अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा मान्सून

केरळमधून वेगवान वाटचाल करत मान्सूनने महाराष्ट्रात धडक दिली आहे. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या ५ दिवस आधीच मान्सूनच्या आगमनाच्या वृत्ताने बळीराज सुखावला आहे. गत ४८ तासांपासून मॉन्सूनने अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. यंदा देशभरात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील विविध भागात वेळेच्या आधीच मान्सूनचे आगमन झाल असून आतापर्यंत गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग, तामिळनाडू या भागांमध्ये मान्सूनने धडक दिली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये भरडल्या जाणार्‍या अर्थव्यवस्थेला हा मान्सून नवसंजीवनी देणारा आहे. मान्सूनचे आगमन सर्वांनाच सुखावणारे आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थचक्राचा गाडाच रूतला होता. आता मात्र तो बाहेर येण्याची आशा निर्माण झाली आहे. सर्वात मोठा दिलासा बळीराजाला मिळाला आहे. अर्थकारणाचे खर्या अर्थाने बीजारोपण मान्सून करत असतो. ते यंदा अगदी वेळेवर होत आहे. साहजिकच सर्वच घटकांवरची काजळी दूर होते आहे. शेतकर्‍यांसह शेतमजूर, कामगार, छोटे विक्रेते, कारागीर, हातावरचे पोट असणार्‍या गरिबांना नवी आशा दिसते आहे.  अर्थव्यवस्थेला निश्‍चितपणे गती मिळेल

बंगालच्या उपसागरातून केरळपर्यंत आला तरी तेथून महाराष्ट्रात येईपर्यंत जूनचा दुसरा आठवडा उजाडतो. साधारणत: १५ जूनपर्यंत मुंबईत मान्सूनचे आगमन होते. तेथून पुढे तो हळूहळू पाच सहा-दिवसांत राज्यात पोहोचतो; पण यंदा तो मेहेरबान झाला अन् यापूर्वी कधी आला नव्हता त्या वेगाने तो सर्व राज्यात पोहोचला देखील. १५ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, असा अंदाज होता. मात्र, १० जूनलाच सर्व राज्यात पोहोचला. चक्रीवादळाच्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने गत ४८ तासांत १०० टक्के महाराष्ट्र आपल्या कवेत घेतला आहे. मान्सूनच्या या अकल्पित गतीने हवामानशास्त्रज्ञही चकीत झाले. गत दोन-तिन दिवसांपासून मान्सूनने मुंबईसह कोकणात जोरदार सलामी देत जणू पुढच्या काळातील वाटचालीचा इशाराच दिला आहे. गतवर्षभरापासून संकटांच्या पटलावर सापशिडीचा खेळ खेणार्‍या राज्य व देशाने खूप उतारचढाव पाहिले आहेत. या संकटकाळात यंदा हवामान विभागाने पावसाचा जो अंदाज दिला, तोही दिलासा देणारा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत भरपूर पाऊस पडेल. दरवर्षी राज्यात सरासरी ९६ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज असतो. यंदा मात्र १०४ टक्के अंदाज वर्तविला आहे. याची झलक त्याने सलामीलाच दाखवून दिली आहे. राज्यात सर्वदूर झालेले हे पाऊसमान खरिपाचा पेरा यशस्वी करण्याची हमी देणारे आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या व पर्यायाने राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्‍चितपणे गती मिळेल. 

निसर्गाच्या लहरीपणाचे चटके

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव शहरी भागापुरता मर्यादित होता मात्र दुसर्‍या लाटेने ग्रामीण भागात हाहाकार माजविला. याची झळ शेतकरी व शेतमजूरांना मोठ्याप्रमाणात बसली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना मान्सूनचे दमदार आगमन दिलासा देणारे आहे. यामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचे चटके सोसणार्‍या बळीराजा यंदा मोठी आशा आहे. बळीराजाने अनेक दुष्काळ पाहिले, निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सोसले अन् पचवलेदेखील; पण कोरोनासारखे वैश्‍विक संकट तो प्रथम पाहतोय अन् यात तो पुरता खचला होता. मात्र, ‘इडा पिडा टळो...’ म्हणत त्याने पुन्हा एकदा कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. यंदाचा मान्सून जोरदार असल्याने सर्वच व्यवसायांना बाळसे येईल, अशी आशा आहे. हे दहा हत्तींचे बळ केवळ मान्सूनच देऊ शकतो. पाऊस जसा बरसेल तसे बाजाराचे अर्थचक्र वेगाने फिरू लागेल आणि पुन्हा एकदा सर्वकाही सुरळीत होईल, ही नव्या अभ्युदयाची आश्‍वासक हाक हा मान्सूनच घालू शकतो. मात्र मान्सूनच्या लहरीपणाचा अभ्यास करणे आवश्यक झाले आहे. गतवेळी महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी अगदी दिवाळीपर्यंत ठाण मांडून बसलेल्या अवकाळी पावसाने यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यातही बहुतांश ठिकाणी हजेरी लावली. गेल्यावर्षी देशात किंबहूना जगभरात निसर्गचक्र बिघडल्यासारखी स्थिती होती. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर आदी प्रकारच्या आपत्तींमुळे हजारो लोकांसह मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे चित्र जवळपास सर्वच ठिकाणी पहायला मिळाले. 

निसर्ग कूस बदलतोय, ही धोक्याचीच घंटा!

राज्य शासनाच्या ‘क्लायमेट चेंज’वरील रिपार्टनुसार, २०३० पर्यंत महाराष्ट्राच्या पर्जन्यमानात मोठे बदल होत आहेत. यात कोकणातला पाऊस कमी होत जाईल, तर दुष्काळी समजल्या जाणार्‍या मराठवाड्यात तो अधिक वाढेल. उत्तर महाराष्ट्रातही तो वाढणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या भागात अतिमुसळधार पाऊस म्हणजे ढगफुटीची शक्यता वाढणार आहे. त्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज देणार्‍या रडारची संख्या महाराष्ट्रात वाढविणे आता गरजेचे ठरणार आहे. यंदा मान्सूनच्या पूर्वीच ‘तोक्ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळांची निर्मिती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात झाली. मागच्या वर्षी अम्फान, निसर्ग, गती, निवार, बुरेवी अशी तब्बल पाच वादळे धडकली. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता, तीव्रता वाढणार आहे. मान्सून लहरी बनण्याचे चक्रीवादळ हे एक कारण आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत तो पर्जन्य वाटत जातो. याचे वेळापत्रक अनादी काळापासून ठरलेले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ते कोलमडून नवे तयार झाले आहे. यंदाची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. यामुळे एकीकडे आनंद व्यक्त करतांना चिंताही कराविशी वाटते. निसर्गाच्या लहरीपणाची मोठी किंमत दरवर्षी शेतकर्‍यांना मोठ्याप्रमाणात चुकवावी लागत असते. यामुळे याला केवळ निर्सगाची देणगी म्हणून सोडून चालणार नाही, यावर शास्त्रशुध्द पध्दतीने सखोल संशोधन होण्याची आवश्यकता आहे. निसर्ग कूस बदलतोय, ही धोक्याचीच घंटा मानली पाहिजे. अलीकडच्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द परावलीचा झाला आहे. या विषयावर चर्चा देखील सुरु आहे मात्र प्रत्यक्षात कृती करण्यात आपण मागे पडत आहोत, हे सत्य मान्य करायलाच हवे!

Post a Comment

Designed By Blogger