‘तौक्ते’ने शेतकर्‍यांचे नुकसान

गेली चार-पाच वर्षे निसर्गाच्या प्रकोपाचे सातत्याने बळी ठरलेल्या शेतकर्‍यांचे कंबरडे पार मोडले आहे. आताही ‘तौक्ते’ चक्रीवादळाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वारा व पावसामुळे आंबा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. या चक्रीवादळाने तिन दिवसात पाच राज्यातील २३ जणांचा बळी घेतला असला तरी एनडीआरएफ आणि प्रशासनाच्या सतकर्र्तेमुळे आपण मोठी जीवित हानी टाळण्यात यशस्वी झालो आहोत असे म्हणावे लागेल. आता महसूल विभागाने तातडीने पडझड व नुकसानीचे पंचनामे करायला हवेत. कारण पावसाळा तोंडावर आल्याने अनेक शेतकर्‍यांनी पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. आधीच गत दिड वर्षांपासून कोरोना व लॉकडाऊनच्या चक्रव्ह्यूवात अडकलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. शासनानेही केवळ मदतीच्या घोषणांचे शासकीय व राजकीय सोपस्कार न पार पाडता ती मदत तातडीने शेतकर्‍यांच्या हाती कशी पडेल? यावर लक्ष दिले पाहिजे.नौदलाने मदत कार्यात बजावलेली कामगिरी उल्लेखनीय

मानव निर्मित आणि नैसर्गिक संकटांची मालिका पाठ सोडण्याचे नाव घेत नसतांना आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने हाहाकार माजवून दिला. अरबी समुद्रातून गुजरातकडे प्रयाण करताना मुंबईसह कोकण किनारपट्टीला तडाखा देणार्‍या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. किनार्‍यावर बांधून ठेवलेल्या शेकडो बोटी वादळाच्या तडाख्याने फुटून उद्ध्वस्त झाल्या असून अनेक बोटींना जलसमाधी मिळाली. तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या २७६ कामगारांपैकी १८४ जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले असले तरी अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या पाच राज्या २३ जणांचा बळी गेला असून यातील सर्वाधिक म्हणजे ११ मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झालीय. यातील रायगड जिल्ह्यात ४, रत्नागिरीत २, ठाण्यात २ तर सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रातील ६,३४९ गावांना तौत्के चक्रीवादळाचा फटका बसल्याचे अधिकृत आकडेवारी सांगतेय. असे असले तरी या चक्रीवादळाचे अक्राळविक्राळ रुप पाहता मोठी जीवित हानी टाळण्यात यश आले आहे. हवामान खत्याने या चक्रीवादळाचा अंदाज वर्तविल्यानंतर किनारपट्टीवरील लाखों लोकांने त्वरीत स्थलांतर करण्यात आले. त्यात स्थानिक प्रशासनाबरोबरच एनडीआरएफ या केंद्रीय यंत्रणेचा वाटा मोलाचा आहे. लष्कर आणि विशेषत: नौदलाने मदत तसेच बचाव कार्यात बजावलेली कामगिरीही उल्लेखनीय आहे. 

राज्य व केंद्र शासनाने तातडीने मदतीचा हात देणे आवश्यक

नौदलाने अरबी समुद्रात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोठमोठ्या युद्धनौकांसोबत आयएनएस तेज. आयएनएस बेतवा, आयएनएस बीस आदी युद्धनौका आणि विमाने शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली असून ते अद्याप बेपत्ता असलेल्या ८९ कामगारांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत आपात्कालीन यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. पण आता प्रशासनासमोर आव्हान आहे, ते झालेल्या नुकसानीला तोड देण्याचे. या संपूर्ण परिसरातील पिके आणि कोकण किनारपट्टीवरील आंबे-काजू तसेच नारळी-पोफळींचे झालेले नुकसान मोठे आहे. आंब्याचा हंगामच हातचा गेला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाळी पिके, फळ बागा, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीच्या; तसेच घरे, आस्थापना यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून भरपाई शक्य तितक्या लवकर लाभार्थींना दिली पाहिजे. हानी झालेल्या सार्वजनिक मालमत्तांची डागडुजीही शक्य तितक्या लवकर करावी, कारण पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे आता या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने होतील आणि मुख्य म्हणजे तेथे मदतही वेळेत पोहोचेल, याचे नियोजन करायला हवे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान केलं होतं. त्यावेळी सरकारने केलेली मदत ही अपुरी होती पण आता तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवं. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांच्या मागे लागलेला समस्यांचे वादळ थांबायचे नाव घेत नाही. कारोना अजूनही कमी झालेले नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी अजून काही महिने लागतील. यामुळे राज्य व केंद्र शासनाने तातडीने मदतीचा हात देणे आवश्यक आहे. 

वारंवार येणार्‍या वादळांवर संशोधन होणे आवश्यक 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अन्य सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर ठोस निर्णय घ्यावा. विरोधीपक्षानेही केवळ सरकारवर टीका न करता शेतकर्‍यांना मदत कशी मिळेल यासाठी सरकारला मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी. यात सर्वात महत्वाचे म्हणजे वादळी पावसामुळे अनेक ठिकाणचे वातावरण बदलले आहे. अशा वातावरणात काही साथरोग पसरण्याची दाट शक्यता असते. आधीच आपली आरोग्य यंत्रणा कोरोनापुढे हतबल झाली आहे. त्यामुळे संकटात भर पडायला नको म्हणून स्थानिक आरोग्य विभागाने जंतनाशक फवारणी, धुराळणी करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास गावागावात आरोग्य तपासणी शिबीर भरवून वेळीच उपयायोजना करणे आवश्यक आहे. यासह दरवर्षी अशा प्रकारची संकटचे भारताच्या दरवाज्यावर धडक मारत असतात. त्यात मोठे नुकसान होत असते. वारंवार येणार्‍या वादळांवर संशोधन होणे आवश्यक आहे. कारण पूर्वी अशी वादळे ही प्रामुख्याने देशाच्या पूर्व किनारपट्टीवर येऊन धडकत असत. मात्र, अलीकडे या वादळांनी आपली दिशा का बदलली, याचाही या निमित्ताने अभ्यास व्हायला हवा. तूर्तास तरी ओडिशातील वादळाप्रमाणेच या “तौक्ते’ला समर्थपणे तोंड देणार्‍या एनडीआरएफ आणि अन्य लष्कर, नौदल आदी संबंधित यंत्रणांना, त्यांनी पावसा-पाण्याची तमा न बाळगता बजावलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद द्यायला हवेत. आता पुढची जबाबदारी राज्याच्या महसूल खात्याचीच आहे. पंचनामे करण्यापासून ते मदत पुरवण्यापर्यंतची जबाबदारी ही याच खात्यावर असते. या वादळवार्‍यात आपल्या सर्व यंत्रणा सक्षमपणे काम करू शकतात, याची साक्ष मिळाली आहे. आपली शासन व्यवस्था फक्त संकटकाळातच झडझडून काम करते, अशी प्रतिमा व्हायची नसेल तर या पुढच्या बाबींची कार्यवाही तातडीने व्हायला हवी.

Post a Comment

Designed By Blogger