वाह ताज!

२००८ च्या अतिरेकी हल्ल्याने मुंबईसह सारे जग हादरले होते. या हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेलला लक्ष केले. कारण ही केवळ एखाद्या हॉटेलची इमारत नसून भारतीयांचा गौरव आहे, याची माहिती अतिरेक्यांना होती. या हल्ल्यात ताज हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हॉटेलमधील ग्राहकांचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिल्याने नेमकं टाटा समूह कर्मचार्‍यांना नेमकं कसं प्रशिक्षण देतं, याची जगभर चर्चा झाली होती. २०१० मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या खुणा जशाच्या तशा जपत ताज ग्राहकांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन आला होता. यातच ताज या ब्रॅण्डचे वेगळेपण सिध्द होते. आता जगातील सर्वात मजबूत ‘हॉटेल ब्रँड’ म्हणून टाटा ग्रूपच्या ‘ताज हॉटेल्स’ला बहुमान मिळाला आहे. 


‘ताज’ हॉटेल नसून भारतीय अस्मितेचे प्रतिक
 

जागतिक ब्रँड मूल्यांकन कन्सल्टंन्सी कंपनी ब्रँड फायनान्स विपणन गुंतवणूक, ग्राहक संवाद, कर्मचार्‍यांचे समाधान आणि कॉर्पोरेट प्रतिष्ठा अशा मानकांच्या आधारे ब्रँड किती मजबूत आहे हे निश्चित करते. ब्रँड फायनान्सच्या ‘हॉटेल्स-५० २०२१’च्या अहवालानुसार जगात महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतरही सर्वोत्तम हॉटेल ब्रँडच्या यादीत ‘ताज’ अव्वल स्थानावर राहिले. त्यांनी दिलेल्या मानकांनुसार ‘ताज’ (ब्रँड मूल्य २९.६ कोटी डॉलर) १०० पैकी ८९.३ गुणांस ट्रीपल ए ब्रँड रेटिंगसह जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड ठरला आहे, ‘ताज’नंतर प्रीमिअर दुसर्‍या स्थानावर, मेलिना हॉटेल्स इंटरनॅशनल तिसर्‍या, एनएच हॉटेल ग्रूप चौथ्या आणि शांग्रीला हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स पाचव्या स्थानावर आहे. ‘ताज’ला मिळालेल्या या सन्मानाचा सर्व भारतीयांना मोठा अभिमान आहे. ‘ताज’ ही केवळ एक हॉटेल नसून भारतीय अस्मितेचे प्रतिक आहे. कारण ब्रिटीश राजवटीच्या काळात अनेक हॉटेल्समध्ये केवळ इंग्रजी अधिकार्‍यांनाच प्रवेश होता. यापैकीच एक असलेल्या वॅटसन या पंचतारांकित हॉटेलमध्ये जमशेदजी टाटा यांना वंशभेदाचा अनुभव आल्यानंतर भारतीयांच्या सामर्थ्याची जाणीव ब्रिटीशांना करुन देण्यासह मुंबईच्या सौंदर्यात भर घालणार्‍या व भारताचे पर्यटनाने महत्व वाढावे यादृष्टीने त्यांनी ताज उभारणीचा निश्‍चिय केला. १८९९ मध्ये त्यांनी इंडियन हॉटेल कंपनीची स्थापना केली व त्याच कंपनी अंतर्गत १६ ऑक्टोंबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या किनार्‍यावर पहिले ताज हॉटेल उभे राहिले. त्यावेळी स्वत: जमशेदजींनी लंडन, पॅरिस, बर्लिन इथून ताजसाठी अंतर्गत सजावटीच्या कलात्मक वस्तू मागविल्या होत्या. यानंतर ताज हॉटेलने कधीच मागे वळून पाहिले नाही. ताज हॉटेल समूहाने १९७४ मध्ये भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय बीच रिसॉर्ट गोवा फोर्ट अग्वादा इथे सुरू केले. त्यानंतर ताज समूहाने अनेक राजवाडे हॉटेलमध्ये रूपांतरित केले. उदयपूर लेक पॅलेस त्यातील पहिला राजवाडा ठरला. आज या समूहाच्या हॉटेल्सने शतक झाले आहे. त्यातील ८४ हॉटेल्स भारतभरात सेवा देतात, तर अमेरिका, लंडन, दक्षिण आफ्रिका, मालदीव, नेपाळ अशा विविध १६ देशांत ताज हॉटेलने आपला झेंडा रोवला आहे. ‘ताज’ त्यांच्या हॉस्पिटॅबिलीटीसाठी प्रसिध्द आहे. २०१६ साली पहिल्यांदाच ‘ताज ब्रँड’चा सर्वोत्तम हॉटेल ब्रँड्सच्या क्रमवारीत समावेश झाला होता. त्यावेळी ‘ताज’ला ३८ वे स्थान मिळाले होते. आता २०२१ साली ‘ताज’ने जगात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यामुळे सर्व जग वाह ताज! म्हणून सलाम करत आहे. 

जमशेदजी टाटा १०० वर्षांतील जगातील सर्वात परोपकारी व्यक्ती

एकीकडे ‘ताज’ला हा बहुमान प्राप्त झाला तर दुसरीकडे ‘ताज’ची पायाभरणी करणारे जमशेदजी टाटा यांना मागील १०० वर्षांतील जगातील सर्वात परोपकारी व्यक्ती म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी मिळून १०२ अब्ज अमेरिकन डॉलर (आजच्या काळताले सुमारे ७.५७ लाख कोटी रुपये) एवढी संपत्ती दान केली होती. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणार्‍या ट़ॉप ५० लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. समाजाच्या भल्यासाठी दान करणार्‍यांमध्ये जमशेदजी टाटा यांचे नाव आघाडीवर आहेत. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे. त्यांनी बिल गेट्स, मेलिंडा यांच्यासह जगातील आजच्या काळातील अब्जाधीशांनाही मागे टाकले आहे. बिल गेट्स आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मेलिंडा यांनी संयुक्तपणे ७४.६ अब्ज डॉलर दान केले. गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे यांनी ३७.४ अब्ज डॉलर दान केले. जॉर्ज सोरोस यांनी ३४.८ अब्ज डॉलर दान केले. जॉन डी रॉकफेलर यांनी २६.८ अब्ज डॉलर दान केले. युरोप आणि अमेरिकेतील श्रीमंतांनी मागील १०० वर्षांत मोठ्या प्रमाणावर दान केले. पण या सर्वांच्या तुलनेत समाजकार्यासाठी जमशेदजी टाटा यांनी दान केलेली संपत्ती आणि या दानाचा पुढे झालेला विनियोग आजही कोट्यवधी नागरिकांसाठी फायद्याचा ठरत आहे. यामुळेच जमशेदजी टाटा हे जगातील सर्वात मोठे दानवीर आहेत. दोन्ही गोष्टींना योगायोग म्हणा का दुग्धशर्करा योग मात्र टाटांच्या सन्मानामुळे सर्व भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. ‘ताज’च्या शिरपेचात असेच मानाचे तुरे रोवत राहो आणि भारतीयांची प्रतिष्ठा अशीच वाढत राहो, हिच ईश्‍वरचरणी प्रार्थना!

Post a Comment

Designed By Blogger