गावांच्या वेशींवरच कोरोनाला रोखा

कोरोनाच्या पहिल्या लाटेने शहरी भागात मुक्काम ठोकल्यानंतर कोरोना हा दाट वस्ती असलेल्या शहरी भागातच पसरतो, असा काहीसा समज झाला. मात्र दुसर्‍या लाटेने शहरी भागासह ग्रामीण भागातही थैमान घातले. शहरी भागात अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा उपलब्ध असतांनाही ऑक्सिजन, बेड, रेमडिसिव्हीरसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना फिरफिर करावी लागली. ग्रामीण भागात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. आता दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. दुसर्‍या लाटेत अनेक गावे हॉटस्पॉट ठरली. यामुळे आता नागरिकांनी स्वत:हून काळजी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. शासनाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक करायलाच हवे.



खेड्यांना नवसंजीवनी देणारा उपक्रम

ग्रामविकासाच्या प्रक्रियेत लोकांचा थेट सहभाग जितका अधिक तितका गावकारभार चांगला, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. म्हणूनच ‘गावं करी तथे रावं काय करी’ ही म्हण ग्रामीण भागात प्रसिध्द आहे. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा म्हणजे विकास नव्हेत. ते तर प्राधान्याने गावाला दिलेच पाहिजे. त्यापलीकडे जावून गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असते. ते करणार्‍या गावांचा गौरवही केला जातो आणि त्या तुलनेत घसघशीत अतिरिक्त निधीही बक्षिस रुपात मिळतो. यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागातून शंभर टक्के लसीकरण, स्वच्छ व कचरामुक्त गाव, शाळा व अंगणवाडीत १०० टक्के पटनोंदणी, गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे, शोषखड्ड्यांचा व परसबागांचा वापर करून सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतागृह व शौचालय वापर शंभर टक्के, कुपोषण मुक्त गाव, बालमजूर मुक्त गाव, तंटामुक्त, व्यसनमुक्त, प्लास्टिकमुक्त गाव, हागणदारी मुक्त गाव, उकिरडामुक्त गाव, कचरामुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, निर्मलग्राम अभियान, स्वजलधारा, जलस्वराज्य, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशनसारखे अनेक उपक्रम या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जन्माला आले. लोकसहभाग हा ग्रामविकासामधील महत्त्वाचा गाभा आहे. म्हणूनच तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी गावांचे विकासाचे मर्म ओळखून व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेतून समृद्धी हा विचाराचा धागा पकडत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हा एक खेड्यांना नवसंजीवनी देणारा उपक्रम हाती घेतला. 

हिवरेबाजारच्या धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान 

आपला गाव...आपला विकास या संकल्पनेत गावांना भव्य बक्षीस योजना व गावांचा सन्मान अशी भव्य राज्यव्यापी स्पर्धा आर. आर. आबांनी जाहीर केली आणि बघता बघता राज्यातील गावागावांत एक विकासाची नवक्रांती सुरू झाली. ग्रामीण भागात लोकांनी आपल्या सहभागातून चळवळ उभी केली. अनेक गावांनी आपले गाव समृद्ध करुन दाखविले. याच धर्तीवर आता गावपातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले. गावाच्या एकोप्याने गाव कोरोना मुक्त होऊ शकते, हे हिवरे बाजारने राज्याला दाखवुन दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा नुकताच गौरव केला. राज्यात कोरोना कमी होत असला, तरी भविष्यात वाढू नये. तसेच तातडीने कमी होण्यासाठी हिवरेबाजारच्या धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपचायतीमध्ये कोरोनामुक्त गाव अभियान राबवून तशी स्पर्धा घ्यावी, अशी मागणी राज्याच्या आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोना मुक्त गाव स्पर्धा राबवावी राज्याच्या २८ हजार ग्रामपंचायतीतून शासनाच्या वतीने कोराना मुक्त गाव स्पधी राबवल्यास प्रत्येक ग्रामस्थ आपले गाव कोरोना मुक्तीच्या एकजुटीने कार्य करतील असा विश्‍वास व्यक्त करत त्यांनी हिवरे बाजारने राबवलेल्या कोरोना मुक्त गावाचा अराखडाही पाठविला होता. यावर सकारात्मक निर्णय घेत कोरोनामुक्त गाव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोरोना संपल्याशिवाय गावाचा विकास नाही

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार. राज्य शासनाचा हा प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य आहे. यास आता गावकर्‍यांची साथ मिळायला हवी. कारण कोरोनाला रोखणे ही केवळ राज्य किंवा केंद्र सरकारची जबाबदारी नाही. आता कोरोनाविरुध्द सुरु असलेल्या या लढाईत प्रत्येकाने सैनिकाप्रमाणे योगदान देण्याची वेळ येवून ठेपली आहे. याची सुरुवात कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. हे करत असतांना केवळ पुरस्कारासाठी चाचण्या न करता किंवा आकड्यांची लपवाछपवी न करता कोरोनाला हरवायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाना केल्यास कोरोनाचा विषाणून गावाच्या वेशीपासूनच परत जाईल. कोरोना संपल्याशिवाय समृध्द गाव किंवा गावाचा विकास या संकल्पना पूर्ण होणारच नाही, याचे भान ठेवून प्रत्येकाने आपआपल्या परिने योगदान दिले पाहिजे.

Post a Comment

Designed By Blogger