आषाढी एकादशी आली की, सगळ्यांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. विठ्ठलाच्या भेटीची आतुरता भक्तांना वर्षभर लागून राहिलेली असते. ही आस पूर्ण करण्याचे काम आषाढीची वारी करते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे पंढरपूरला पायी जाण्याची वारीची परंपरा सलग दुसर्यावर्षी खंडित होणार आहे. म्हणजे वारकर्यांना जसे पांडूरंगाचे दर्शन घेता येणार नाही तशीच पांडूरंगालाही वारकर्यांची भेट घेता येणार नाही. भक्तांना जशी देवाच्या भेटीची ओढ असते अगदी तशीच देवालाही भक्तांना भेटायचे असते, त्यांची सुख, दुख: जाणून घ्यायची असतात. मात्र देवा पांडूरंगा यंदाही या कोरोनामुळे लाखों वारकर्यांची वारी चुकणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार खूप प्रयत्न करत आहेत. डॉक्टर्स, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्यांसह लाखों कोरोना योध्दे दररोज कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी दुसरी लाट, तिसरी लाट, डेल्टा, लॅम्बडा अशी बहुरुपी संकटांची मालिका संपायची नावं घेत नाहीये, यामुळे पांडूरंगा आता तूच वाचव रे देवा या संकटापासून...
यंदा केवळ मानाच्या दहा पालखी सोहळ्यास परवानगी
पंढरीची वारी हे एक वारकर्यांचे व्रत आहे व त्यात ते खंड पडू देत नाहीत. तशी वारीची ही प्रथा फार जुनी. ज्ञात परंपरा साधारण ७०० वर्षांची मानली जाते, पण संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचे आजोबा, माता पितासुद्धा पंढरीची वारी करीत होते असे उल्लेख नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सापडतात. यामुळे किमान हजार वर्षांपूर्वीची वारीची परंपरा असल्याचे मानले जाते. पंढरपूरच्या वारीची लाखो वारकरी प्रतीक्षा करत असतात. वर्षानुवर्षे अखंडपणे चालत आलेल्या या पायीवारीत गेल्यावर्षी कोरोनामुळे खंड पडला. निदान पुढच्या वर्षी तरी दर्शन होईल, अशी भोळी आशा वारकर्यांना होती मात्र यंदाही अनेकांची पंढरपूर वारी चुकणार आहे. २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून चार्तुमासारंभ देखील होत आहे. वारीनिमित्त चंद्रभागेच्या तिरी दरवर्षी भक्तिसागर उसळतो. मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने यंदा केवळ मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी दिली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकर्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
वारीने कर्मकांडाकडे आणि अंधश्रद्धेकडे जाणारा समाज थोपविला
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने यंदा आषाढी पायी वारीची मागणी करत काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र शासनाने खबरदारी म्हणून वारीसाठी येणार्या पालख्या, दिंड्यांना पंढरपूरमध्ये येण्यास बंदी घातली आहे. वारीच्या धर्तीवर एकही एसटी गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करू नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने संपूर्ण राज्यातील विभागांना दिले आहेत. काही भक्तगण वारकरी चोरट्या मार्गांनी पंढरपुरात दाखल होण्यासाठी प्रयत्न करतायेत, पांडूरंगाच्या भेटीची ओढच हे त्यांच्याकडून करवून घेत आहे मात्र वारीने कर्मकांडाकडे आणि अंधश्रद्धेकडे जाणारा समाज थोपविला. ही परंपरा यंदाही खंडित होणार नाही, याची काळजी आपण सर्व जण घेवूया. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय वास्तविक संतांच्या शिकवणीला आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला धरूनच आहे. या निर्णयाला अनुकूल भूमिका घेत वारकरी संप्रदायानेही आपली प्रगल्भता दाखवून दिली आहे. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म. सर्वांगीण आणि संपूर्ण संप्रदायाचा वारी हा प्राण. त्याचा तो पारिभाषिक शब्द आहे. विठ्ठलाची वारी करणारा वारीकर म्हणजेच वारकरी होय. वैष्णव संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता वारीतून स्पष्ट होते. ही परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. आताही वारकर्यांनी हेच त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.
तोच यातून मार्ग काढेल
एकीकडे महामारीच्या संकटामुळे आलेल्या मर्यादा तर दुसरीकडे पंढरीची ओढ! भक्तहृदयाची घालमेल सुरू असली तरी घरातून पांडूरंगाला कोरोनापासून वाचविण्यासाठी साकडं घालूया. सलग दुसर्या वर्षी पायी वारी नसल्याचे दुख: केवळ वारकर्यांनाच नाही. या वारीचे असंख्य घटक असतात. वारीत असंख्य तरुण, तरुणी, पत्रकार सहभागी होतात त्यांच्यामुळे ही वारी घरोघरी पोहचते. या वारीत मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी देखील विद्यार्थी येवू लागले आहेत. वारीतील लाखो लोकांचे नियोजन कसे होते? रोजचा स्वयंपाक, गाड्यांचे नियोजन, दिंडीचे नियोजन, टाळकरी, तुळशीवृंदावन घेऊन जाणार्या महिला, झेंडेकरी, चोपदार, रथ, दिंडीमध्ये म्हणावयाचे अभंग, काकडा, हरिपाठ असे खूप काही वारीत असते. या विषयवार काहींनी पीएच.डी सुद्धा केलेली आहे. या सगळ्यांनाही दु:ख आहेच. शिवाय पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर अवलंबून असते. वारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. मात्र यंदाची पंढरपूरचे अर्थचक्र बिघडणार आहे. मात्र म्हणतात ना, त्या परमेश्वराला सर्वांची काळजी असते. तोच आता यातून मार्ग काढेल. कारण भगवंतालाही आपल्या प्रिय भक्तांच्या भेटीची ओढ असतेच. तोसुद्धा त्याच्या भेटीसाठी उतावीळ असतो. यंदाही पांडुरंगाची प्रत्यक्षात भेट होणे शक्य नसले तरी त्यामुळे विठ्ठलाचे भक्त आणि वारकरी यांच्या भक्ती आणि ओढ यात जराही कमी नाही. यासाठी संत सावता माळी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असचा आहे. पंढरपुरास जाणार्या वारकर्यांची प्रेमाने सेवा करणारे संत सावता माळी महाराज कधी पंढरपुरास गेले नाहीत, परंतु श्रीविठ्ठल त्यांच्या हृदयात प्रकटले. आपणही जर अशी निस्सीम भक्ती करू, कर्तव्याचे चोख पालन करू आणि कोरोनाला रोखू ....
Post a Comment