मानवाला अगदी प्राचीन काळापासून अंतराळ विश्वाचे आकर्षण राहिले आहे. आज जगभरातील अंतराळ कार्यक्रम प्रारंभिक दशकांप्रमाणे रिमोट सेंन्सिंग, हवामान अंदाज आणि दूरसंचार उपग्रह यापुरताच सीमित राहिलेला नाही. त्यात आता टेलिव्हिजन आणि ब्रॉडबॅण्ड सेवा, अंतराळ विज्ञान, संशोधन, नेव्हिगेशन आणि सुरक्षाविषयक तंत्रज्ञान यांचाही समावेश झाला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे अंतराळ पर्यटन म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी मानव केवळ पर्यटनासाठी अंतराळात जाईल, असे कुणी म्हटले असते तर त्यावर कुणीच विश्वास ठेवला नसता मात्र व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिध्द उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी ११ जुलै २०२१ रोजी युनिटी २२ या अंतराळयान अवकाशात झेप घेतली. सुमारे ९० मिनिटे प्रवास करून हे यान सुखरूप पृथ्वीवर परत आले. या घटनेनंतर खासगी अंतराळ पर्यटनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले. बॅ्रन्सन यांच्यानंतर आता अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस येत्या २० जुलै रोजी जेफ बेजोस त्यांच्या भावासोबत अंतराळात जाणार आहे.
ब्रिटनचे अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांची अंतराळ सफर
मानवाने चंद्रावर पाऊले ठेवले असून आता मंगळावर जाण्याची तयारी सुरु आहे. अंतराळ मोहिम ही काही सोपी गोष्ट नाही. साध्या भाषेत हा प्रवास समजून घ्यायचा असल्यास विमानाचे उदाहरण पुरेसे ठरते. हजारो किलोमीटर उंच उडणारे कोणतेही विमान पृथ्वीच्या वातावरणार्पंत जाते. वातावरणाच्या पलीकडे जायचे माणसाचे स्वप्न ४ ऑक्टोबर १९५७ रोजी साकार झाले. रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ अंतराळात यशस्वीरीत्या पाठवून अंतराळ युगाचा प्रारंभ केला. त्यानंतर १२ एप्रिल १९६१ रोजी पहिला अंतराळवीर युरी गागरीन याने यशस्वी अंतराळ सफर केल्याने माणसाला अंतराळात पाठवून परत पृथ्वीवर आणण्याचे स्वप्न साकार झाले. यानंतर मानवाने अंतराळात अनेक सफरी केल्या मात्र या सर्व सफरी कोणत्या ना कोणत्या मोहिमांचा भाग होत्या. आतापर्यंत अंतराळात केवळ उपग्रह किंवा त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी यान सोडले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्पेस टुरिझम अर्थातच अंतराळ सफर नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये याची चर्चा घडवून आणण्याचे श्रेय प्रसिध्द उद्योजक व संशोधक इलॉन मस्क यांनाच जाते! अंतराळातील शोधमोहिमा राबवणे आणि मानवजातीच्या उज्वल भविष्याचे रक्षण करणे वा उज्वल भविष्य निर्माण करणे यासाठी इलॉन मस्क व त्यांची कंपनी स्पेस एक्स काम करत आहेत. मे २२, २०१२ रोजी, मस्क आणि त्याच्या स्पेसएक्सने इतिहास रचला कारण जगात पहिल्यादाच एखाद्या प्रायव्हेट कंपनीने अवकाशात मानवरहित रॉकेट यशस्वीरित्या पाठवले होते. मार्च २०१७ मध्ये, स्पेसएक्सने फाल्कन ९ रॉकेटचे यशस्वी चाचणी उड्डाण आणि लँडिंग केले. जे रॉकेट पुन्हा पुन्हा वापरता येणार होते. या यश संपादनामुळे स्पेसएक्ससाठी अजून यशाची दारे उघडली गेली आणि परवडणारा अवकाश प्रवास करण्याच स्वप्न आणि एक पाऊल जवळ आले. टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क गेल्या काही दिवसांपासून अंतराळ आणि मंगळावर जाण्यावरून चर्चेत होते. पण रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अंतराळात जाण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ब्रिटनचे अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांची व्हर्जिन गॅलेटिक ही अंतराळात व्यावसायिक उड्डाण करणारी पहिली कंपनी बनली आहे आणि त्यामुळे आता स्पेस टुरिझमचा नवा अध्याय सुरु झाला आहे. त्यांनी व्हीएसएस युनिटी या अंतराळ सफर घडविणार्या विमानातून प्रवास करत विक्रम रचला. व्हीएसएस युनिटी हे नाव प्रसिध्द अंतराळ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी दिले आहे.
जेफ बेजोस देखील अंतराळ सफरीच्या एक पाऊल मागे
व्हर्जिनचा अंतराळ प्रोजेक्ट २०१२ मध्ये सुरु झाला होता आणि त्यांच्या पहिल्या एंटरप्राइज स्पेसशिपने २०१४ मध्ये अवकाशात झेप घेतली पण हे उड्डाण स्पेस शिप क्रॅश झाल्याने अयशस्वी ठरले होते. त्यानंतर युनिटीवर काम सुरु झाले आणि २०१६ मध्ये त्याची यशस्वी चाचणी झाली. या विमानाचे डिझाईन आणि आकार एकदम वेगळा होता. २०१८ मध्ये युनिटीने प्रथम कंप्लीट सबअर्बिटल उड्डाण केले. त्यावेळी हे विमान पृथ्वीपासून ८० किमी वर अंतराळात जाऊन पोहोचले होते. नासाने ८० किमी ही अधिकृत सीमा म्हणून निश्चित केली आहे. वास्तविक पृथ्वी वायुमंडळाच्या ५४ किमी वर गेल्यावर अंतराळ सुरु होते. यामुळे ब्रॅन्सन यांची झेप निश्चितपणे खूप मोठीच आहे. या मोहिमेत ब्रॅन्सन त्यांच्यासोबत भारतीय वंशाची सिरीशा बांदला देखील होत्या. धोकादायक अशा अंतराळ प्रवासाला जाणारी भारतात जन्मलेली सिरीशा ही दुसरी महिला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर हे सिरीशाचे मूळ गाव. यापूर्वी दिवंगत अंतराळ शास्त्रज्ञ कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या, पण त्यांचा दुर्देवाने स्पेस शटल कोलंबियाच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. यामुळे कल्पना चावला यांचे स्वप्न शिरीशा यांनी पूर्ण केले आहे, असेच म्हणावे लागेल. ब्रॅन्सन यांच्या अंतराळ सफरीनंतर आता अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस देखील अंतराळ सफरीच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल मागे आहेत. बेजोस यांची स्वत:ची ब्लू ओरिजिन नावाची स्पेस एजन्सी आहे. ब्लू ओरिजिन कंपनीकडून पाठविण्यात येणार्या न्यू शेफर्ड या पहिल्या मानवसहित स्पेस फ्लाइटचा जेफ बेजोस हे एक हिस्सा असणार आहेत. अंतराळ पर्यटकांसाठी न्यू शेफर्ड यान २० जुलैला अंतराळात झेपावणार आहे. यात अमेझॉन संस्थापक जेफ बेझोससह त्यांचा भाऊ आणि काही पर्यटक असणार आहेत. यात कल्याणची संजल गावंडे या तरुणीचा देखील समावेश आहे. ही देखील भारतीयांसाठी मोठ्या आनंदाची व अभिमानाची बाब आहे. बॅ्रन्सन यांच्या सफरीप्रमाणे बेजोस यांचीही अंतराळ सफर यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. एकाच महिन्यात घडलेल्या या दोन घटकांमुळे अंतराळ पर्यटनामुळे अवकाशाची नवी दालने खूली होणार आहेत. या मोहिमांमुळे आतार्पंतच्या झालेल्या चुका शोधल्या जातील आणि दूरवरचे अंतराळ पर्यटन लवकरच सुरू होऊ शकेल, असा विश्वास आहे. सर्वसमान्यांच्या आवाक्यात हे अंतराळ पर्यटन नसले तरी भविष्यातील नव्या प्रवासाची पायाभरणी यामाध्यमातून होईल, हेच सत्य आहे.
Post a Comment