राजकीय धुराळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात ८ जूनला राजधानी दिल्लीत बंद खोलीत झालेली चर्चा...काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची परस्पर केलेली घोषणा...राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढविण्याबाबत केलेले भाष्य...शिवसेनेच्या वर्धापनदिनी उध्दव ठाकरेंनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करतांना भाजपावर टाळलेली टीका...आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाशी जुळवून घ्या, असा पत्राव्दारे दिलेला सल्ला...या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललयं? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना निश्‍चितपणे पडला असेल. या गोंधळात शरद पवार यांनी दिल्लीवारी केल्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय धुराळा उडाला आहे. शरद पवारांचा दिल्ली दौरा राज्यातील राजकारणातील डॅमेज कंट्रोलचा भाग आहे का नरेंद्र मोदी व भाजपाविरोधी देशव्यापी आघाडीची मोट बांधण्यासाठी आहे? या प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळणे थोडेसे अवघड आहे. 



आता भाजपशी जुळवून घ्या

राज्यात महाविकास आघाडी सरकार दिसत असले तरी सरकारमध्ये खूप घडामोडी घडत आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. परंतु यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० मिनिटे वैयक्तिक भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही असे म्हणत इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याची आठवण शिवसेनेला करुन दिली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला करुन भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्या शक्यता फेटाळत महाविकास आघाडी सरकार सरकार पाच वर्षे टिकेल, काम करेल, नुसतेच पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभेला व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल असा दावाही केला होता. विशेष म्हणजे यानंतर शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली होती. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. त्यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. भाजपाशी पुन्हा युती करावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे ठरवले असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्याने आता भाजपशी जुळवून घ्यावे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. 

पडद्यामागे बर्‍याच घडामोडी

या लेटरबॉम्बने राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटते. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसर्‍या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे. या पत्राचा धुराळा खाली बसत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. केरळमधील काही काँग्रेस पदाधिकार्‍यांसोबत पवारांची नियोजित भेट होती त्यासाठी ते दिल्लीत गेले असे सांगितले जात असले तरी राज्यातील राजकारणात पडद्यामागे बर्‍याच घडामोडी घडत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दिल्ली दौर्‍याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य टाळले!

देशात भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची योजना असून, त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. देशात बिगर भाजपा पक्षांचा पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी वारंवार व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही पवारांनी तसे मतप्रदर्शन केले होते. भाजपाला सशक्त पर्याय उभा राहावा हीच शरद पवार यांची योजना आहे. या सर्व घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर निश्‍चितपणे परिणाम होईलच! अर्थात यात शिवसेनेच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. एरव्ही नरेंद्र मोदी व भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणार्‍या शिवसेनेने विशेषत: उध्दव ठाकरेंनी वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसते. शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांबाबतही थेट टार्गेट करणे टाळले आहे. राम मंदिराच्या जमीन खरेदीत जे आरोप होत आहेत. त्यावर काही बोलले नाही. कारण त्यावर बोलणे म्हणजे संघाची नाराजी ओढावून घेणे हे त्यांनी केले नाही. भविष्यात शिवसेनेला पर्याय हवा असेल तर राष्ट्रीय नेतृत्वाची नाराजी उद्धव ठाकरेंना घ्यायची नाही. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य टाळले आहे. लसीकरण धोरणांवर काही बोलले नाही, यावरुन राज्यात शिजत असलेल्या राजकीय खिचडीचा वेगळाच वास येवू लागला आहे. नेमकं काय होतं?, कोण कुणावर कुरघोडी करतं?, कोण बाजी मारतं? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे नजिकच्या काळात मिळतीलच! तोपर्यंत सर्वांना वाट पहावी.

Post a Comment

Designed By Blogger