राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन करण्याचे राज्य सरकारने जवळपास निश्चित केले आहे. मंगळवारी गुढीपाडवा आणि बुधवारी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांची जयंती असल्याने हे दोन्ही दिवस सोडून गुरुवारी १५ एप्रिल रोजी लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. गतवर्षी अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे प्रचंड हाल झाले. स्थलांतरीत मजूरांना घरी परण्यासाठी पायपीट करावी लागली, हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे. गरीब व सर्वसामान्यांवर ही वेळ पुन्हा येवून नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करतांना त्याची कल्पना देऊन दोन दिवसांचा अवधी देवून लॉकडाऊन करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. लॉकडाऊनला विरोधी पक्षासह व्यापारी व सर्वसामान्यांमधूनही विरोध होत असतांना कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे टास्क फोर्ससह बहुतांश अधिकार्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केले आहे. मात्र, हा लॉकडाउन आठ दिवसांचा हवा, की १५ दिवसांचा याविषयी अजूनही दुमत आहे. मात्र लॉकडाऊनची मानसिक तयारी ठेवा, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर
गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. कदाचित तत्कालीन परिस्थिती पाहून केंद्र सरकारने तो निर्णय घेतला असावा मात्र आज वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी कोरोनाचे संकट संपायचे नाव घेत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व आपत्कालीन सुविधांची तयारी करण्यासाठी पहिला लॉकडाऊन करण्यात आला होता मात्र तेंव्हाच्या व आताच्या परिस्थिती काय फरक पडला आहे? याचा विचार केल्यास कोरोना रुग्णसंख्ये व्यतिरिक्त फारसा फरक नाही. आधी कोरोना बाधितांची संख्या कमी होती ती आता मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गतवर्षभरात कारण ना कोरोनाची साखळी तुटली ना १०० टक्के आपत्कालीन सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात सरकारला यश आले. रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने उभारण्यात आलेली यंत्रणा कमी पडत असल्याचा युक्तीवाद सरकारकडून केला जात असला तरी ते अर्धसत्य आहे. कारण कोरोनाची पहिली लाट संपल्यावर दुसरी लाट येईल, याची माहिती सरकारला होतीच. याकाळात सरकारीपातळीवर केवळ सर्वसामान्यांना सल्ले, उपदेश व आवाहन केले जात होते. एका अर्थी ते गरजेचेही होते मात्र त्याचवेळी सरकारने दुसर्या लाटेचा सामना करण्यासाठी युध्दस्तरावर तयारी करणेही गरजेचे होते मात्र त्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. कारण गत महिनाभरापासून महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर उभी असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याचे निश्चित झाले आहे मात्र आताही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह सरकारमधील अनेक मंत्री हॉस्पिटलमधील बेड वाढवा, ऑक्सिजनचे उत्पादन वाढवा, रेमडिसिवरचा पुरवठा, विद्युत शव दाहिनीची व्यवस्था करा अशा प्रकारच्या सुचना देत आहेत. खरे पाहिले तर या सर्व सुविधा आतापर्यंत उभारल्या जायला हव्या होत्या. यात नेमकं कुणाचं व कुठे चुकलं याचं मुल्यमापन यथाअवकाश होईलही, मात्र तोपर्यंत ज्यांचा जीव जाईल त्याचं काय?
लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच
गेल्यावर्षी कोरोनाची लाट ही शहरांमध्ये अधिक दिसत होती. पण यावर्षी गावागावात रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. आदिवासी भागातही कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते. आदिवासी भागात आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यात ज्या आहेत कोरोना काळात कोलमडून गेल्या आहे. धुळे व नंदुरबारमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या त्याचेचे उदाहरण आहे. याचेही ऑडीट करावे लागणार आहे. आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, अशी परिस्थिती आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राज्यपातळीवर घडत असलेल्या घडामोडींवरुन असे लक्षात येते की, येत्या २४ किंवा ४८ तासात लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होईल. हे करतांना गतकाळात झालेल्या चुका टाळायला हव्यात. याआधी झालेल्या लॉकडाऊनमुळे दारिद्रय रेषेखालील लोक भरडले गेले. उद्योग वर्गाचं मोठं नुकसान झालं. अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले. लाखो लोकांच्या नोकर्या गेल्या. त्याचा फटका सामान्य माणसाला बसला. त्यामुळे यंदाच्या लॉकडाऊनला सर्वस्तरातून विरोध होणे स्वाभाविक आहे. जर लॉकडाऊन करायचे तर श्रमिक वर्गाच्या खात्यात पैसे जमा करा, त्याचबरोबर उद्योगधंद्यांना सवलत देण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या सवलती देणं, श्रमिकांना पैसे देणं राज्य सरकारला शक्य आहे का? याचाही प्रामणिकपणे विचार करायला हवा.
दुसरी लाट व झालेले म्यूटेशन धोकादायक
लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा, तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. विद्युत शव दाहिनी प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करण्याबरोबरच ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारणे, रेमडिसीवीर वाटपाचे अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्यात येण्याबाबत निंर्णय झाल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. सध्या अनेक जिल्ह्यात बेडची कमतरता असून याबाबतीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना बेडस, ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे कमतरता असल्याची सबब चालणार नाही असा इशाराही टोपे यांनी दिला आहे. खरतरं ही तयारी खूप आधीच व्हायला हवी होती. मात्र देर आये दुरुस्त आये...आता गुढीपाडव्याचा सण घरोघरी साध्यापध्दतीने पार पडला. १४ तारखेला बाबासाहेबांची जयंती पार पडल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सर्वांनी मानसिक तयारी ठेवण्याची आवश्यक आहे. यासह प्रत्येकाने अधिक काळजी देखील घेणे आवश्यक आहे. कारण गेल्या वर्षी हे दिसून आले होते की कोरोना विषाणू वृद्धांना संक्रमित करीत त्यांच्यासाठी प्राणघातक असल्याचे सिद्ध होते, परंतु आता अगदी तरुण लोकही बळी पडत आहेत. यावरुन दुसरी लाट व झालेले म्यूटेशन किती धोकादायक आहे, याची कल्पना येते. लॉकडाऊन जाहीर होणार असल्याने त्याआधी बाजारात गर्दी होवू नये, याचीही काळजी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास लॉकडाऊनचा फारसा उपयोग होणार नाही.
Post a Comment