दहशतवादी ड्रोन

भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असतात. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारख्या बड्या कारवायांनंतर देखील पाकिस्तान सुधारण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय किंवा पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षित केलेल्या दहशतवाद्यांच्या मदतीने सीमावर्ती भागात त्यांच्या कुरापती सुरुच असतात. दहशतवाद्यांकडील अत्याधुनिक शस्त्रांवर नेहमी चिंता व्यक्त केली जात आली आहे. आता तर दहशतवादी हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनच्या मदतीने जम्मूमधील एअरबेसवर रविवारी हल्ला झाल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी मिलिट्री स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. ड्रोनव्दारे दहशतवादी हल्ले करण्याचे तंत्र अत्यंत धोकादायक आहे. भारतीय सैन्य दलाच्या स्थळांवर झालेल्या शक्तीशाली स्फोटांमागे जैश-ए-मोहम्मद किंवा लष्करी-ए-तोयबा या संघटनांचा हात असण्याची शक्यता जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांच्या हाती हे घातक तंत्र लागणे ही भारतासाठी निश्चितच मोठी चिंतेची बाब आहे.छुप्या पद्धतीने काही ड्रोन भारतात 

जम्मूतील सतवारी हवाई तळावर रविवारी पहाटे ड्रोनद्वारे दोन स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा आता अधिकच सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी क्वॉडकॉपर ड्रोन्सद्वारे हवाई तळावर हल्ले केल्याचे समोर येत असतांनाच आता सोमवारी पुन्हा एकदा जम्मूच्या कालूचक मिलिट्री स्टेशनवर रविवारी पहाटे तीन वाजता ड्रोन दिसला. भारतीय लष्कर अलर्टवर होते. त्यामुळे ड्रोन दिसताच लष्काराकडून त्या ड्रोनवर २० ते २५ राऊंडची फायरिंग केली. फायरिंग करताच ड्रोन गायब झाले. जम्मूच्या एयरफोर्स स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी मोठा खुलासा झाला आहे. ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या या दहशतवादी हल्ल्यांचे खरे लक्ष्य हे एयर ट्रॅफिक कन्ट्रोल आणि एमआय-१७ हेलिकॉप्टर असल्याचे समोर आले आहे. पण हे लक्ष्य चुकल्याने वेगळ्याच ठिकाणी स्पोट झाले. एका ड्रोनमध्ये जवळपास पाच किलो विस्फोटक भरली होती तर दुसर्‍या ड्रोनमध्ये त्यापेक्षा थोड्या कमी वजनाची विस्फोटे भरली होती असेही तपासातून समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हिज्बुल मुजाहिदीनच्या मदतीने पाकिस्तानमधून भारतात छुप्या पद्धतीने काही ड्रोन आणल्याची कुणकुण सुरक्षा यंत्रणांना लागली होती. त्यावेळी ५ ते ६ किलो वजनाचा एक आयईडीदेखील पोलिसांनी जप्त केला होता. 

ड्रोनचा वापर करण्यात अमेरिकन सैन्य आघाडीवर

हवाई तळावर अशा प्रकारचे हल्ले करण्याची पद्धत येमेनमधील हुती बंडखोरांकडूनही वापरली जाते. हुती बंडखोरांचे ड्रोन काही किलोमीटर अंतर कापून सौदी अरेबियाच्या हवाई तळावर हल्ले करतात. २०२० मध्ये ,सौदी अरेबियन सैन्याच्या ठिकाणांवर २६७ ड्रोन हल्ले करण्यात आले. येमेनमध्येच १८० हल्ले ड्रोन हल्ले झाले होते. वर्ष २०२१ मध्ये ही हुती बंडखोरांचे ड्रोन हल्ले सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात हुती बंडखोरांनी दक्षिण-पश्चिम सौदी अरेबियाच्या अबहा आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले होते. मात्र अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्राचा वापर केवळ दहशतवादीच नव्हे तर जगातील अनेक देश त्यांच्या सैन्य ताकदीसाठी करतात. अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात अमेरिकन सैन्य आघाडीवर आहे. दहा वर्षांपूर्वी अमेरिकी संरक्षण विभाग पेंटागॉनच्या ताफ्यात ५० ड्रोन होती. आता ७५०० आहेत. सैन्याने अफगाणिस्तानात २०१२ पूर्वीच्या ११ महिन्यांत ४४७ ड्रोन हल्ले केले होते. २०११ मध्ये यांची संख्या २९४ होती. ओबामा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर ३०० गुप्त ड्रोन हल्ले केले. ड्रोन नेहमीच युद्धभूमीवर तैनात असते. ते आपली गुप्त माहिती जमवते आणि त्वरित कारवाई करते. त्याने युद्ध पद्धतीच बदलली आहे. वॉशिंग्टनच्या न्यू अमेरिका फाउंडेशननुसार अमेरिकी ड्रोन हल्ल्यात अल् कायदा, तालिबानचे ५० प्रमुख नेते मारले गेलेत. अफगाणिस्तानात सैन्यातर्फे ड्रोन हल्ले केले जातात. ते बहुतांश उघडउघडपणे केले जातात. दुसर्‍या ठिकाणी ते ‘सीआयए’तर्फे केले जातात आणि गोपनीय असतात. 

दहशतवादी हल्ल्यांसाठी ड्रोनचा धक्कादायक 

ब्रिटनची संस्था ‘ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’च्या अंदाजानुसार २००४ पासून एकट्या पाकिस्तानात ‘सीआयए’च्या ड्रोन हल्ल्यात २६२९ ते ३४६१ व्यक्ती मारल्या गेल्या. यात ४७५ ते ८९१ नागरिकांचा समावेश आहे. अनेक देशांत असैनिक कार्यांमध्ये ड्रोनचा वापर होत आहे. ब्रिटिश कंपनी स्कायपॉवरने ८ रोटरचे ड्रोन तयार केले आहे. जो मुव्ही कॅमेरा घेऊन जातो. कॉस्टारिकात ज्वालामुखीच्या अभ्यासासाठी याचा उपयोग होतो. ऑस्ट्रेलिया, जपान, ईस्त्रायलसारख्या देशांमध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोनचा मोठ्या प्रामाणात वापर केला जातो. भारतात फोटोग्राफीसाठी ड्रोनचा वापर अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येते. पोलिसांकडून मोर्चा, सभा किंवा गर्दीच्या ठिकाणी निगराणीसाठीही ड्रोनचा वापर केला जावू लागला आहे. ड्रोन हेरगिरी करणारे आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र आहे. हवाई दलाच्या गोरगॉन सेन्सरने तैनात रीपर ड्रोन एकावेळी १२ विविध कोनातून जवळपास चार किलोमीटर क्षेत्रावर लक्ष ठेवते. पेंटागॉनच्या एका संस्थेतर्फे विकसित आरगस इमेजिंग सिस्टिम वीस हजार फूट उंचीवरून सहा इंच लांब वस्तूचे छायाचित्र घेऊ शकतो. यामुळे याचा विधायक वापर केल्यास फायदाच होईल. ही ड्रोनची सकारात्मक बाजू असली तरी दहशतवादी हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर ही मोठी धक्कादायक बाब आहे.

Post a Comment

Designed By Blogger