महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीरसह उपचारासाठी बेड व आरोग्य कर्मचार्यांचा तुटवडा असतांना यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याऐवजी या भीषण परिस्थितीतही राजकारण सुरु आहे. कोरोनाशी निगडीत जवळपास प्रत्येक विषयामध्ये राज्य सरकार विरुध्द केंद्र सरकार हे राजकारण रंगत असतांना कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटाच्या कालावधीमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही, असा खोटारडा अविर्भाव देखील राजकारण्यांकडून आणला जात आहे. देशातील करोनाची अशी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज दोन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची वाढ होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर रुग्ण वाढत चालले तर त्यांच्यावर उपचार करण्याची गंभीर परिस्थिती आगामी काळात निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याच राजकीय पक्षाने राजकारण करण्याची गरज नाही, एवढी अक्कल या संधीसाधू राजकारण्यांना नसावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव्यच म्हणावे लागेल!
चिंता वाढवणारी आकडेवारी
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १४ कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल २,७३,८१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,६१९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,५०,६१,९१९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात १,७८,७६९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यापे वाढत असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात विक्रमी रुग्णवाढ होत असून, रुग्णांचे बेडसह इतर मुलभूत आरोग्य सुविधांअभावी अतोनात हाल होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहचल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ऑक्सिजनच्या मुद्यावरुन जसे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे.
राजकारण नक्की कोण करतेय?
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला होणारा लसींचा पुरवठा असो किंवा महाराष्ट्रात जाणवणारी ऑक्सिजनची टंचाई असो किंवा रेमडेसिविर या इंजेक्शनची टंचाई असो या सर्वच विषयांमध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हे राजकारण सध्या रंगत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस देशात सर्वात जास्त असूनही त्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या वादावर ÷अद्याप तोडगा निघाला नसतांना महाराष्ट्राला कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शने मिळावीत यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोपही राज्यातील सत्ताधार्यांनी करत केंद्रावर निशाणा साधला आहे. मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्या एका फार्मा कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतल्याच्या मुद्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांनी अत्यंत खालची पातळी गाठली, जी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणार आहे. राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असतांना त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. त्याआधी महाराष्ट्रात करोना लसींची उपलब्धता वाढविण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूटसारख्या संस्थेला लस निर्मितीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा राजकीय फायदा घेण्यासाठी मनसे व शिवसेना आमनेसामने आल्याचे अवघ्या महराष्ट्राने पाहिले. देशातील कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले जावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातील परिस्थिती कशी नियंत्रणात आणणार? यावर सेनेने सोईस्कर चुप्पी साधली आहे. यावर कुणी काही बोलले तर आम्हाला राजकारण करायचे नाही असे एकीकडे म्हटले जात असताना मग राजकारण नक्की कोण करतेय, असा प्रश्न जर सामान्य नागरिकांना पडला आहे.
राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होवू शकते
याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या भूमिकेचे मात्र कौतुक करायला हवे. केंद्र सरकारकडून आम्हाला संपूर्ण प्रकारची मदत मिळत आहे अशी स्पष्ट कबुली त्यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासारखे प्रमुखनेत्यांनी संयमी भुमिका घेतली असली तर त्यांच्याच पक्षातील काही नेते वाद निर्माण करण्यात व्यस्त आहेत. सध्या राज्याला ऑक्सिजनची निकडीची आवश्यकता आहे. कारण राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रेल्वेने नेता येऊ शकेल का याची विचारणा रेल्वेकडे केली होती. त्यास केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वेमार्फत ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालवण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा केला. भविष्यातही अशाच प्रकारचा समन्वय राज्य व केंद्र सरकारमध्ये राहणे गरजेचे आहे. सरकारच्याच उच्चस्तरीय समित्यांच्या वेगवेगळ्या अहवालांनुसार, कोरोनाची ही दुसरी लाट भयंकर गंभीर आहे यामुळे किमान या संकटसमयी तरी राजकारणचे जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला गैरवशाली इतीहास आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या खालच्या पातळीवरील राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होवू शकते, याचे भान राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी ठेवायला हवे.
Post a Comment