टूलकीट : राजकारणामुळे देशाची प्रतिमा डागाळली

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने स्थिती बिकट असतांनाही याविषयावरुन सुरु असलेले राजकारण काही थांबत नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित असलेल्या या राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी कधी सुरु केली हे लक्षातच आले नाही. आता टूलकीटच्या निमित्ताने यावर चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान टूलकीटच्या आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश झाला होता. कोरोना काळात आता असेच टूलकीट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने हे टूलकीट तयार केले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. तर काँग्रेन नेत्यांनी भाजपाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र या टूलकीटमध्ये नमूद असलेले कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला ‘इंडियन व्हेरियंट’ हे नाव आता जगभरात पसरले आहे. विदेशी माध्यमे जळत्या मृतदेहांचे फोटो छापत आहेत. कुंभमेळा, गंगा नदीत वाहणारे मृतदेह यावर विदेशी माध्यमे भरभरुन लिहीत आहेत. वरकरणी हे जितके सहज दिसते तशी परिस्थिती नसून यातून आता भलताच वास येवू लागला आहे.



टूलकीट हे एक डिजिटल हत्यार

काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने एक ट्वीट केले होते. त्यासोबत एक टूलकीट शेअर केले होते. त्या टूलकीटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलन कशा प्रकारे करण्यात यावे याची माहिती देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विस्तार कशा पद्धतीने करायचा, काय पाऊले उचलायची याची सखोल माहिती या टूलकीटमध्ये देण्यात आली होती. शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट करताना कोणता हॅशटॅग वापरायचा, काय ट्वीट करायचे तसेच सरकारच्या कारवाईपासून कसा बचाव करायचा याची सखोल माहितीही देण्यात आली होती. नंतर यावरुन वाद झाल्याने ग्रेटा थनबर्गने ते टूलकिट डिलीट केले. यानंतर आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हिच्या ट्विटवरुन देखील मोठे वादंग निर्माण झाले होते. टूलकीट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या आंदोलनात अशा प्रकारचे टूलकीट पहिल्यांदा चर्चेत आले होते. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो. टूलकीटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते. आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावे, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती या टूलकीटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकीटच्या माध्यमातून देण्यात येते. 

कोणं खोटं बोलतयं आणि कोण खरं?

आता व्हायरल होणार्‍या नव्या कथित टूलकीटमध्ये विविध विषयांवर निर्देश देण्यात आले आहेत. यातील एक विषय हा पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलीन करण्यासंबंधीचा आहे. पंतप्रधान मोदींना कठड्यात उभे करून त्यांच्यावर सोशल मीडियातून प्रश्न विचारले जावेत. तसेच यात टूलकीटमध्ये अमित शहा बेपत्ता, जयशंकर क्वारंटाइन, राजनाथ सिंह साइडलाइन, इन्सेन्सेटिव्ह निर्मला, अशा शब्दांचा उपयोग करण्याचा आणि वेळोवेळी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच धरतीवर काँग्रेस नेते राहुल गांधीसह काही नेते सतत पंतप्रधान मोदींवर वैयक्तीक पातळीवर हल्ले करत आहेत. प्रत्येक काँग्रेस नेता करोनाच्या नवीन व्हेरियंटला मोदी व्हेरियंट सारख्या शब्दांचा उपयोग करत आहेत. गेल्या काही दिवासांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, गुलाम नवी आझाद यासारख्या नेत्यांकडून पत्र लिहिण्यात आले. हे सर्व नेते टूलकीटमधील हेच शब्द वापरत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने पलटवार करत भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. भाजपचे दावे निराधार असून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह इतर नेत्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यात कोणं खोटं बोलतयं आणि कोण खरं? हे आताच सांगणं थोडसं कठीण असलं तरी यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नकारात्मक प्रतिमा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. 

बेताल वक्तव्यांमुळे भारताची प्रतिमा डागाळली

अनेक परदेशी माध्यमे भारताविरोधात रकाणेच्या रकाणे भरुन लिहीत आहेत. हे क्लेशदायक आहे. टूलकीटमुळे भारताची होणारी बदनामी काय कमी होती की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी कोरोना संबंधी केलेल्या एका वक्तव्यावरुन भारत-सिंगापूरमधील संबंध ताणले गेले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. यामुळे दिल्लीला कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेचा धोका आहे, असे वक्तव्य केजरीवाल यांनी केल्यानंतर सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुक्तांना बोलावून कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिक्रियेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले. दिल्लीचे मुख्यमंत्री हे भारताच्या वतीने बोलत नाही. यामुळे दोन्ही देश करोनाच्या या संकटात एकजुटीने लढतील, असे जयशंकर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात सिंगापूर भारताच्या मदतीला धावून येणार्‍या प्रमुख देशांपैकी एक आहे मात्र अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा डागाळली गेली आहे. यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य थांबवणे गरजेचे आहेत. राहिला विषय टूलकीटचा विषय तर टूलकीटचा मुद्दा भारतीय सायबर कायद्याच्या कक्षेत येतो. सायबर दहशतवाद हाही शिक्षापात्र गुन्हा असून, त्याअंतर्गत देण्यात येऊ शकणारी कारावासाची शिक्षा जन्मठेपेपर्यंत प्रदीर्घ असू शकते. आता इंटरनेटवर व्हायरल होणारे टूलकीट नेमके कुणी तयार केले? त्याचा हेतू काय होता? हे तपासाअंती समोर येईलच मात्र या टूलकिटचा हेतू भारताची प्रतिमा डागाळणे हा होता, यावर तीळमात्रही शंका नाही.

1 comment :

Designed By Blogger