प्रशांत किशोरांचा नवा डाव

निवडणूक रणणीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीनदा एकमेकांच्या भेटी घेतल्या. यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर. त्याआधी शरद पवारांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी देशातील भाजप विरोधी नेत्यांची बैठक घेतली. यावेळी तिसर्‍या आघाडीची चर्चा रंगली होती मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावर आपल्या नेहमीच्या स्टाईलने पवारांनी ठोस भाष्य न केल्याने ही चर्चा चांगलीच रंगली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. यानंतर पुढील राष्ट्रपती कोण होणार याचे गणित सध्या लावले जात आहे. राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव प्रशांत किशोर यांच्याकडून प्रोजेक्ट केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवरच राजकीय पक्षांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरु झाला असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. यातून भाजप विरोधी पक्ष एकमेकांच्या अधिक जवळ येतील, अशीही अटकळ बांधली जात आहे. यामुळे प्रशांत किशोर यांचा अजेंडा कोणताही असला तरी त्याचा फायदाच होईल, असे एकंदरीत चित्र आहे.



पीके काँग्रेसला या निर्णायक लढाईसाठी तयार करु शकतील?

प्रशांत किशोर यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत भाजपा व नरेंद्र मोदी यांना विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. मोदींची साथ सोडल्यानंतर ते काही काळ जनता दल (यू) या पक्षात कार्यरत होते. मात्र सक्रिय राजकारणी बनण्यापेक्षा किंगमेकर बनण्यात त्यांना जास्त रस असल्याने ते पुन्हा आपल्या मुळ भुमिकेत परतले आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधान सभा निवडणुकांमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणणीतीकार म्हणून काम पाहिले. भाजप जर १०० आकड्यांच्या पार गेली तर निवडणूक रणनीति आखण्याचे काम सोडून देईल, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. भाजपने १०० च्या आतच डाव गुंडाळला आणि प्रशांत किशोर यांचा दावा कायम राहिला. यानंतर प्रशांत किशोर यांचे राजकीय वजन पुन्हा वाढले. आता प्रशांत किशोर हे अमरिंदर यांचे मुख्य सल्लागार आहेत आणि तेही अवघ्या एक रुपयांच्या पगारावर. पुढच्या वर्षी पंजाब निवडणुकाही आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उपस्थिती काँग्रेससाठी मोठ्या दिलासाची बाब आहे. प्रशांत किशोर यांनी वायएसआर काँग्रेस, जनता दल (यू), द्रमुक यांनाही निवडणूक रणनीती आखून दिली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार होते. मात्र ही युती निवडणूक जिंकू शकली नाही. प्रशांत यांना वाटत होते की, या निवडणुकीमध्ये चेहरा प्रियंका यांचा असावा, पण असे झाले नाही. त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. आता पुन्हा काँग्रेसच्या मदतीला प्रशांत किशोर धावून आले आहेत. प्रशांत किशोर मंगळवारी दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी झालेल्या बैठकीला प्रियंका गांधी यांच्यासह सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आल्याने ही बैठक केवळ पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणार्‍या निवडणुकांबद्दल नव्हती, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांविषयी होती. या शक्यतेला बळ मिळाले आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. काँग्रेसची प्लानिंग आहे की, पीके यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, अशीही अटकळ बांधली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका पक्षाला हवी आहे जेणेकरून पीके काँग्रेसला या निर्णायक लढाईसाठी तयार करु शकतील. 

प्रशांत किशोर यांच्याकडून पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी ?

दुसरीकडे यूपीच्या निवडणुकीसंदर्भात प्रियंका गांधीही सक्रिय झाल्या आहेत. यूपी निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका असू शकते आणि हे लक्षात घेऊन काँग्रेस आपला खेळ आराखडा तयार करत आहे अशी शक्यता नाकारता येणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आखत असलेली रणनीती व ज्या पक्षासाठी काम करतात त्याला मिळालेले यश या दोन्ही गोष्टींमुळे काही राजकीय पक्षांनी प्रशांत किशोर यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता भाजपला रोखण्यासाठी ते उपयोगी ठरतात का याची चाचपणी राहुल व प्रियांका गांधी यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेळा भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले हे अजुनही स्पष्टपणे समोर आलेले नाही. या भेटींमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. नंतर पवारांसोबत मिळून ममता बॅनर्जी काही तरी डाव रचणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावेळी तिसर्‍या आघाडीविषयी बरीच चर्चा झाली होती. मात्र स्वतः प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दोघांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाशिवाय तिसर्‍या आघाडीचे कोणतेही अस्तित्व नाही. या भेटी-गाठीनंतर आता मात्र प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१७ नंतर राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची ही पहिलीच भेट होती. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान कसे देणार हा मूळ मुद्दा असला तरी त्यात राष्ट्रपती पदावर सुद्धा चर्चा झाली असावी. कारण २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच रणणीती आखली जात आहे. यात भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इतर पक्षांसह बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांच्यासह अन्य नेत्यांना सोबत घेणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने प्रशांत किशोर यांनी बिगरभाजप पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेही टाळत आहेत. प्रशांत किशोर यांच्याकडून पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी केली जात आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे हे अद्याप स्पष्ट नाही. यामुळे प्रशांत किशोर नेमका कोणता डाव खेळण्याच्या तयारीत आहे? याचा अंदाज बांधणे थोडेसे कठीण आहे.


Post a Comment

Designed By Blogger