ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशीष बसू यांच्या ‘द स्कॅम’ या पुस्तकावर आधारित ‘स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सीरिज गेल्या वर्षी प्रदर्शित झाली आणि प्रचंड गाजलीही. हर्षद मेहतांचा हा एक असा घोटाळा होता ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्या पद्धतीने काम करते त्यातीली त्रुटी ओळखून हर्षद मेहता बीएसईचा अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सेंजचा बिग बुल बनला. या घोटाळ्याने शेअर बाजार आणि बँका यांच्या काम करण्याच्या पद्धतीत किती त्रुटी होत्या ते उघड केले. ही माहिती सर्वसामान्य गुंतवणुकदारांसमोर आणण्याचे काम केले ते सुचेता दलाल यांनी. आताही सुचेता यांचे नाव पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आहे. त्यांनी कोणत्याही कंपनीचे नाव न घेता परंतू ‘स्कँडल’ असा उल्लेख करत एक ट्विट केले आणि गौतम अदानी गृपचे शेअर्स कोसळले. या अनपेक्षित पडझडीने गौतम अदानी यांना तासाभरात ७३००० कोटींचे (१० अब्ज डॉलर) नुकसान सहन करावे लागले. तर गुंतवणूकदारांचे ५० ते ५५ हजार कोटींचे नुकसान झाले.
तीन परदेशी फंडांची खाती गोठवली
गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात संपूर्ण जग भरडले जात आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. औद्योगिक क्षेत्र तर पार कोलमडून पडले आहे. परिणामी सर्वंच देशांची अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहे. जगभरात मंदींचे वादळ घोंगावत आहे. साधारणत: अशी परिस्थिती आली तर त्याचे विपरित परिणाम शेअर बाजारावर होतात. २००८ साली एकट्या लेहमन ब्रदर्समुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. मात्र यंदा शेअर बाजाराने सर्व तज्ञ व विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. शेअर बाजाराने गाठलेला हा उच्चांक म्हणजे एक कृत्रिम फुगवटा असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांची ही भीती खरी तर नाही ना? यावर पुन्हा एकदा चर्चा सरु झाली आहे. कारण नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल)अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवली. या तिन्ही कंपन्या मॉरीशसची राजधानी पोर्ट लुईसच्या एका पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत. त्यांची वेबसाइटसुद्धा नाही. विशेष म्हणजे तिन्ही कंपन्या अदानी समूहातील १२ मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये मोडतात. त्यांनी आपली ९६ टक्के गुंतवणूक अदानी समूहातच केली आहे. गेल्या वर्षभरात अदानी समूहाच्या समभागांत (शेअर्स) २०० ते ९७२ टक्क्यांपर्यंतची तेजी आली होती. वर्षभरात अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये ६६९ टक्के, अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये ३४९ टक्के, अदानी एंटरप्रायझेसमध्ये ९७२ टक्के आणि अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये २५४ टक्के वाढ झाली आहे. अशीच वाढ अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये १४७ टक्के आणि अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये २९५ टक्के वाढ नोंद झाली आहे.
पत्रकार सुचेता दलाल यांच्या ट्वीटनंतर शेअर्समधील पडझड
शेअर्सच्या वाढीमुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अदानी समुहाचे शेअर्स अचानक कसे वाढले? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यावरील कारवाईच्या खोलात गेल्यावर मिळू शकते. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडनुसार अदानीच्या कंपन्यांमध्ये या तिघांची एकूण गुंतवणूक ४३,५०० कोटी रुपये आहे. ही खाती फ्रिज केली गेली कारण सेबीकडे त्यांच्याविषयी माहिती नाही. तसेच, या पैशांचे मालक कोण आहेत, हे देखील माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एनएसडीएलच्य कारवाईनंतर अदानी समूहाचे शेअर्स २५ टक्के पर्यंत गडगडले. ग्रुपच्या ६ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. अदानी समूहाकडून खंडन झाल्यानंतर शेअर्समध्ये सुधारणा झाली. या सरणीमुळे अदानी समूहाची नेटवर्थ ९.५ लाख कोटी रुपयांवरून ८.९ लाख कोटींवर आली. म्हणजे त्यात ६० हजार कोटींची घट झाली. फोर्ब्जनुसार गौतम अदानींची वैयक्तिक संपत्ती ५.४७ लाख कोटींवरून ५.०७ लाख कोटी रुपयांवर घसरली. एनएसडीएलच्या कारवाईनंतर तिन्ही विदेशी फंड कंपन्या आपली भागीदारी विकू शकतील ना आपली भागीदारी वाढवू शकतील. अदानी ग्रुपच्या शेअर्समधील पडझड पत्रकार सुचेता दलाल यांच्या ट्वीटनंतर सुरू झाली. त्यांनी अदानींचे नाव न घेता या घटनाक्रमाला ‘स्कँडल’ संबोधले. त्यांनी हे ट्विट शनिवारी केले होते. त्यानंतर सोमवारी मार्केट सुरु झाल्यानंतर कारवाईचे वृत्त धडकले आणि गुंतणूकदारांनी अदानी समूहातील शेअरची चौफेर विक्री सुरु केली. ज्यामुळे अदानी एन्टरप्राइजेसचा शेअर २० टक्क्यांनी कोसळला होता. तसेच अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी गॅस यांच्यात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि तिन्ही शेअरला लोअर सर्किट लागले. यामुळे या शेअरची आणखी पडझड थांबली.
बड्या समुहांचे असे ‘स्कँडल’ सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त करु शकतात.
अदानी समूहाबाबत आलेल्या वृत्तानंतर या समूहातील शेअरबाबत किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा सल्ला शेअर बाजार विश्लेषकांनी दिला आहे. सध्या अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात चढ -उतार दिसून येईल तसे अनिश्चितता निर्माण झाली आहे. ही अनिश्चितता केवळ अदानी समुहाच्या बाबतीत नसून अनेक बड्या कंपन्यांबाबतीत आहे. मुळात कोणतेही ठोस कारण नसतांना होणारी ही वाढ कृत्रिम असून हा फुगवटा कधीही फुटू शकतो, असा इशारा अनेक तज्ञ वारंवार देत आहेत. यापार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधान राहण्याची आवश्यकता आहे. शेअरबाजारात चढ उतार नवे जरी नसले तरी अशा प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार होरपळता. याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चुकवावी लागते, ते वेगळेच यासाठी सुचेता दलाल यांच्या सारख्या तज्ञांनी केलेल्या इशार्याकडे गांभीर्यांने पाहण्याची वेळ आली आहे. नोटाबंदीनंतर रुळावरुन घसरलेली अर्थव्यवस्था अजूनही सुरळीत झालेली नाही. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. आज सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर आहेत. रिअल इस्टेट मंदीच्या फेर्यात अडकले असले तरी त्यांचे भाव अजूनही ‘सातवे आसमान’ पर आहेत. अशा परिस्थितीत अनेकांचा ओढा शेअर मार्केटकडे वाढला आहे. अनेकजण जे थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नसले तरी त्यांचा पैसा म्युच्यूअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्येच गुंतलेला आहे. यामुळे बड्या समुहांचे असे ‘स्कँडल’ सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त करु शकतात.
Post a Comment