तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत अजूनही धुसपूस सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले यांनी लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर देखील अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला होता. यावर शरद पवार यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टाळत त्यांच्यासारख्या लहान माणसावर बोलणार नाही असे म्हणत पटोलेंना त्यांची जागा दाखवली. पटोलेंच्या भुमिकांमुळे महाविकास आघाडी पुन्हा एकदा बिघाडीच्या मार्गावर असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. भाजप-सेनेच्या युतीबाबत राज्यात चर्चा सुरु झाल्यानंतर काँग्रेसने घेतलेली अशी भुमिका ही भविष्यातील राजकीय स्पोटाची चिन्हे तर नाही ना?



आघाडीतील मित्रपक्षांवरच पहिला डाव

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झालेल्या नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत स्पोटक विधाने करत महाविकास आघाडीला धक्के देणे सुरुच ठेवले आहे. स्वबळावरील काँग्रेस हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. पक्षवाढीसाठी नेत्यांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बुस्टअप करण्यासाठी किंवा टाळ्या मिळविण्यासाठी अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करण्याची जूनी व सर्वपक्षिय परंपरा आहे. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत गलितगात्र झालेल्या काँग्रेसची स्थिती आता लपून राहिलेली नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. यामुळेच स्वत:ची तत्व, पक्ष धोरण गुंढाळून शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची वेळ काँग्रेसवर आली. भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, अशी भाषा ते करत असले तरी स्वत:चे अस्तित्व ठिकवणे यासाठीच हा सर्व खटाटोप आहे, हे काँग्रेसचे नेतेही खासगीत मान्य करतात. शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींचाही विरोध होता मात्र शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांनी सर्वांना एकत्रित आणले. मात्र सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून काँग्रसची नाराजी अधूनमधून उफाळून येत असते. आता पटोलेंच्या कार्यकाळात त्याचे प्रमाण जरा जास्तच वाढले आहे. नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेल्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा अधिकट तीव्र केला होता. मात्र, त्यांना दिल्ली दरबारी बोलवून त्यांना पक्षश्रेष्ठींकडून तूर्तास स्वबळाची ठिणगी नको असा सल्ला देण्यात आला. असे असले तरी आगामी महानगपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यात एकत्र असलेले तिन्ही पक्ष स्वबळाची जोरदार तयारी करत आहेत. गेली पावणे दोन वर्षे आपला देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. याही स्थितीत पक्षांचे राजकारण होवू नये असे सांगितले जात असले तरी एकमेकांवरील कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. यात सामान्यांचा जीव भरडला जातोय याची कोणत्याही पक्षाला चिंता नाही. भविष्यात भाजपला महाराष्ट्रासारखे एक महत्वाचे राज्य आपल्याकडे ठेवण्याचे लक्ष्य आहे. गेल्यावेळी केवळ चर्चेतील त्रुटींमुळे आणि काहीशा इगोमुळे हातची गेलेली सत्ता पुन्हा भविष्यात भाजपला गमवायची नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत ठिकठिकाणी कमळ फुलवण्याची रणनिती त्यांनी आखली आहे. याच कुरघोडींच्या खेळात काँग्रेस सर्वप्रथम आघाडीतील मित्रपक्षांवरच पहिला डाव टाकण्याच्या प्रयत्नात दिसतो. 

आघाडीला आव्हान देण्याची भाषा 

आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक अंतर्गत मदभेद चव्हाट्यावर आले. विधानसभा अध्यक्षपदावरुनही तिन्ही पक्षांचे खटके उडत आहेत. यातूनच नाना पटोले आणि भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा देत आघाडीला आव्हान देण्याची भाषा केली नाही ना? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळेच अलबेल आहे असे नाही. तिन्ही पक्ष आपले संघटन वाढवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करीत असल्याचे दिसून आले आहे. मात्र आता पटोलेंंनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविल्याने महाविकास आघाडीत नेमकं चाललयं काय? हेच कळत नाही. लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा, असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावर चहूबाजूने टीका सुरु झाल्यानंतर व पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यानंतर त्यांनी सावरासावर देखील केली. मी केंद्र सरकारबाबत बोलत होते, असा दावाही त्यांनी केला. मात्र ते नेमके कुणाला म्हणाले, हे न समजण्याइतकी जनता खुळी नाही. शरद पवारांनी ज्या शब्दात पटोेलेंची हवा काढून टाकली तेच खूप काही सांगून जाते. नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, या वाक्यातच खूप काही दडलेले आहे. शरद पवार कधीही विनाकारण वक्तव्य करणारे राजकारणी नाहीत, त्यांच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. महाविकास आघाडीची सध्याची अवस्था म्हणजे, तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना अशी झाली आहे.

Post a Comment

Designed By Blogger