निसर्ग वारंवार का कोपतोय?

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांची दैन्यावस्था झाली आहे. बेळगावपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे इत्यादी जिल्ह्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर पावसाचा कहर सुरु आहे. पावसाचे संकट संपत नाही तोच अनेक ठिकाणी भुस्खलन होवून दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत ९०च्या वर जणांचा बळी गेला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. निसर्गाच्या रौद्र रूपाने गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटांशी दोन हात करणार्‍या माणसाच्या दु:ख सोसण्याच्या सहनशक्तीची, संकटाशी झुंजण्याच्या त्याच्या धैर्याची आणि अखेर जगण्यासाठी पुन्हा उभे राहण्याच्या त्याच्या धडपडीची जणू परीक्षाच घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील तळयी, पोलादपूर व खेड, सातारा जिल्ह्यातील आंबेधर येथील घटनांनी काही वर्षापूर्वीच्या माळीण दुर्घटनेच्या कटू आठवणी जागवल्या आहेत. मुंबईतील गोवंडी भागातील इमारत कोसळून तीन जण दगावल्याने मुंबईतील अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या सारख्या घटनांनी निसर्गाचा कोप वारंवार का होवू लागला आहे, यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.



सातत्याने प्रकोपाचे दर्शन घडवणे हा निसर्गाचा स्वभावधर्म नाही

आपल्या देशातील निसर्ग चक्राचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, दरवर्षी जून ते सप्टेंबर हे महिने अतिवृष्टी किंवा अनावृष्टी किंवा वादळवारे घेऊन येत असतात. अतिपाऊस झाल्यानंतर पुरामुळे बाधित होणारी राज्ये पंजाब, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, आसाम, गुजरात आणि ओरिसा ही आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षात निसर्गाच्या प्रकोपांना महाराष्ट्रालाही तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने प्रकोपाचे दर्शन घडवणे हा निसर्गाचा स्वभावधर्म नाही. पण विकासाच्या नावाखाली निसर्गाची प्रचंड प्रमाणात नासधूस केली जात आहे. या नासधुशीने निसर्गचक्र बिघडून कधी सुनामी, कधी महापूर, कधी दुष्काळ, कधी भूस्खलन तर कधी अशा प्रकारची चक्रीवादळे होत असल्याचे आपण पाहत आहोत. याबाबत वेळीच सावध झालो नाही, तर भविष्यात यापेक्षाही मोठे नैसर्गिक प्रकोप दिसतील आणि त्याला तोंड देणे आपल्याला अशक्य होईल, याची जाणीव आता हळूहळू सर्वांना होवू लागली आहे.  गेल्या आठवड्यात राज्यात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. त्याने दरडींचा कडेलोट केला आणि त्यात ९० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला. दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. राज्यातील आपत्तीत मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली आहे. ही मदत त्यांना निश्‍चितपणे उपयोगी ठरेल मात्र त्यांच्या जखमा भरतील का? याचे उत्तर नकारार्थकच मिळेल. 

सोईचे राजकारण बाजूला ठेवून धाडसी निर्णय घ्या

यासाठी भविष्यात अशा घटनांची पुनर्रावृत्ती टाळायची असेल तर आपण आतापर्यंत करत आलेल्या चुका टाळायला हव्यात. पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगर उतारावरील शेतीला, जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात येत आहे. या बाबींचा सह्याद्रीच्या नैसर्गिक स्वरूपावर परिणाम नक्कीच होतो. मात्र त्याचे हे एकमेव कारण नाही. महाराष्ट्राची मान्सूनच्या पावसाची वार्षिक सरासरी ६०० ते ७०० मिलीमीटर असताना एका दिवसात आठशे मिलीमीटर पावसाचे पाणी कोणती नदी वाहून घेत जाणार? नदी पात्रांसह अनेक नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अन्य मार्ग शोधावे लागतात व पाण्याने प्रवाह बदलला कि पुरासारख्या समस्या निर्माण होतात. दुसरे म्हणजे, नदीपात्रातील वाळू बेफाम उपसा करून गाळ भरला गेला आहे. याचाही विपरित परिणाम पाण्याच्या प्रवाहावर होतो. पुराला तोंड देण्यासाठी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुराचे पाणी नियंत्रित करण्यासाठी भिंती उभारणे आणि फ्लडगेटस् निर्माण करणे गरजेचे ठरेल. पूरप्रवण भागातील घरांचे वॉटरप्रूफिंग आवश्यक करावे लागेल. तसेच पुराच्या काळात लोकांना अन्यत्र हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्यक्रमही निश्चित करावे लागतींल. पुराची कल्पना देण्यासाठी फ्लड वॉर्निंग सिस्टीमही मजबूत करावी लागेल. घरांची बांधकामे करताना पूर पातळीपेक्षा उंच जागी घर बांधण्याची परवानगी द्यावी लागेल. तसेच नदीतील गाळ काढून नदीतून पाणी झपाट्याने वाहून जाईल अशी व्यवस्था करावी लागेल. हे करत असतांना सरकारला सोईचे राजकारण बाजूला ठेवून धाडसी निर्णय घ्यावे लागतील. 

...तर भविष्यात निसर्गाचा प्रकोप आणखीनच वाढत जाईल

जागतिक तापमानात झालेल्या वाढीमुळे मागच्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्याचे दिसून येते. आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत कितीही सक्षम झालो असलो तरी नैसर्गिक आपत्तींपुढे आपण हतबल झालो आहोत, हे यावरून लक्षात येईल. अशा प्रकारच्या सातत्याने येणार्‍या नैसर्गिक आपत्ती हे निसर्गाचे स्वाभाविक चक्र नाही. त्यास माणसाने निसर्गाची केलेली नासधूस कारणीभूत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात भारतासह जगाच्या पाठीवर अशा प्रकारची जी संकटे आली आहेत, ती निसर्गाच्या नासधुशीमुळेच आल्याचे तज्ज्ञ सांगतात. विकासाच्या नावाखाली निसर्गाचे शोषण करून आपण जे पर्यावरणीय असंतुलन निर्माण केले आहे ते माणसाला आणखी संकटात टाकू शकते. आपले पर्यावरण संतूलन हे केवळ ग्रीन दिवाळी, इकोफ्रेंडली होळी व पर्यावरण पुरक गणपती उत्सव इतक्यापुरताच मर्यादित आहे. कारण अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वयंसेवी संस्था याचाच डंका वाजवत स्वत:चा हेतू साध्य करुन घेतात आणि आपण केवळ फेसबूक, इन्स्टाग्रामवर लाईक मिळविण्यासाठी त्याचे ढोल बडवतो. या समस्या सोडवायच्या असतील तर निसर्गचक्र लक्षात घेऊन आपण आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामान्य नागरिकांपर्यंत निसर्गाचे रक्षण करण्याची जागृती करण्याचे काम व्हायला हवे. निसर्गाचे रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे, हा विचार प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबवायला हवा. असे काही उपाय योजले नाहीत तर भविष्यात निसर्गाचा प्रकोप आणखीनच वाढत जाईल.


Post a Comment

Designed By Blogger