महाराष्ट्रासह देशातील कोरोनाचे संकट गंभीर झाले असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रथमच एका दिवसात एक लाखापेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात कोरोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोनाची लाट दिवसेंदिवस गंभीर रुप घेत असल्याने महाराष्ट्रात अंशत: लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. मात्र तज्ञांच्या मते कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्यायच राहू शकत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणच पर्याय आहे, यावर सर्व तज्ञांचे एकमत आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे.
कोरोनाची दुसरी लाट
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या दुसर्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून देशात रोज ५० हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे. गेल्यावेळेपेक्षा यावेळीही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गेल्यावेळी महाराष्ट्रात ११ हजार ते २२ हजार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होण्यास ३१ दिवस लागले होते. यावेळी हा आकडा अवघ्या ९ दिवसातच पार केला गेला आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावेळी गुजरातमध्ये ठराविक अंतराने कोरोनाच्या ठरावीक केसेस वाढत होत्या. मात्र, यावेळी कोरोनाचा प्रमाणाबाहेर फैलाव होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून गुजरातमध्ये रोज दीड हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. उत्तर भारताचा विचार केल्यास पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. पंजाबमध्ये गेल्या आठवड्यापासून रोज २५००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यूकेच्या स्ट्रेनपेक्षा पंजाबमधील कोरनाच्या केसेस सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्याचा राष्ट्रव्यापी परिणाम पाहायला मिळत आहे. देशात चार दिवसातच एक लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्यावेळेपेक्षा हा आकडा अधिक आहे.
लसीकरणाचा वेग वाढवणे
देशात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटकात ७० टक्क्याहून अधिक कोरोना केसेस आहेत. या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचा वाढता ग्राफ पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नुकतीच चर्चा केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ सूत्री कार्यक्रम दिला आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोरोना नियमांचे पालन आणि लसीकरण जर पूर्ण गंभीररित्या आणि कटीबद्धपणे राबवले गेले. तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी त्याला अपेक्षित यश मिळतांना दिसत नाही. यास अनेक कारणे आहेत मुख्य म्हणजे लोकांची बेफिकरी! परिणामी कोरोनाचा विस्पोट झाला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे लसीकरणाचा! जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आणि आतापर्यंत तीन कोटी नागरिकांना लस दिली आहे. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा खूपच कमी संथ गतीने होत आहे. जर आपल्याला कोरोनावर अंकुश ठेवायचा असेल तर लसीकरण मोहिमेला आणखी बूस्ट द्यावे लागणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवणे हाच दुसरी लाट थोपविण्याचा उत्तम मार्ग राहू शकतो.
...अन्यथा कोरोना हाताबाहेर जावू शकतो
आनंदाची बाब म्हणजे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकीत महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण करून देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे. राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. ३ एप्रिल रोजी राज्यभर ४१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग असाच ठेवावा लागेल. अन्यथा कोरोना हाताबाहेर जावू शकतो. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा आधीच उघड झाल्या आहेत. याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. ग्रामीण भागात उपचाराची सोय पुरेशी होत नसेल तर रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे. संसर्गाचा नवा स्ट्रेन हा कितपत पातळीपर्यंत धोकादायक आहे आणि त्याला कसे रोखता येईल यावर सध्या देशभरात चर्चा होत आहे. ज्या ठिकाणी चाचण्या कमी आहेत, तेथे संसर्गवाढीचा वेग अधिक आहे. काही ठिकाणी लसीकरणाची मोहीम संथ आहे. त्याचाही वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन सारखे पर्याय तात्पुरत्या उपाययोजनांमुळे होणारे नुकसान दीर्घकालीन व लवकर न भरुन निघणारे आहे. यामुळे लसीकरण कसे वेगाने होईल, याचे नियोजन राज्य व केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. आता ४५ वर्षवरील रुग्णांना लस देण्यात येत आहे. ती लवकरच सर्वांना उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल.
Post a Comment