जगातील आयटी कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती!

संगणक युगात क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती करणार्‍या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती झाली आहे. सध्या जगभरातल्या तंत्रज्ञान आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. या यादीत सत्या नाडेला यांचेही नाव होते कारण गेली सात वर्षे ते मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची धुरा सांभाळत आहेत. सत्या नाडेला यांच्या सीईओपदाच्या कारकिर्दीत मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठ्या प्रमाणावर व्यवसायवृद्धी झाली. लिंक्डइन, नुआन्स कम्युनिकेशन्स, झेनीमॅक्स यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्सना मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्या. कंपनीने त्यांच्या नेतृत्वातखाली नवीन उंची गाठली आणि आता त्यांना त्याचे आता बक्षीसच मिळाले आहे. नाडेला जॉन थॉमसन यांची जागा घेणार आहेत. नाडेला हे कंपनीचे तिसरे अध्यक्ष होतील. यापूर्वी बिल गेट्स आणि थॉमसन कंपनीचे अध्यक्ष होते. आजच्या घडीला जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीय लोकांच्या हातात आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, पालो अल्टो नेटवर्क अशा जगप्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओ पदावर भारतीय व्यक्ती कायर्रत आहेत. हे सर्वजण जगभरात त्यांच्या कामगिरीने भारताची मान उंचावत आहेत. 



मायक्रोसॉफ्टला नवीन उंचीवर नेले

५३ वर्षीय नाडेला यांची २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती. त्यावेळी अ‍ॅपल आणि गुगल या त्यांच्या स्पर्धक कंपन्यांनी मोबाइलवर लक्ष केंद्रित करून आघाडी घेतली होती. त्या स्पर्धेत कंपनीला आणण्याचे काम नाडेला यांनी केले. जेव्हा त्यांनी हे पद सांभाळले तेव्हा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात संकटं निर्माण झाली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी कंपनीत मोठे संघटनात्मक बदल केले. १४ टक्के मनुष्यबळात कपात करून त्यांनी कॉर्पोरेट स्ट्रक्चर सुटसुटीत केले. फिनलंडमधल्या नोकिया या कंपनीचा मोबाइल विभाग आपल्या कंपनीशी त्यांनी जोडून घेतला. क्लाउड कम्प्युटिंगला त्यांनी प्राधान्य दिले. त्यांचे हे पाऊल कंपनीच्या वाढीसाठी साह्यभूत ठरले. त्यांच्या काळात डेटा सेंटर्समधून सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेस रेंटवर उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला. ऑफिस सॉफ्टवेअर फ्रँचायझीला पुनरुज्जीवित करताना क्लाउड कंप्यूटिंग, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅपिटल दोन ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली. याच काळात लिंक्डइन, नुआन्स कम्युनिकेशन्स, झेनीमॅक्स यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्सना मायक्रोसॉफ्टने विकत घेतल्या. सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. १९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. मायक्रोसॉफ्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते. २००० मध्ये मायक्रोसॉफ्ट सेंट्रलचे ते उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट बिझनेस सोल्यूशन्सचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. सत्या यांच्या या नियुक्तीने सर्व भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. 

सर्वच ठिकाणी भारतीयांचा दबदबा

जर आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आढावा घेतला तर सर्वच ठिकाणी भारतीयांचा दबदबा दिसून येतो. गुगलची प्रमुख कंपनी असणार्‍या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतवंशाचे सुंदर पिचाई कार्यरत आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे दोघे पायउतार झाल्यानंतर हे पद पिचाईंकडे आले. २०१५ पिचाई यांना गुगलचं सीईओ बनवण्यात आले होते. ४७ वर्षांच्या पिचाई यांनी आयआयटी - खरगपूरमधून शिक्षण घेतले आहे. ८० अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असणार्‍या इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्प्स म्हणजेच आयबीएमच्या सीईओपदी अरविंद कृष्णा कार्यरत आहेत. कृष्णा हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आहेत. प्रसिद्ध मोबाईल कंपनी नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे राजीव सुरी हे एप्रिल २०१४ पासून नोकियाचे प्रमुख आहेत. मूळ भारतीय वंशाच्या सुरी यांचा जन्म नवी दिल्लीचा आहे. हैदराबादचे शंतनू नारायण हे अ‍ॅडोब या एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. शंतनू यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यासह वीवर्कचे सीईओ संदीप मथरानी, डिलॉईटचे सीईओ पुनीत रंजन, नोव्हार्टिसचे सीईओ वसंत नरसिंम्हन, मास्टरकार्डचे सीइओ अजयपाल सिंह बंगा, ऑडिओ आणि इन्फोटेन्मेन्ट क्षेत्रात सेवा देणारी कंपनी हर्मन इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे दिनेश पालिवाल क्लाऊड नेटवर्किंग कंपनी अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा जयश्री उल्लाल, एवढेच नव्हे तर जगातील तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि ६० पेक्षा अधिक कंपनींचे मालक असलेले वॉरेन बफेट यांनी स्वत:च्या कंपनीतील दोन व्यक्तींना आपले वारसदार म्हणून घोषित केले आहे. यातील एक व्यक्ती ही भारतीय वंशाची असून अजीत जैन त्यांचे नाव आहे. अजित जैन यांचा जन्म भारतातील सर्वात गरीब राज्य ओडिशामध्ये झाला आहे. आयआयटी खडपूरमधून १९७२ मध्ये त्यांनी मॅकेनिकल इंजीनिअरिंगची पदवी पूर्ण केली. अशी कितीतरी जण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावत आहेत. सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

Post a Comment

Designed By Blogger