कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा उंचावण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. २०१४ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर तिसर्यांदा भारताला जागतिक विजेतेपदाने हुलकावणी दिली. वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीमधील अतिरिक्त सहाव्या दिवशी क्रिकेटरसिकांना कसोटी क्रिकेटची अस्सल रंगत पाहायला मिळाली. मात्र या महामुकाबल्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडीयाचा ८ गडी राखत पराभव केला. या स्पर्धेत गेली दोन वर्ष भल्या भल्या संघांना आसमान दाखवणारा भारतीय क्रिकेट संघ हा या सामन्यात चमकदार कामगिरी दाखवू शकला नाही. संघात मातब्बर खेळाडू असतानाही भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने कर्णधार विराट कोहली आणि संघावर टीका होणे स्वाभाविकच आहे. ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी दाखविलेली ही हारकिरी क्रिकेटप्रेमीना जिव्हारी लागणारी आहे.
स्पर्धांच्या अती डोसमुळे कसोटीतील तंत्रशुद्ध फलंदाजीचा अस्त
गेल्या तीन वर्षांपासून खेळवल्या जात असलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अखेर २३ जून रोजी समाप्त झाली. १८ ते २३ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ सर्व आघाड्यांवर सरस ठरल्याने त्यांना ही कामगिरी करता आली. २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय प्रकाराचे विश्वचषक निसटलेल्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने बुधवारी क्रिकेटच्या पारंपरिक प्रकाराचे विश्वविजेतेपद जिंकण्याची किमया साधली. यामुळे न्यूझीलंड संघाचे कौतूक करावे तितके कमीच आहे. मात्र या सामन्यामुळे भारतीय संघाच्या काही उणीवा समोर आल्या आहेत. भारत व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम कसोटी लढत पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की टी-२० क्रिकेटच्या विशेषत: आयपीएलसारख्या स्पर्धांच्या अती डोसमुळे कसोटीतील तंत्रशुद्ध फलंदाजीचा अस्त झाला आहे. या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने भारतीय खेळाडूंनी फलंदाजी केली तिच्यावर चांगलीच टीकाही झाली. मात्र, न्यूझीलंडनेही पहिल्या डावात केलेली फलंदाजी पाहतानाही हेच जाणवत होते की दोष एकाच संघाचा नसून टी-२० क्रिकेटच्या भडिमाराचा आहे. यावर अनेक तज्ञ व माजी खेळाडूंनी टीका देखील केली आहे. याचा कुठेतरी विचार बीसीसीआयला करावाच लागेल.
क्रिकेटरसिकांना निराश केले
कसोटी क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी अपेक्षित असते या कल्पनेलाच आता धक्का बसत आहे. मुळातच कसोटी क्रिकेटची लोकप्रियता एकदिवसीय सामन्यांमुळे काहीशी कमी होत होती. त्यातच टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर कसोटी क्रिकेट हवेच कशाला असे विचारण्यापर्यंत मजल गेली. यावरुन हा किती गंभीर प्रकार आहे, याची प्रचिती येते. अति क्रिकेटमुळे खेळाडूंवर येणारा ताण व थकवा यावर आधीही खूपवेळा चर्चा झाली आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याची मोठी किंमत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गमवून भारताला चुकवावी लागली आहे. अंतिम सामन्यात काही चूका झाल्या, ज्या टाळता येवू शकल्या असत्या. या सामन्याच्या पहिल्या डावात सलामीवीर शुभमन गिल आणि रोहीत शर्मा यांची सावध सुरूवात केली होती. सांभाळून खेळताना त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या डावात रोहीतने ३४ आणि गिल याने २८ धावा केल्या होत्या. हे दोघे मोठी खेळी साकारू शकले असते, मात्र दोघांना त्यात यश आले नाही. दुसर्या डावात ही जोडी आणखीनच लवकर बाद झाली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे फलंदाज मिळणे ही कोणत्याही संघासाठी स्वप्नवत गोष्ट आहे. या तिघांनीही क्रिकेटरसिकांची निराशा केली. ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविड याच्या तोडीस तोड चेतेश्वर पुजारा असल्याचे कौतुक केले जाऊ लागले होते. मात्र या सामन्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असतानाही विराट कोहलीने अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात घेतले होते. जडेजा हा खरोखर गुणी खेळाडू आहे आणि त्याने वेळोवेळी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, मात्र या सामन्यात तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्याच प्रमाणे जसप्रीत बुमराह यानेही क्रिकेटरसिकांना निराश केले. संपूर्ण सामन्यात बुमराहला एकही बळी टीपता आला नाही.
बेजबाबदार फटके का मारले?
दुसर्या डावात अत्यंत अनुभवी असलेल्या इशांत शर्मा याला पण एकही बळी टीपता आला नाही. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी टीच्चून गोलंदाजी करत प्रमुख फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवले होते. पहिल्या डावात त्यांची अवस्था ७ बाद १९२ अशी झाली होती. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ भारतात्या संघापेक्षा २५ धावांनी पिछाडीवर होता. यावेळी न्यूझीलंडच्या तळाच्या ३ फलंदाजांनी ५७ धावा चोपून काढल्या. याचीही किंमत टीम इंडीया चुकवावी लागली. हा सामना ड्रॉ जरी झाला असता तरी भारताला संयुक्त विजेतेपद मिळाले असते. याची जाणीव असतांनाही आपल्या फलंदाजांनी इतके बेजबाबदार फटके का मारले? हा मोठा प्रश्न आहे. जेंव्हा सामना ड्रॉ करायचा असतो तेंव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण किंवा राहूल द्रविड यांचा आदर्श घ्यायला हवा होता मात्र त्याच्या उलट टी-ट्वींटी सारखी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत असल्याचे दिसून आहे. अशी खेळी करण्याचा आदेश त्यांना व्यवस्थापनाने दिला होता काय? याचाही उलगडा होण्याची आवश्यकता आहे. विराट कोहली हा निश्चितपणे दर्जेदार खेळाडू आहे मात्र कोहलीकडे अद्याप एकही आयसीसी जेतेपद नाही. हे जेतेपद मिळविण्याची चांगली संधी चालून आली होती मात्र कोहली व संघाने ती गमावली. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ पूर्ण तयारीने सामना खेळला आणि त्यांनी भारताकडून हे जेतेपद हिसकावून घेतले. त्यांचा खेळ व रणणीती दोन्हीही सरस होत्या. यामुळे त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. खेळ म्हटला की हार आणि जीत आलीच मात्र अति क्रिकेटच्या नादात व फटकेबाजीच्या मोहात तंत्रशुध्द फलंदाजीचा अस्त होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
Post a Comment