ओएनजीसीचा अतिआत्मविश्‍वास अन नौदल, तटरक्षक दलाचे धाडस

तौक्ते चक्रीवादळात मुंबईपासून १७६ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात पी ३०५ हा बार्ज बुडाला आणि किमान ३७ जणांचा मृत्यू झाला तर १८६ जणांना नौदलाने सुरक्षित बाहेर काढले. ३८ कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. मात्र, तोक्ते चक्रीवादळाचा इशारा मिळूनही हे बार्ज भर समुद्रात का थांबले? या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. काय चुकले आणि ही दुर्घटना कशामुळे घडली, हे शोधून काढण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चसदस्यीय समिती स्थापन केली आहे. चौकशी अहवालात सत्य सामोर येईलच मात्र समुद्री लाटा आमच्या इशार्‍यावर नाचतात यामुळे हे वादळं आमचं काय करु शकेल? असा अतिआत्मविश्‍वास ओएनजीसीला नडला आणि ३७ कर्मचार्‍यांना हकनाक बळी गेला.३७ कर्मचार्‍यांना हकनाक बळी

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे मोजमाप करण्याचे काम सुरु झाले आहे. या वादळाने महाराष्ट्र, गुजरातसह अन्य काही राज्यांची अपरिमित हानी केली आहे. यात झालेले भौतिक नुकसान येत्याकाळात भरुनही निघेल मात्र ज्यांचा जीव गेला ते कधीच परत येणार नाहीत. अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये जिवीत हानी होत असते मात्र ओनजीसीच्या प्रकल्पात झालेली दुर्घटनेकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहता येणार नाही. हवामान खात्याने ११ मे रोजी संध्याकाळीच अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका असल्याचे जाहीर केले होते आणि १५ मे पर्यंत सर्व बोटींनी किनार्‍यावर यावे अशी सूचना केली होती. ओएनजीसीला देखील सगळी जहाजे बंदरात सुरक्षित ठिकाणी आणावीत, असा इशारा तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांनी दिला होता. पण या इशार्‍यांनंतरही पी-३०५ हे जहाज समुद्रातच होते आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आले होते. वादळाच्या तडाख्यात तिथून सुटून हे जहाज पाण्यात भरकटू लागले आणि ही दुर्घटना घडली. तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप घेतल्यामुळे मुंबई हाय या तेल विहिरींच्या परिसरात असलेल्या हिरा विहिरीजवळील पी ३०५, गॅल कन्स्ट्रक्टर आणि एसएस-३ हे तीन निवासी तराफे, तसेच सागर भूषण हा तेल फलाट भरकटला. त्यापैकी पी ३०५ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावर त्यावेळी २६१ कर्मचारी होते. खवळलेल्या समुद्रात नौदल, तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. खोल समुद्रात जिवावर उदार होऊन काम करणार्‍या तंत्रज्ञांची मोठी संख्या लक्षात घेता, तेथे काही अघटित घडले तर ते कितीजणांच्या जिवावर बेतेल, याची भीती व्यक्त होत होती. जीव वाचविण्यासाठी अनेक कर्मचार्‍यांनी जीवरक्षक जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. नौदल आणि तटरक्षक दल यांच्या बचाव पथकाने जिवावर खेळून त्यातील १८० जणांची सुटका करण्यात यश मिळविले. सागरातील त्या जीवघेण्या प्रसंगातून बचावलेल्यांनी जे काही सांगितले त्यावरून चक्रीवादळाचे थैमान सुरू असताना मृत्यूनेही त्या परिसरात कसे तांडव मांडले होते, याची केवळ कल्पनाच करता येईल. 

अतिआत्मविश्‍वासामुळे अनेकांचा जीव गेला!

पी ३०५ हा एक निवासी बार्ज होता, म्हणजे तेलक्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या राहण्याची सोय या जहाजावर करण्यात आली होती. पण त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, यावरून टोलवाटोलवी होताना दिसते आहे. जिथे हे जहाज काम करत होते, तो प्रकल्प ओएनजीसीचा आहे. मात्र ओएनजीसीने या प्रकल्पाचे कंत्राट अन्य एका खासगी कंपनीला दिले आहे, जी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे. जर हवामान खात्याने वेळीच इशारा दिला होता तर हे बार्ज किनार्‍यावर न आणता एका प्लॅटफॉर्मला का बांधून ठेवण्यात आले, हा मुख्य प्रश्‍न आहे. जेव्हा बार्ज बुडत होते तेव्हा बार्जची मालकी असणार्‍या डरमॅस्ट कंपनीच्या मालकांनी वेळेवर योग्य उपाययोजना करुन कामगारांचे जीव वाचवणे अपेक्षित होते. पी ३०५ बार्ज डोळ्यांदेखत अवघ्या काही मिनीटात बुडाले. तेव्हा भारतीय नौदल मदतीला धावले मात्र आमच्या कंपन्यांनी आमच्यासाठी काहीच केले नाही असे परत किनार्‍यावर आलेल्या अनेक कामगारांनी सांगितले. या दुर्घटनेसंदर्भात पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे. कंपनी आणि अधिकार्‍यांच्या अतिआत्मविश्‍वासामुळे यात अनेकांचा जीव गेला आहे. 

ओएनजीसीच्या आपत्कालीन यंत्रणेचे अपयश उघड 

तौक्ते चक्रीवादळाचा इशारा मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि किनारपट्टी लगतच्या सर्वच राज्यांच्या नियोजनामुळे लाखों लोकांना वेळेवर सुरक्षितस्थानी हलविण्यात आल्यामुळे यात अनेकांचे जीव वाचविण्यात यश आले. यामुळे संबंधित यंत्रणांचे देशभरात कौतूक होत आहे. मात्र दुसरीकडे ओएनजीसी प्रकल्पात घडलेली दुर्घटना हा निष्काळजीपणा व कर्मचार्‍यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकारच म्हणावा लागेल. साधारणपणे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळापासून समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून मोठ्या बोटी समुद्रात जात नाहीत. मात्र, ११ मे रोजी वादळाचा इशारा मिळूनही कामगारांसह  बार्ज समुद्रातच थांबले. जेव्हा पहिली सूचना मिळाली, तेव्हाच बार्ज किनार्‍यावर आणले असते तर कदाचित कोणाचेच जीव गेले नसते. पण, बार्जशी संबंधित असलेल्या सर्वच यंत्रणांचा हलगर्जीपणा या दुर्घटनेला जबाबदार ठरला. जर समुद्रात उत्खनन करणार्‍या कंपन्यांच्या इतीहास पाहिल्यास येथे अनेक दुर्घटना घडतच असतात. कधी तेल गळती होते, तर कधी वायू गळती. कधी आग लागून जीवितहानी होते. यापूर्वी, जुलै २००५ मध्ये या तेल फलाटावर मोठी आग लागली. त्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या आदल्या दिवशी २६ जुलै रोजी पावसाने मुंबई आणि परिसराची दाणादाण उडवून दिली होती. तेंव्हा परिस्थिती इतकी बिकट होती की या तेल विहिरींवरील बचाव कार्यासाठी ओएनजीसीची हेलिकॉप्टर्स उड्डाणही करू शकली नव्हती. ती दुर्घटना घडल्यानंतरही आपत्कालीन स्थितीत नेमके काय करायला हवे, याचा बोध न घेतल्याचे भीषण परिणाम आता पाहायला मिळाले. ओएनजीसीच्या आपत्कालीन यंत्रणेचे अपयश यातून उघड झाले आहे. 


Post a Comment

Designed By Blogger