जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणार्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यास जबाबदार कोण? या मुद्द्यावर आखाड्यांमध्ये जुंपली आहे. संन्यासी आखाड्यामुळे कुंभमेळ्यात कोरोना पसरला असा आरोप बैरागी आखाड्याने केला आहे. याचबरोबर काही आखाड्यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे कुंभमेळ्याची तुलना गेल्यावर्षी झाल्या दिल्लीतील तबलिगींच्या मरकजशी देखील केली जात आहे. तबलिगींची मरकज परिषद आणि कुंभमेळ्याची तुलना करणे योग्य नसले, तरी दोन्हींमुळे कोरोनाचा प्रसार झाला, ही त्यातील समान बाब आहे. मात्र दोघांमधील मुख्य फरक म्हणजे परदेशातून आलेले तबलिगी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचार्यांवर थुकंत होते, असहकार्य करत होते तर, हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी आलेल्या काही आखाड्यांनी कोरोना आपत्तीचे गांभीर्य ओळखून ३० एप्रिलला नव्हे, तर त्याआधीच उत्सवसमाप्तीची भुमिका घेत परतीची घोषणा केली. दरम्यान शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करून समाप्त करण्याचे आवाहन केले. यास अनेक आखाड्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धर्मापेक्षा मानवताच या जगात सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली आहे.
कुंभमेळा, मरकज यांची तुलना योग्य नाही
प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडांत दर बारा वर्षांनी कुंभमेळा होत असतो. यंदा उत्तराखंडमधील हरिव्दारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव झाला असून, मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. अनेक साधू आणि भाविकांना संसर्ग झाला आहे. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये एका महिन्याच्या आत कोरोना रुग्णांची संख्या ८८१४ टक्क्यांनी वाढली आहे. १ ते १५ एप्रिलदरम्यान राज्यात १५,३३३ जणांना करोनाचा संसर्ग झाला. कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले १२ एप्रिलला आणि दुसरे १४ एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे ५० लाख भाविक गंगा नदीवर आले होते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कुंभमेळा सुरू ठेवण्यावरून सरकावर टीकाही सुरु आहे. कोरोनाचा देशभरात पुन्हा वेगाने संसर्ग वाढत असतांना केंद्र सरकार व उत्तराखंड सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोपही होत आहे. कुंभमेळ्यात वाढती कोरोना बाधितांची संख्येवरुन त्यात तथ्य आढळून येते. आतापर्यंत झालेल्या दोन्ही शाही स्नानावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी मरकजच्या आयोजनावरून बराच गोंधळ झाला होता. त्यामुळे देशातील कोरोनाचा संसर्ग आणि मरकज, कुंभमेळा यांची तुलना केली जात आहे. मात्र अशी तुलना करणे योग्य नाही. तुलना करायचीच असेल तर पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराशी केली पाहिजे.
दोष कुणाच्या माथ्यावर मारायचा?
या राज्यांमध्ये भाजपासह सर्वच पक्षांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवले आहे. तेथे होणार्या राजकीय सभा, रोड शोला उसळणार्या गर्दीचे चित्रण संपूर्ण देशाने छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलेच आहे. जशी कुंभमेळ्याला गर्दी उसळली आहे तशीच गर्दी पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उसळलेली दिसते. याचा दोष कुणाच्या माथ्यावर मारायचा? कुंभमेळ्याला येणार्या प्रत्येकाने कोविड नसल्याचा अहवाल घेऊन हरिद्वारमध्ये प्रवेश करावा, मास्कचा वापर करावा आणि सामाजिक अंतर पाळून सर्वांचा वावर असावा, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. मात्र या नियमांची अंमलबजावणी झाली नाही, हे मान्यच करावे लागेल. यास उत्तराखंड सरकारसह केंद्र सरकारही तितकेच जबाबदार आहे. आता कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. हरिद्वारमध्ये पाच दिवसांत दोन हजारहून अधिक जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत आहे.
धर्म जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा मानवता महत्वाची
पंतप्रधानांनीही सर्व आखाड्यांना तसे आवाहन केले आहे, मात्र आता उशिर झाला आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. उत्तर प्रदेशाच्या सीमेवरील या शहरात हा मेळा होत असताना उत्तर प्रदेशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे. दिल्लीतही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पहिल्या लाटेदरम्यान देशातील सर्व मंदिरे, चर्च, मस्जिद बंद राहिली, म्हणून कोरोनाची साथ नियंत्रणात राहण्यास मदत झाली. ही सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील वारकर्यांनी नवा आदर्श दाखवून दिला तो निश्चितच स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रात पांडुरंगाची वारी दरवर्षी आषाढी, कार्तिकीला निघते. जोतिबाची यात्रा चैत्र पौर्णिमेला सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत भरते. जेजुरीला खंडेरायाची यात्रा भरते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व वारकर्यांनी आपआपल्या वार्या व जत्रा स्थगित केल्या. राज्यातील कोट्यवधी भाविकांनीही त्याला प्रतिसाद दिला. वार्या रद्द झाल्या म्हणून वारकरी संप्रदायाने फारसे आकांडतांडव न करता कोरोना नियमावली स्वीकारली. देवासाठी मंदिरातही जाण्याची गरज नाही. तो भक्तांच्या हृदयात असतोच हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले आहे. धर्म जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा मानवता महत्वाची आहे आणि हेच हिंदू धर्मशास्त्रातही म्हटले आहे. याचे पालन कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात करण्याची आवश्यकता आहे.
Post a Comment