विद्यार्थ्यांची ‘ऑनलाईन’ कोंडी

दरवर्षी १५ जून म्हणजे शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा... शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प-चॉकलेट देऊन स्वागत करण्यात येते. परंतु गेल्यावर्षाप्रमाणे यंदादेखील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नव्या शैक्षणिक वर्षाची ‘ऑनलाईन’ सुरुवात झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना व तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असलेल्या या काळात शाळेची पारंपारिक घंटा न वाजता ऑनलाईन घंटा वाजली आहे. तिसर्‍या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होईल, अश भीती जगभरातील तज्ञांनी वर्तविली असल्याने आधीच पालक धास्तावलेले आहेत. एकीकडे चिमुकल्यांच्या शारिरीक आरोग्याकडे लक्ष देतांना त्यांना बच्चेकंपनीच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याच्या पद्धतीला तात्पुरता पर्याय म्हणून स्वीकाराव्या लागलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला मर्यादा आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? हा यक्ष प्रश्‍न अनेकांना सतावू लागला आहे.



विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ‘ढकलण्यात’ आले

२३ मार्चपासून देशातील सर्व शाळा-महाविद्यालयांना टाळे लागले आहे. मध्यंतरी काही दिवस शाळा सुरु करण्यात आल्या मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने त्या पुन्हा बंद करण्यात आल्या. याकाळात दोन-चार अपवाद वगळता कोणत्याही परीक्षा झालेल्या नाहीत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ‘ढकलण्यात’ आले. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे, यात कुणाचेही दुमत नाही. मागील वर्षापासून पासून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागला असला तरी ही व्यवस्था शहरांमधील मोठ्या शाळांपुरती मर्यादित आहे. ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षण रखडले आहे. हे देखील तितकेच सत्य आहे. कोरोना संसर्गाचा मुलांसाठीचा धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. कोरोनाच्या संसर्गाचे शारीरिक व मानसिक परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत. कोरोना आणि त्यातून निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीत सध्या सर्वात मोठा प्रश्न चर्चिला जात आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. राज्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भवितव्याचे काय, हा शिक्षक आणि पालकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्‍न ऑनलाईन साधनाने तात्पुरता का होईना सोडविला. इंटरनेट संवादाची माध्यमे वापरून ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. परीक्षा होतील तेव्हा होतील; पण लॉकडाऊनमुळे मुलांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान तरी टळले. यामुळे पालक आणि शाळा आश्‍वस्त झाल्या. अगदी वेळापत्रक लावून शाळेप्रमाणेच शिक्षकांचे अध्यापन सुरू झाले. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रश्‍न देणे, वेगवेगळे उपक्रम देणे, त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे, विविध उपक्रमांद्वारे त्यांचे मूल्यमापन करणे, त्यांना प्रात्यक्षिक देणे, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करणे, या सर्व गोष्टी घडू लागल्या. 

गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध घटकांवरील व्हिडीओसह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या योगदानामुळे याचा काही प्रमाणात फायदाही झाला. सरकारने टीव्हीच्या माध्यमातून तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण १२ शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांसाठी रेडिओवरील आधारित कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र ही सुविधा सर्वांपर्यंत पोहचली का? या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थकच मिळेल! कारण, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, राज्यात असलेल्या १ लाख ६ हजार २३७ पैकी ६ हजार ६०० प्राथमिकच्या आणि माध्यमिकच्या ५७० शाळांमध्ये वीज नाही, तर सुमारे ३००० हून अधिक शाळांचे वीज कनेक्शन बिल न भरल्याने कापले गेलेले आहे. ३१.७६ टक्के विद्यार्थ्यार्ंकडे मोबाईल नाही. तर राज्यभरात अद्याप ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही उपलब्ध नाही. ग्रामीण, आदिवासी पट्ट्यात असलेल्या तब्बल दहा टक्के विद्यार्थ्यांकडे अजूनही टीव्ही, मोबाईल, रेडिओ आणि ऑनलाईन शिक्षणासाठी इतर कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. या सर्व समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले, हे सत्य कुणीही नाकारु शकणार नाही. देशाचे भविष्य असणारे विद्यार्थी आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. हीच जिद्द पुढील काळात या मुलांना यशस्वी शिखरावर जाण्यासाठी मदत करेल, हे स्पष्ट आहे. मात्र याच्या काही त्रृटी देखील आहेत. 

विद्यार्थ्यांना विषयांचा आशयच समजलेला नाही

ऑनलाईन शिक्षणाने केवळ विवेचन झाले. परंतु; अनेक विद्यार्थ्यांना विषयांचा आशयच समजलेला नाही. ऑनलाईन शिक्षण पर्याय म्हणून ठिक. परंतु; तोच शिक्षणाचा मुख्य पर्याय होऊ नये यासाठी शिक्षणाची ही कोंडी फोडण्याचे आव्हान आहे. सध्याच्या काळात ऑनलाइन शिक्षणाची कल्पना युद्धपातळीवर चालू आहे. पण विद्यार्थ्यांना या शिक्षणात गोडी निर्माण झाली का, विषयाचे आकलन होते का, त्यांच्या डोळ्यांवर काही परिणाम तर होत नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न  डोळ्यांसमोर उभे राहतात. हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना झेपणार आहे का? कारण नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या मुलांना आपण हातात मोबाईल देत नाही. पण आता मोबाईलच त्यांच्याजवळ देऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा येऊ लागल्या आहेत. नेटवर्क नसणे, आवाज नीट न येणे, मुलांचा गोंधळ, शिकवलेले नीट आकलन न होणे अशा कितीतरी बाबी दृष्टीस पडत आहेत. यामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मुळात आपल्याकडे ऑनलाईन शिक्षणाचा गवगवा गत वर्षभरापासून सुरु झाला असला तरी अनेक पाश्‍चात्य देशांमध्ये आधीपासूनच याचा वापर होत आला आहे. देशात कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाट अशी सातत्याने चर्चा झाली. याचा सामना करण्यासाठी केवळ आरोग्य विभागाच्या अवतीभवती चर्चा झाली मात्र शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले, हे कटू सत्य नकाराता येणार नाही. ही परिस्थिती अजून किती दिवस राहते? याचे उत्तर कुणीच ठामपणे देवू शकत नाही. यासाठी किमान आतातरी शिक्षणाच्या बदलांवर ठोस कृती कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.

Post a Comment

Designed By Blogger