विघ्नहर्त्याच्या उत्सवात विघ्न

सर्वांचा लाडका गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. कारण तो लोकांना त्रास देणार्‍या असुरांचा, विघ्नांचा नायनाट करतो. सुखकर्ता आणि दुखहर्ता म्हणून सर्व भक्तगण बाप्पाचा धावा करतात मात्र विघ्नहर्त्या गणरायाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रामुळे साध्यापध्दतीने साजरा झालेला गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे स्वप्न बाळगणार्‍यांचा यंदाही हिरमोड झाला आहे. सध्या गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे. या विषाणूने लाखो जणांचा जीव घेतला तर कोट्यावधी जणांना उद्ध्वस्त केले आहे. या संकटातून बाहेर पडणार असे वाटताच नवे संकट उभे राहते. यामुळे देवा तुच बनविलेल्या या पृथ्वीवर काय सुरु आहे, हे तुला दिसत असेलच, देवा आज संकटे चहुबाजूने आली असल्यासारखे भासत आहे, या संकटांपासून देवा तूच आता वाचव...अशी आर्त हाक गणेशभक्त देत आहेत.



गणेशभक्तांचा हिरमोड

गणेशोत्सव म्हटला की, सर्वत्र धामधूम व उत्साहाचे वातावरण असते. मात्र गतवर्षाप्रमाणे यंदाही विघ्नहर्त्याच्या उत्सवावर विघ्न आले आहे. राज्यावर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट असल्याने शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहे. याचा फटका गणेशोत्सवाला देखील बसला आहे. सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या उत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे. गृहविभागाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही सारखेच नियम लागू केले आहे. गणेश मंडपात गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच, सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी, अशी सूचनाही सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता गणेश मंडपे मर्यादित स्वरुपात असावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील पातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीरासह कोरोना, मलेरिया, डेग्यू इ. आजार आणि उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत, आदी सुचना देत अनेक बंधने राज्य सरकारने लादली आहेत. या बंधनांमुळे गणेशभक्तांचा हिरमोड होणे स्वाभाविकच आहे. 

विघ्नहर्त्या सर्व संकटांच्या मालिकांपासून तुच वाचव रे...देवा

गतवर्षी काही गणेशोत्सव मंडळांनी मंडळ सजावट तसेच गणपतीची मूर्ती यावर होणारा खर्चाला फाटा देत, कोरोनाशी लढा देणार्‍या आपल्या कोविड योध्यांसाठी, डॉक्टर, नर्स, पोलीस, सेक्युरिटी गार्ड या देवदूतांसाठी विविध मदत करत आहे हि गोष्ट नक्कीच कौतुकास पात्र आहे. यामुळे सामाजिक भावना जपण्यास मदत झालाी होती. यंदा आपल्याला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या नातेवाईकांच्या, मित्र मंडळींच्या घरी जरी जात येणार नसले तरी आपण ऑनलाईन आपल्या लाडक्या गणपती बाप्पा चे दर्शन घेऊ शकतो. शेवटी आपण आपले सण साजरे करताना आपल्यासह आपल्या प्रियजनांची काळजी घेणे घेणे तेवढेच आवश्यक आहे. कोरोनाचे हे दीड वर्ष प्रचंड त्रासदायक होते. या काळात अनेकांना आपल्या जीवलगांना गमाविले आहे तर काहींना आपले सर्वच गमवले आहे. या काळात झालेले नुकसान कधीच भरुन निघणार नाही, हे देखील तितकेच सत्य आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ विघ्नहर्त्या गणरायाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. अजून गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यासाठी थोडा वेळ आहे मात्र हाच काळ महत्त्वाचा आहे. आगामी महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट आली नाही म्हणजे ही लढाई जिंकण्यासारखं आहे. हे आपल्या हाती आहे. गणरायाच्या आगमनापर्यंत जर कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यास आपण सर्वजण यशस्वी झालो तर निश्चितपणे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे जे आपल्या हाती आहे त्यासाठी गणरायाला त्रास देण्यात अर्थ नाही. गणपती बाप्पा ही बुध्दीची देवताही मानली जाते. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी काळजी घेत गर्दी टाळणे आदी खबदारदारी घेण्यासाठी बाप्पा सर्वांना सद्भुध्दी देवो! दुसरीकडे कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण तर आहेच मात्र दुसरीकडे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने देशात बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण होवून महागाई देखील वाढली आहे. कोरोनाचे संकट काय कमी होते म्हणून आता राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. तिकडे भारत-चीन सीमेवर तणाव कमी व्हायचे नाव घेत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील उलथापालथींमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्याचे त्याचे हादरे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. विघ्नहर्त्या या सर्व संकटांच्या मालिकांपासून तुच वाचव रे...देवा!

 

Post a Comment

Designed By Blogger