बुडाला असून आता व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यभरात लाखो लोकांचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. त्यातच महागाईचा कहर झाला आहे. हातावर पोट असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना आता निर्बंध नकोत, असाच व्यापक सूर व्यक्त होता. जनरेट्यापुढे नमते घेत राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापार्‍यांसह सर्वसमान्यांना दिलासा मिळाला असला तरी, याकाळात आपली बेफकरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी ठरु शकते, याचे भान प्रत्येकाला ठेवावेच लागणार आहे. कारोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी देशात तिसर्‍या लाटेला सुरुवात झाली आहे. याचा मोठा प्रभाव केरळमध्ये दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात करोना ४१,१९५ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा ४० हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद ही धोक्याचीच घंटा आहे. अमेरिका व युरोपमध्येही तिसरी लाट झपाट्याने वाढत आहे. यामुळे ती येत्या काही दिवसात महाराष्ट्रात धडक देईलच! राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत भाष्य करतांना तिसर्‍या लाटेत राज्यात ६० लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची भीती वर्तविली आहे. 

 राज्य सरकारनेही नेहमीचे धरसोड धोरण सोडण्याची आवश्यक

तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखणे अशक्य असल्याचे वक्तव्य केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे. चिंता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारतात कोरोनाचे जे म्युटेशन सापडले आणि ज्याचा दुसरी लाट येण्यात मुख्यत्वे हात होता त्या व्हेरियंटला डब्लूएचओने डेल्टा व्हेरियंट असे नाव दिले आहे. पण आता त्या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाले आणि डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. म्हणजे म्युटेशनमध्ये म्युटेशन. हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी राज्यभरात तयारी सुरू झाली आहे. मात्र याचवेळी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आधीच बाजारपेठांमधील गर्दीबाबत चिंता व्यक्त होत असतांना आता तर सर्व रान मोकळे झाले आहे. येत्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळेल, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल, लोकांना मास्क वापरण्याचाही विसर पडेल आणि कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रण मिळेल! आधीच लसीकरण कासवाच्या गतीने पुढे सरकत आहे. लोकल प्रवासासह अनेक ठिकाणी दोन लसी घेतल्याचे बंधन टाकण्यात आल्यानंतर मुंबईत लसीकरण केंद्रांवर उसळलेल्या गर्दीचे चित्र काळजात धस्स करणारे आहे. तिसरी लाट टाळायची असेल तर सर्वप्रथम लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल, यासाठी केंद्र सरकारने राज्याला मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. व्यापार्‍यांनीही दुकानात, मॉल्समध्ये गर्दी टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क अनिवार्य करणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याने याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढली कि ऑक्सिजनची मागणी प्रतिदिन ७०० मेट्रिक टनच्या वर पोहचेल व राज्य सरकार पुन्हा शटर डाऊन करेल! जर हे होवू द्यायचे नसेल तर बेफकरी सोडून स्वयंशिस्तीचे पालन प्रत्येकाला करावेच लागणार आहे. वर्ष दीड वर्षापासून व्यापार व व्यवसाय बंद असल्याने अनेकजण आर्थिक संकटात आहे, हे जरी सत्य असले तरी आता ज्या अटी शर्थींवर बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होण्याची आवश्यकता आहे. जर कोरोना पुन्हा वाढला तर पुन्हा एकदा सर्व दुकाने, कार्यालये बंद करण्याची वेळ येईल, याचे भान सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. याकाळात राज्य सरकारनेही नेहमीचे धरसोड धोरण आतातरी सोडण्याची आवश्यक आहे.


Post a Comment

Designed By Blogger