महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आणि फिजीकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तिसर्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. २ ते ४ आठवड्यात तिसरी लाट धडकू शकते अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्याने काळजीत आणखीनच भर घातली आहे. पण तिसरी लाट खरंच येणार आहे का? आणि आली तर कधी येऊ शकते? लहान मुलांना याचा धोका जास्त आहे की कमी? या प्रश्नांच्या उत्तरांवर तज्ञांमध्येच एकवाक्यता नसल्याने सर्वसामान्यांमध्ये धास्ती कमी आणि गोंधळच जास्त, अशी काहीशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
उसळणारी गर्दी तिसर्या लाटेला आमंत्रण देणारी
कोरोनाच्या दुसर्या लाटेने मागील दोन ते तीन महिन्यात देशात हाहा:कार माजवला. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसत आहे. दुसर्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दुसर्या लाटेतील स्थिती पाहून केंद्रासह राज्याने तिसर्या लाटेची तयारी सुरु केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखणे अशक्य असल्याचे वक्तव्य केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच केले आहे. मार्चअखेर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू पुन्हा कोविडशी संबंधित व्यवहारांचा अभाव दिसत आहे. पहिल्या आणि दुसर्या लाट दरम्यान जे घडले, त्यावरून आपण काही शिकलो आहोत असे दिसत नाही. लोक पुन्हा एकत्र येऊ लागले आहेत, बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे, विशेष म्हणजे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येत आहे. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया करतांना पाच स्तर आखण्यात आले आहे. जेथे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहे तेथेही शनिवार व रविवार पूर्णपणे बंदचे आदेश आहेत. मात्र याच दोन दिवशी उसळणारी गर्दी तिसर्या लाटेला आमंत्रण देणारी आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत ?
वर्षभरापासून व्यापार व व्यवसाय बंद असल्याने अनेकजण आर्थिक संकटात आहे, हे जरी सत्य असले तरी आता ज्या अटी शर्थींवर बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत, त्यांचे पालन होण्याची आवश्यकता आहे. जर कोरोना पुन्हा वाढला तर शनिवार - रविवार तर सोडाच मात्र अन्य दिवशीही दुकाने, कार्यालये उघडता येणार नाहीत, याचे भान सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. गर्दीचा हाच धागा पकडून डॉ. गुलेरिया यांनी तिसर्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये रायटर्सच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत देशात तिसरी लाट येऊ शकते. या सर्वेक्षणात जगभरातील ४० तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, साथीचे रोगशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार, तिसर्या लाटेपर्यंत अधिकाधिक लोकांना लसीकरण करून लाट नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच, दुसर्या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसर्या लाटेत ही प्रकरणे कमी आहेत, असेही म्हटले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसर्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठे कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील २-४ आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८ लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.
म्युटेशनमध्ये म्युटेशन : डेल्टा प्लस
भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका बसला महाराष्ट्राला. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. यामुळे तिसर्या लाटेची शक्यताच काळजात धस्स करणारी आहे. आताही मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी अशी भीती व्यक्त केली की गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसर्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या-दोन महिन्यात तिसर्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती व्यक्त केली आहे. चिंता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे,भारतात कोरोनाचे जे म्युटेशन सापडले आणि ज्याचा दुसरी लाट येण्यात मुख्यत्वे हात होता त्या व्हेरियंटला डब्लूएचओने डेल्टा व्हेरियंट असे नाव दिले आहे. पण आता त्या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाले आणि डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. म्हणजे म्युटेशनमध्ये म्युटेशन. हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. यामुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी राज्यभरात तयारी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी बेड तयार केले आहेत. मात्र तिसर्या लाटेबद्दल लोकांच्या मनात अनाठायी भीती आहे. पालकांच्या मनात नाहक भीती निर्माण करण्यात आल्याचे मत काही बालरोगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इंडियन ऍकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने (आयएपी) तिसर्या लाटेचे प्रमुख लक्ष्य लहान मुले असतील याची शक्यता अतिशय कमी असल्याचे गेल्याच आठवड्यात सांगितले. जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि एम्सने पाच राज्यांमध्ये सर्व्हे केला आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सिरोप्रिव्हेलेन्स दिसून आला आहे. म्हणजे या मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज आहेत, त्यामुळे मुलांना तिसर्या लाटेपासून संरक्षण मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.
Post a Comment