क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक अन् एकाच देशाचे दोन संघ

जगभरातील टेस्ट क्रिकेटप्रेमींची उत्सुकता व उत्कंठा ताणून ठेवणार्‍या डब्ल्यूटीसी फायनलसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या दौर्‍यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे. यामुळे आगामी काही महिने भारतीय क्रिकेट टीमचे टाईमटेबल चांगलेच व्यस्त आहे. दुसरीकडे याच काळात म्हणजे जुलै महिन्यामध्ये भारतीय संघ एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. हे कसे शक्य आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो मात्र श्रीलंका दौर्‍यावर जाणारा संघ हा पुर्णपणे वेगळा असून याचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. याचा अर्थ भारताचे दोन संघ एकाच वेळी वेगवेगळ्या मालिकांसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये असतील. एकाचवेळी दोन संघ खेळविण्याचा प्रयोग भारतासह अन्य काही देशांनी आधीही केला आहे.



नॉन-स्टॉप क्रिकेट 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आणि त्यात आयपीएलसारख्या होणार्‍या स्पर्धांमुळे खेळाडूंची व्यस्तता हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. व्यस्त वेळापत्रकावर अनेक आजी माजी खेळाडूंकडून अधूनमधून टीका देखील होत असते. मात्र हा केवळ बॅट आणि बॉलचा खेळ नसून पैशांचाही खेळ असल्याने खेळाडूंच्या व्यस्ततेवर फारसे कुणी लक्ष देत नाही. खेळाडूंच्या व्यस्ततेची झलक आसीसीसीच्या वेळापत्रकाच मिळते. आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठी फ्युचर टूर्स प्रोग्रॅम तयार केला आहे. आयसीसीच्या फ्यूचर टूर्स प्रोग्रॅमनुसार २०२४ ते २०३१ या काळात ४ टी-२० विश्‍वचषक आयोजित होतील. त्याशिवाय दोन एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धांचेही आयोजन होणार आहे. यादरम्यान २ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ४ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धांचेही आयोजन होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील दोन वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ चा विश्‍वचषक होईपर्यंत पुढील १५ महिन्यांपर्यंत विराट कोहली अँड कंपनीला नॉन-स्टॉप क्रिकेट खेळावे लागेल. कोविड - १९ मुळे बर्‍याच मालिका आणि स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. त्यांचेही नियोजन सुरु आहे. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील बायो-बबलमध्ये राहणे म्हणजे ‘मानसिकदृष्ट्या थकवणारे’ होते. अशा प्रकारच्या व्यस्ततेत खेळाडूंच्या विश्रांतीवर चर्चा होणे गरजेचे आहे. यातून खुश्कीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला आहे.

भारताने १९९८ ला देखील असेच दोन संघ खेळविले

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला टीम इंडीयाला रवाना केल्यानंतर बीसीसीआयने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली जुलैमध्ये श्रीलंका दौरा करणारा संघ गुरुवारी जाहीर केले आहे. एकाचवेळी दोन आंतरराष्टीय संघ खेळविण्याचा प्रयोग भारताने या आधीही केलेला आहे. भारताने १९९८ ला देखील असेच दोन संघ खेळविले होते. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारताचा मुख्य संघ पाकिस्तानविरुद्ध कॅनडात सहारा चषक खेळला, त्याचवेळी अजय जडेजाच्या नेतृत्वात दुसरा संघ क्‍लॉललंपूर येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता. अझहरच्या नेतृत्वाखालील संघात सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि जवागल श्रीनाथचा समावेश होता. तर जडेजाच्या नेतृत्वाखालील संघ सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे यांचा समावेश होता. राष्ट्रकुलसाठी तगडा संघ पाठविण्यात यावा अशी चाहत्यांची मागणी होती मात्र बीसीसीआयने भारत- पाक लढतीला झुकते माप दिले. त्यावेळच्या संघ निवडीवर ‘मेडल विरुद्ध मनी’ अशी टीकाही झाली होती. यावेळी पाकिस्ताननेदेखील दोन संघांचा प्रयोग केला होता. त्याआधी १९३०मध्ये इंग्लंड संघ एकाचवेळी जगातील २ वेगवेगळ्या ठिकाणी २ कसोटी सामने खेळत होता. १३ जानेवारी १९३० रोजी एकाच दिवशी इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे तर ब्रिजटाऊन येथे इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना खेळत होता. 

नव्या प्रयोगामागे खरा हिरो आहे ‘द वॉल’ राहुल द्रविड

यामुळे एकाचवेळी दोन संघ खेळविणे हा काही नवा प्रयोग नाही. आता फरक फक्त एवढाच आहे की आता स्पर्धांचे नियोजन हे पैशांच्या गणितावर होवू लागले आहे. आयपीएलमुळे टीम इंडीयाला विश्रांती मिळणार नाही याची जाणीव बीसीसीआयला होती मात्र आयपीएल स्पर्धा झाली नाही तर बीसीसीआयचे हजारो कोटींचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांनी कोरोनाच्या काळातही आयपीएल खेळवली. आताही अपूर्ण राहिलेली आयपीएल खेळविण्यासाठी बीसीसीआयचा खटाटोप सुरु आहे. कारण उर्वरित स्पर्धा न झाल्यास अडीच हजार कोटींचे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. पैशांचे हे गणित भविष्यातही आयसीसी व बीसीसीआयच्या क्रिकेट वेळापत्रकांवर हावी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे एकाच वेळी दोन संघ खेळविण्याच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. यामुळे खेळाडूंना विश्रांती तर मिळेलच मात्र अन्य खेळाडूंना खेळण्याची संधीही मिळेल. या नव्या प्रयोगामागे खरा हिरो आहे ‘द वॉल’ राहुल द्रविड! कारण एकाचवेळी दोन तुल्यबळ संघ खेळवायचे असल्यास तसे खेळाडू तयार होणे गरजेचे आहे. याचा पाया राहुल द्रविडने रचला आहे. खेळाडू घडविण्याची प्रक्रिया आणि एकाहून एक सरस खेळाडूंची फळी निर्माण होणे याचे श्रेय स्थानिक क्रिकेटमधील भक्कम यंत्रणेला द्यावे लागेल. राहुल द्रविडसारख्या संयमी दिग्गजाने प्रशिक्षणाचा आणि आंतरराष्ट्रीय अनुभव देण्याचा पाया रचला. आयपीएलने खेळाडूंच्या प्रगतीची दारे उघडली. दोन संघांचा हा प्रयोग यशस्वी व्हावा, दोन्ही संघांनी दणदणीत विजय नोंदवावेत, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger