खरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार?

निवडणुकीमध्ये जय - पराजय होतच असतात यावर विश्वास ठेवून पुनश्च हरि ओम् म्हणत सत्ताधार्‍यांविरुद्ध उभे राहण्याची धमक विरोधी पक्षांनी दाखवायची असते. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकीत धक्का बसलेले काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष २०१९च्या निवडणुकीनंतर पार कोमामध्ये गेले. सन २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत होत्याचे नव्हते झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली. दरम्यानच्या पाच-सहा वर्षात देशात ‘सबकुछ मोदी’ असे काहीसे चित्र निर्माण झाले. देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर सत्ताधार्‍यांबरोबरच विरोधी पक्षही सक्षम असणे आवश्यक असते. परंतू पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपवाद वगळता सर्वच विरोधक दिवसेंदिवस दुबळे होत चालले आहेत. सध्याच्या राजकीय पटलावार कुण्या एकट्या पक्षाकडून नरेेंद्र मोदींना टक्कर देणे शक्य वाटत नाही. मोदींचा मुकाबला करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव सर्वच विरोधी पक्षांना झाल्याने मोदींविरोधात सर्वांची एकत्र मोट बांधण्याच्या दृष्टीने आश्वासक घडामोडी गत काही दिवसांपासून घडत असल्याने नवी दिल्लीतील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.भाजपाच्या पुर्ण फौजेला एकट्या ममता बॅनर्जी उरुन पुरुन निघाल्या

‘पेगॅसस’ प्रकरण व ममता बॅनर्जी यांचा पाच दिवसीय दिल्ली दौर्‍यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांचा आक्रमक बाणा दिसून आला. देशात पुढील निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, असे सांगत त्यांनी भविष्यातील वाटचालीबद्दल सुचक इशाराच दिला. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर देत, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. राजकारणात समीकरणे बदलत असतात. आता विरोधकांना एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. याचा अर्थ त्यांनी मोदी विरोधातील आश्वासक चेहरा बनण्यावर नकार दिलेला नाही, हे महत्वाचे ठरते. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रीय पातळीवर राजकीय वजन वाढले आहे. भाजप विरोधातील सर्वच राजकीय पक्ष त्यांच्याकडे नरेंद्र मोदींचा पर्याय म्हणून पाहतात. कारण बंगालची विधानसभा निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातही अनेक सभा घेत भाजपच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आम्ही २०० हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा अमित शहा यांच्याकडून केला जात होता. मात्र बंगालच्या मतदारांवर अजूनही ममतादीदींचीच जादू कायम असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. भाजपाच्या पुर्ण फौजेला एकट्या ममता बॅनर्जी उरुन पुरुन निघाल्या. यामुळे त्यांचे महत्व वाढले आहेममता बॅनर्जी यांनी मिळविलेल्या दैदिप्यमान यशामुळे काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांना भाजपा विरुध्द लढण्याचे बळ मिळाले आहे. याला निवडणूक रणणीतीकार प्रशांत किशोर यांची रणणीती देखील कारणीभूत आहे, हे मान्य करायलाच हवे. कारण बंगालमध्ये प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींसाठी काम पाहिल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. 

विरोधकांची एकजूट भाजपाची डोकंदूखी?

प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीनदा एकमेकांच्या भेटी घेतल्या. यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर. त्याआधी शरद पवारांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी देशातील भाजप विरोधी नेत्यांची बैठक घेतली. यावेळी तिसर्‍या आघाडीची चर्चा रंगली होती मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु झाली. या सर्व कड्या जोडून पाहिल्यातर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारीची पूर्व तयारी यात दिसून येते. नवी दिल्लीतील दुसरी ठळक घडामोड म्हणजे, ‘पेगॅसस’ प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी एकजुटीचे प्रदर्शन केले. देशातील सर्व विरोधी पक्ष ‘पेगॅसस’च्या मुद्दयावर एकत्र आले असून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसद भवनातील दालनात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, भाकप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स, आप, आययूएमएल, आरएसपी, केरळ काँग्रेस आणि व्हीसीके अशा १४ पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. नरेंद्र मोदींविरोधात होत असलेली विरोधकांची एकजूट भाजपाची डोकंदूखी ठरणारी आहे. या एकजूटीची दिशा काँग्रेसच्या भुमिकेवर अवलंबून आहे. काँग्रेसला २०१४ नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात ५० वर्षापेक्षा जास्त सत्ताकाळ भोगणार्‍या काँग्रेसची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. नेमकं काँग्रेसचे धोरण काय आहे? याबाबत कुणातही एकवाक्यता नसल्याने काँग्रेसची दिवसेंदिवस पिछेहाट होतांना दिसते. काँग्रेसने हे धरसोडीचे धोरण सोडण्याची आवश्यकता आहे. नरेंद्र मोदींसारख्या मुरब्बी राजकारण्याशी दोन हात करण्यासाठी ठोस रणणीती व त्यादृष्टीने तयारी असायला हवी परंतु ती नसल्याने काँग्रेस नेते भरकटात आणि त्याचा फायदा भाजपला होतो. दुसरे म्हणजे, तृणमुल काँग्रेस, शिवसेना,अकालीदल, बहुजन समाज पक्ष, अखिलेश यादव, जगन्नाथ रेड्डींची वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती, ओडिशातील नवीन पटनाईक यांचे पक्ष, कर्नाटकातील एच.डी.देवेगौडा यांचा पक्ष, हे सर्व पक्ष आज भाजपच्या विरोधात आहेत. पण ते युपीएचे घटक पक्ष नाहीत. हे सर्व पक्ष जो पर्यंत युपीए आघाडीत एकत्र येत नाहीत तो पर्यंत भाजप सरकारला समर्थ पर्याय उभारता येणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger