राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांत सवलती दिल्या आहेत. त्यानुसार १ जूनपासून २१ जिल्ह्यांत मॉल सोडून जवळपास सर्व दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार आहेत. गत ५६ दिवसांनंतर दुकाने उघडल्याने मंगळवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात राज्यभरात दिसले. पहिली लाट ओसरत असतांना जी चूक झाली तीच चूक आता आपण पुन्हा करायला निघालो आहोत. बाजारपेठेत विनामास्क फिरणारे हे कोरोनाच्या तिसर्या लाटेचे आमंत्रक ठरणार आहेत. मी लस घेतली आहे, आता मला कोरोनाची काय भीती? अशा आविर्भावात वावरणे निश्चितपणे धोकादायक आहे. अशाने पुन्हा कोरोना वाढला तर पुन्हा लॉकडाऊन, ऑक्सिजन-बेडसाठी पुन्हा फिरफिर येणारच! हे टाळण्यासाठी लॉकडाऊन शिथिल होत असतांना गाफिलपणा नकोच.
बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना जास्त जवळ येणार
एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्यापैकी ओसरल्याचे चित्र आहे. आज जून महिन्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख २७ हजार नवे रुग्ण सापडले असून, २ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात कोरोनाच्या १ लाख २७ हजार ५१० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजेच या २४ तासांत तब्बल २ लाख ५५ हजार २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणार्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. देशात सध्या दैनंदिन सक्रिय रुग्णसंख्या दोन लाखांच्या आत आली आहे. काही दिवसांपूर्वीच रोज चार लाखांवर नवे रुग्ण सापडत होते. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यासारखे आशादायक चित्र जरी दिसत असले, तरी अजूनही धोका टळलेला नाही. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे.
अजूनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही
देशात लसीकरण सुरु झाले असले तरीही आपण शंभर टक्के सुरक्षित झालो असे नाही. कारण संपूर्ण देशात १०० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही. त्यामुळे कोरोनाची ही लढाई अजून किमान वर्ष-दोन वर्षे तरी लढावी लागणार आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुणे हे खबरदारीचे उपाय आपल्याला सुरुच ठेवावे लागणार आहेत. कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दीर्घकालीन निश्चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आजही बाजारात विनाकारण होणारी गर्दी, रस्त्यांवर फिरणारे रिकामटेकडे यांना वेळीच रोखले नाही तर परिस्थिती अजून खराब होवू शकते. लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे अर्थकारणाला खीळ बसली आहे, हे जरी खरे असले तरी ‘जान है तो जहान है’ हे लक्षात ठेवावे. सध्या सुरु असलेल्या निर्बंधात दुपारी वाजेपर्यंत घराबाहेर पडण्याची मुभा असल्याने यावेळेत खरेदीसाठी उसळणारी गर्दी धोक्याची घंटा असेल. हे चित्र असेच असले तर तिसर्या लाटेला आमंत्रण दिल्या सारखे होईल, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांनाही धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. डबल म्युटेशनमुळे राज्यात संसर्गाचा प्रसार तीव्रतेने झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे आगामी काळात गाफिल राहून चालणार नाही. पहिल्या लाटेदरम्यान दुसर्या लाटेचा इशारा देण्यात आला होता मात्र केंद्र सरकार, राज्य सरकारसह सर्वच जण गाफिल राहिल्याने आता दुसर्या लाटेत त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. दुसर्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात सुमारे दिड महिन्यांपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याकाळात याचे फारसे पालन झाले नसले तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. राज्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. आपल्याकडे रोज ६० ते ७० हजार रुग्ण निघत होते. त्यांची संख्या आता २० हजारापर्यंत कमी झाली आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता
महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत असेल तर हे निश्चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायला हवी. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. आधी लोक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते आता प्रत्येकाला लसींचे महत्व पटले असल्याने लसीकरणासाठी गर्दी होवू लागली आहे मात्र सध्या लसीच उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण राज्यात अजूनही हर्ड इम्युनिटी आलेली नाही. कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला काही होणार नाही, माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, अशा भ्रमात न राहणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सर्वकाही राज्य व केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही. शासनाने अजून काही दिवस निर्बंध लादले तरी थोडी कळ सोसावी लागणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.
Post a Comment