पुणेकर सर्वात भारी

देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर झाली आहे. देशभरातील राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारीमध्ये पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. या क्रमवारीमध्ये बंगळूरू शहराला अव्वल क्रमांक मिळाला आहे. पुण्यापाठोपाठ महाराष्ट्रातील नवी मुंबई व मुंबईचाही सर्वोत्तम दहा शहरांमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतामधील सर्वात आनंदी शहरांच्या यादीची घोषणा करण्यात आली होती. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या यादीत देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुण्याला १२, नागपूर १७ तर मुंबई २१व्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. हे दोन्ही निकाल महाराष्ट्राची मान उंचविणारे आहेत. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील जीवन किती सुसह्य आहे, यावर शिक्कामोर्तब दोन्ही सर्वेक्षणांच्या माध्यमातून झाले आहे. ही महराष्ट्रासाठी जितकी आनंदाची बाब आहे तितकीच अभिमानाची देखील आहे. मात्र हे ‘सुसह्य जीवनाचे चित्र’ केवळ पुणे, मुंबईसारख्या मोजक्या शहरांपुरता मर्यादित न राहता सर्वदूर कसे निर्माण होईल? या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.



राहणीमान सुलभता निर्देशांकाप्रमाणेच मूल्यांकन

पुणे व मुंबई या शहरात जावून शिकण्याचे, राहण्याचे, नोकरी करण्याचे नाहीच झाले तर किमान फेरफटका मारुन पुणे किंवा मुंबई दर्शन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यास अनेक कारणे आहेत. केंद्र सरकारने २०२० या वर्षासाठीचा इज ऑफ लिव्हींग इंडेक्स अर्थात राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांचे सर्वेक्षण करुन शहरांचा निर्देशांक जाहीर केला. सर्वोत्तम शहरांच्या सर्वेक्षणात १११ शहरांचा समावेश होता. या शहरांची वर्गवारी दोन गटांत करण्यात आली. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरं आणि १० लाखांहून कमी लोकसंख्या असलेली शहरं अशा दोन गटांत शहरांची विभागणी करण्यात आली. वास्तव्य करण्यास आवश्यक असलेलं सुयोग्य वातावरण, विकासकामांचा स्थानिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम अशा गोष्टींचा विचार सर्वेक्षणात करण्यात आला. या यादीत महाराष्ट्रातील ११ शहरांचा समावेश आहे. अव्वलस्थानी पुण्याने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी चिंचवड, नाशिक, वसई-विरार, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर या शहरांचाही समावेश आहे. यंदा राहणीमान सुलभता निर्देशांकाप्रमाणेच देशात प्रथमच स्थानिक स्वराज्य कामगिरी निर्देशांक मूल्यांकन देखील केले गेले. स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक हा संबंधित पालिकांच्या कामगिरीच्या निश्‍चित मूल्यांच्या आधारे कामगिरीचे मूल्यांकन आणि विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न आहे. हा निर्देशांक ठरवताना महापालिकांच्या पाच क्षेत्रातील क्षेत्रीय कामगिरीचे विश्‍लेषण केले गेले. त्यामधे २० विभाग आणि एकूण १०० निर्देशकांचा समावेश आहे. याअंतर्गत सेवा वित्त, धोरण, तंत्रज्ञान आणि प्रशासन या पाच मुद्द्यांवर मुल्यांकन केले गेले. 

मुलभुत सुविधांसह रोजगार व जीवनशैलीशी संबंध  

राहणीमान योग्य शहरांच्या निर्देशांसाठी राहणीमानाचा दर्जा आणि शहरी विकासासाठी विविध उपक्रमांच्या परिणामाचे मूल्यांकन केले जाते. नागरिकांची जीवनशैली, शहराची आर्थिक क्षमता, तिचा टिकाऊपणा आणि लवचिकता यावर आधारित देशभरातील शहरांची विस्तृत माहिती गोळा करून याबाबत नागरीकांचे मत काय आहे? दृष्टिकोण काय आहे? याचाही समावेश मूल्यांकनात केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकाच्या सर्वेक्षणातत नागरीकांच्या दृष्टिकोनाला, मताला ३० टक्के मुल्य ठेवण्यात आले असून यामुळे या प्रणालीची चौकट अधिकच भक्कम झाली आणि त्याची व्याप्ती वाढली आहे. जीवनशैली, आर्थिक क्षमता, शाश्वतता अशा १३ श्रेणींमध्ये याचे परिक्षण करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात नागरिकांना कशी सेवा मिळते याचे सर्वेक्षण करताना थेट नागरीकांकडूनच मते जाणून घेण्यात आली. त्यासाठी नागरीकांचा दृष्टिकोन सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणानंतर सर्वोत्तम शहरांच्या यादीत जळगावचे नाव कधी झळकेल? असा प्रश्‍न जळगावकरांना पडणे स्वाभाविकच आहे. मुळात सर्वोत्तम शहर होण्यासाठी त्याचा थेट संबंध संबंधीत शहरातील मुलभुत सुविधांसह रोजगार व जीवनशैलीशी असतो. कोणतेही शहर सहजासहजी सर्वोत्तम बनत नाही. मुळात सर्वोत्तम किंवा आनंदी होण्याचा संबंध त्या शहरामध्ये असणार्‍या सुखसुविधांशी असतो. मुलभूत सुविधांदह बेरोजगारी, गुन्हेगारी, असमानता या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पडतो. 

जळगाव शहरालाही स्थान मिळवून द्यायचे असेल तर...

सर्वोत्तम शहरांच्या यादीत जळगाव शहरालाही स्थान मिळवून द्यायचे असेल तर सर्वात आधी शहरातील मुलभुत प्रश्‍न व समस्यांकडे प्राधान्यांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज जळगाव महापालिकेला रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाइट, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नियमित देणे अवघड झाले आहे. एकूणच गेल्या काही वर्षांत शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांना नागरी सुविधा मिळणेही मुश्कील झाले आहे. मनपावरील कर्ज, अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना, उड्डाण पुल, समांतर रस्त्यांचा प्रश्न सुटला असला तरी गाळ्यांचा प्रश्न, शहरातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व असुविधा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खड्ड्यांनी धूळधाण झालेल्या रस्त्यामुळे अपघाती मृत्यू होत असताना जळगाव शहर राहण्यासाठी सर्वोत्तम कसे होईल? याचा विचार करावा लागेल. साडेपाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असतानाही शहरांतर्गत बससेवा नाही. शहरातचा वाढता विस्तार लक्षात घेता रस्त्यांचे रुंदीकरण, उपनगरांमध्ये मूलभूत सविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. उद्योगांच्या बाबतीत एकेकाळी जळगावच्या मागे असलेली औरंगाबाद व नाशिक सारखी शहरे आज खूप पुढे निघून केली आहे. जैन उद्योग समुहासह दोन-चार अपवाद वगळता येथे मोठे उद्योग नाहीत. येथील एमआयडीसीमधील उद्योगांची स्थिती पाहता, उद्योगाची वाताहत तर झालीच; पण विकासाचे पर्वही थांबले आहे, हे नाकारुन चालणार नाही. येथे औद्योगिक वसाहत असूनही मोठे उद्योग येत नाहीत, नवीन उद्योग येथे यायला तयार नाहीत व आहे ते उद्योग बंद पडत आहेत. आवश्यक सुविधा व पोषक वातावरण नसल्यामुळे उद्योगांची वाताहत झाली आहे. परिणामी बेरोजगारीचा प्रश्न मोठा झाला आहे. राहण्यासाठी सर्वोत्तम होण्यासाठी त्या शहरात समृद्धी आवश्यक असते व समृध्दीसाठी शहरातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे व प्रत्येकाला स्वावलंबी होणे आवश्यक आहे. यामुळे उद्योगनगरीला सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. 

Post a Comment

Designed By Blogger