हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेल्या मुहूर्तावर नवीन वस्तूंच्या खरेदीसह अनेक कामांचा शुभारंभ केला जातो परंतु सलग दुसर्या वर्षी नागरीकांच्या या आनंदावर कोरोना व्हायरसने विरजन फिरविले आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावाच्या दुसर्या लाटेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांत याची तीव्रता अधिक आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ७ ते १४ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठकीत लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगितले होते. याबाबतचा निर्णय येत्या दोन-तिन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करायची वेळ आलीच तर संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन, एकमेकांना मदत करीत कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तरच या लॉकडाऊनचा फायदा आहे. आज वेगाने संसर्ग वाढतो आहे, ते लक्षण चांगले नाही. यामुळे आज गुढीपाडव्याचा साजरा करतांना कोरोनाला हरविण्यासाठी स्वयंशिस्तीची गुढी उभारण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे.
गुढीपाडव्याच्या आनंद व उत्साहावर विरजण
गतवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हा देशातील कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या जेमतेम पाचशेच्या घरात होती आणि आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल करत गेल्यानंतर आता ती कोटीच्या जवळपास येवून पोहचली आहे. याकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षही ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंधळात बुडून गेले. त्यामुळेच या निर्णयामुळे आपण नेमके काय साध्य केले, याचा वर्षपूर्तीच्या निमित्ताने गांभीर्याने विचार करावा लागेल. या काळाने दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे सुदृढ सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची प्रकर्षाने जाणवलेली गरज. सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेतील त्रुटी कोरोनाच्या साथसंसर्गामुळे. ठळकपणे समोर आल्या. आता आव्हान आहे, ते या त्रुटी दूर करण्याचे. याचा शुभारंभ करण्यासाठी गुढीपाडव्यासारखा दुसरा शुभमुहूर्त नाही. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यंदा हे वर्ष मागच्या वर्षाप्रमाणे कोरोना विषाणूच्या कहरात असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे यंदाही गुढीपाडव्याच्या आनंद व उत्साहावर विरजण पडले आहे. या दिवशी अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात किंवा घेतलेल्या नव्या घरात गृहप्रवेश करत असतात. परंतु प्रामुख्याने नव्याने घर बांधल्यानंतर त्यात गृहप्रवेशाच्या मुहूर्त गुढीपाडव्याच्या दिवशी निश्चित केला होता, परंतु कोरोनाच्या दहशतीमुळे आता गृहप्रवेशाच्या मुहूर्त देखील पुढे ढकलावा लागला आहे.
लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी वाहनांसोबत सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. काही जण नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेवर निर्बंध आहेत. त्यामुळे सराफा व वाहन व्यवसायासह अन्य व्यापार्यांना मोठा फटका बसत आहे. शासनाने बाजारपेठेवर लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफा बंद राहणार आहे. या मुहूर्तावर बूक झालेल्या तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या, या चिंतेत व्यावसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर शेकडो स्थानिक रोजगार व बंगाली कारागीर उदरनिर्वाह करतात. गतवर्षीही गुढी पाडवा, अक्षय तृतीयेचा मुहूर्त चुकल्याने सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. वाहन विक्रेत्यांचीही हीच परिस्थिती आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, यंदा कोरोनामुळे सलग दुसर्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास गुढी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बूक करणार्या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही, हा प्रश्न व्यावसायिकांना भेडसावत आहे. विवाह सोहळ्याच्या आणि गुढी पाडवाच्या मुहूर्ताच्या ऑर्डर पूर्ण करण्याला वेळ मिळणे अपेक्षित होते. परंतु व्यावसायिकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे बँकेचे व्यवहार, मालाची व्यवस्था यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गत महिनाभरापासून कारोनाचे रुग्ण विक्रमीवेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे.
गुढीपाडव्याच्या आरोग्यमयी शुभेच्छा
महाराष्ट्रात लॉकडाऊन करू नये, खबरदारीचे उपाय करावेत, त्यासाठी नियम कडक करावेत, असा एक सूर व्यापारी तसेच उद्योगक्षेत्रातून होता; पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होते, हे मान्य केले तरी दुसर्या लाटेतील प्रादुर्भावाचा वेग अधिक असल्याचे जाणवते आहे. त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी सोयी-सुविधा निर्माण करण्याचा ताण फार मोठा येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ व उत्तर प्रदेशात आणीबाणी जाहीर करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या चोवीस तासांत दीड लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता लॉकडाऊनला पर्याय नाहीच, हे स्पष्ट झाले आहे. यंदा गुढीपाडव्याला गुढी उभारतांना प्रत्येकाने स्वयंशिस्तीचा संकल्प करावयाचा आहे. कारण ही लढाई प्रत्येकाची आहे. सर्व जबाबदारी शासन व यंत्रणेवर टाकून चालणार नाही. जर आपण परिस्थिती पाहिल्यास कोरोना विषाणू आक्रमण करून आला तेव्हा त्यास रोखणारे ना औषध होते, ना कोणती लस. आज वर्षभरानंतर विविध अभ्यासगटांनी लशी उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी अद्याप या भीतीचे सावट घेऊन आलेल्या आजारावर औषध मात्र सापडू शकलेले नाही. त्यामुळे भविष्य सुसह्य करावयाचे असेल, तर वर्तमानात होता होईल तेवढ्यांनी लसीकरण करून घेणे, हाच यावरील एकमात्र उपाय दिसतो. कार्यक्षम रीतीने लसीकरणाचा, लस पुरवठ्याचा कार्यक्रम राबवणे, ही आता अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे. कोरोना हरविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे योगदान द्यायलाच हवे, आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आरोग्यमयी शुभेच्छा.....
Post a Comment