फुटबॉलचा थरार

फुटबॉल वर्ल्ड कप नंतर लोकप्रियतेत दुसर्‍या क्रमांकावरील युरो कप आणि तिसर्‍या क्रमांकावरील कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा १-० अशा पराभव केला. २८ वर्षानंतर अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयाचा जल्लोष संपत नाही तोच युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करून इटलीने दुसर्‍यांदा युरो चषकावर आपले नाव कोरले. तब्बल ५३ वर्षांच्या अंतराने इटलीने युरो चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा हा मान मिळवला. मात्र फुटबॉल पे्रमींमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती, अर्जेटीनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीची! मेस्सीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता. कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. अंतिम सामन्याचा निकाल लागल्यानंतर मेस्सी व प्रतिस्पर्धी संघाचा तुल्यबळ खेळाडू नेयमार यांच्यातील गळाभेटीनेही अनेकांचे डोळे ओले केले.मेसी विरुध्द नेयमार

भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी जगाच्या पाठीवर सर्वाधिक खेळला जाणारा म्हणून फुटबॉल या खेळाची ओळख आहे. यातही युरो कप आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची प्रचंड क्रेझ असते. १९१० पासून सुरु झालेली कोपा अमेरिका ही जगातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. साऊथ अमेरिका खंडातील या स्पर्धेत अर्जेंटीना, ब्राझिल, चीली, उरुग्वे, पेरुग्वे, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुलिया, बोलीव्हीया, पेरु हे देश सहभागी होतात. जशी आपल्याकडे क्रिकेटचा आशिया कप असतो तशीच ही स्पर्धा असते. आशिय कपमध्ये भारत-पाकिस्तान या देशांमधील सामना हायहोल्टेज सामना म्हणून ओळखला जातो तसाच हायहोल्टेज सामना कोपा अमेरिकेत अर्जेंटीना आणि ब्राझीलमध्ये होतो. अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते. त्यात दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू ही फुटबॉल जगतातील बेस्ट खेळाडू लिओनल मेस्सी आणि नेयमार असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. या सामन्याचे वर्णन मेसी विरुध्द नेयमार असेही केले गेले. दोघेही आपापल्या संघांचे हुकमी खेळाडू. एके काळी बार्सिलोना संघातून हे दोघेही एकत्र क्लब फुटबॉल खेळले असल्याने यंदा कोण बाजी मारतो याकडे जगभरातील फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागून होते या सामन्यात दोघांनाही प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूंनी निष्ठुरपणे रोखण्याची एकही संधी सोडली नाही. 

मेस्सी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

कोपा अमेरिका स्पर्धेचा इतिहास पाहता ब्राझील संघाचा पगडा अर्जेंटीनावर भारी राहिला आहे. २०१९ च्या सेमीफायनलमध्ये दोन्ही संघ आमने सामने असताना ब्राझीलने अर्जेंटीनावर २-० ने विजय मिळवला होता. ब्राझील आणि अर्जेंटीना आतापर्यंत तब्बल १११ वेळा फुटबॉलच्या मैदानावर एकमेंकाशी भिडले आहेत. ज्यात अर्जेंटीनाने ४६ सामने जिंकले आहेत. तर ब्राझीलने ४० सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच २५ सामने ड्रॉ देखील झाले आहेत. कोपा अमेरिका स्पर्धेचा विचार करता मागील ५ सामन्यांत ब्राझील अर्जेंटीनावर भारी असून पाचपैकी ब्राझीलने ४ तर अर्जेंटीनाने १ सामना जिंकला होता. पण यंदा अर्जेंटीनाने दिमाखात अंतिम सामना जिंकत खिताब आपल्या नावे केला. २८ वर्षानंतर अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यापुर्वी अर्जेंटिनाने १९९३ साली ही स्पर्धा जिंकली होती. १९९३ नंतर २०१५ आणि २०१६ साली झालेल्या स्पर्धेत अर्जेटिनाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यावेळी संघाचे नेतृत्व दिग्गज फुटबॉलपटु लियोनल मेस्सीने केले होते. मात्र यावर्षी अखेर मेस्सीचे स्वप्न पुर्ण झाले. मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच पहिल्यांदा मोठी स्पर्धा जिंकली आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिनाचा संघ २०१४च्या फीफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र जर्मनीकडून पराभूत झाल्याने मेस्सीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. मात्र आता प्रथमच मेस्सीने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. मेस्सी त्याच्या चेंडूबरोबर धावतानाच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. ड्रिबलिंग म्हणजे चेंडू बरोबर ठेवून आपल्या कौशल्याने खेळाडूंना चकवत वार्‍याच्या वेगाने अशक्यप्राय स्थितीमधून गोल मारणे ही मेस्सीची ओळख. संधी मिळाली तर डोक्याने गोल मारायलाही तो कधी चुकत नाही. याची प्रचिती या स्पर्धेतही आली. यामुळे मेस्सी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. 

५३ वर्षांच्या अंतराने युरो चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान

दुसरीकडे इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या युरो कप २०२० स्पर्धेत इटली, स्पेन, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्ससह २४ बलाढ्य संघांमधील लढतीत अंतिम सामन्यात इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करून इटलीने दुसर्‍यांदा युरो चषकावर आपले नाव कोरले. तब्बल ५३ वर्षांच्या अंतराने इटलीने युरो चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा हा मान मिळवला. युरो चषकाचा सामना अत्यंत अटी-तटीचा झाला. १२० मिनिटांपर्यंत सुरु राहिला. दोन्ही संघांकडून सामन्यात आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला. ज्यामध्ये इटलीने विजय मिळवला. इटलीने इंग्लंडचा ३-२ ने पराभव केला. इंग्लंड सलग ३ पेनल्टी स्कोर करु शकला नाही, तर इटलीने २ पेनल्टी चुकवल्या, मात्र ३ गोल डागले. याचसोबतच इटलीने १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनचा किताब पटकावला. या पराभवामुळे इंग्लंडचे पहिल्यावहिल्या युरो कप विजयाचे स्वप्न मात्र पुन्हा अधुरेच राहिले. इंग्लंडचा संघ गेल्या ५५ वर्षांपासून फुटबॉलचा कोणताही मोठा सामना जिंकू शकला नाही. या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे संपूण स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा २-१ ने धुव्वा उडवला. तर उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा ४-२ ने पराभव केला. दोन्ही स्पर्धांनी डोळ्यांची पारणे फेडली.

Post a Comment

Designed By Blogger