राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक शहरांमध्ये व्यापारीवर्ग आक्रमक झाला असून राज्य सरकारने निर्बंध शिथिल न केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा पवित्रा व्यापारी संघटनांनी घेतला आहे. गत दीड वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात भरडल्या गेल्यामुळे त्यांची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. मात्र एका सर्व्हेक्षणानुसार, ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत देशात तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत भाष्य करतांना तिसर्या लाटेत राज्यात ६० लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची भीती वर्तविली आहे. भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका बसला महाराष्ट्राला. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. यामुळे तिसर्या लाटेची शक्यताच काळजात धस्स करणारी आहे. यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करतांना राज्य सरकारने संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
म्युटेशनमध्ये म्युटेशन अत्यंत धोकादायक
राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकारने लादलेले निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार वैतागले असून हे निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना जनमानसात वाढीस लागत आहे. सातत्याने लॉकडाऊनचा फटका बसल्याने व्यापारउदिम बुडाला असून आता व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यभरात लाखो लोकांचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. त्यातच महागाईचा कहर झाला आहे. हातावर पोट असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना आता निर्बंध नकोत, असाच व्यापक सूर व्यक्त होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेने अमेरिकासह संपूर्ण युरोपमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशात हाहा:कार माजवला. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसत आहे. दुसर्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दुसर्या लाटेतील स्थिती पाहून केंद्रासह राज्याने तिसर्या लाटेची तयारी सुरु केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखणे अशक्य असल्याचे वक्तव्य केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच केले आहे. चिंता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारतात कोरोनाचे जे म्युटेशन सापडले आणि ज्याचा दुसरी लाट येण्यात मुख्यत्वे हात होता त्या व्हेरियंटला डब्लूएचओने डेल्टा व्हेरियंट असे नाव दिले आहे. पण आता त्या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाले आणि डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. म्हणजे म्युटेशनमध्ये म्युटेशन. हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. यामुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी राज्यभरात तयारी सुरू झाली आहे.
उसळणारी गर्दी तिसर्या लाटेला आमंत्रण देणारी
पहिल्या आणि दुसर्या लाट दरम्यान जे घडले, त्यावरून आपण काही शिकलो आहोत असे दिसत नाही. लोक पुन्हा एकत्र येऊ लागले आहेत, बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे, विशेष म्हणजे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येत आहे. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया करतांना पाच स्तर आखण्यात आले आहे. जेथे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहे तेथेही शनिवार व रविवार पूर्णपणे बंदचे आदेश आहेत. मात्र याच दोन दिवशी उसळणारी गर्दी तिसर्या लाटेला आमंत्रण देणारी आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा मंदावलेला वेग. भारतातील लसीकरण अभियानाचा उल्लेख जगातील सर्वात मोठी मोहिम म्हणून केला जात आहे. यामुळे जगभरातून याचे मोठे कौतुक केले जात असले तरी भारतात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आतापर्यंत ९ कोटी लोकांचे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. यातील एक कोटी नागरिक केवळ महाराष्ट्रातील आहेत. देशात सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. असे असले तरी तिसरी लाट देशाच्या व राज्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, हे विसरुन चालणार नाही. सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषावर निर्बंध आहेत. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लसीकरण झालेले आहे, या निकषावर निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. दोन्ही डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सूट देण्याचेही प्रस्तावित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचे सूतोवाच केले होते. याबाबत लवकरच निर्णय होईलच. वर्षभरापासून व्यापार व व्यवसाय बंद असल्याने अनेकजण आर्थिक संकटात आहे, हे जरी सत्य असले तरी आता ज्या अटी शर्थींवर बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होण्याची आवश्यकता आहे. जर कोरोना पुन्हा वाढला तर शनिवार - रविवार तर सोडाच मात्र अन्य दिवशीही दुकाने, कार्यालये उघडता येणार नाहीत, याचे भान सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. सरकारने देखील केवळ सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठ किंवा दबावाखाली निर्णय न घेता तिसर्या लाटेचा अंदाज व त्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली तयारीचा आढावा घेवूनच निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणेच शहणपणाचे ठरणार आहे.
Post a Comment