सावधानतेचा इशारा

मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० मध्ये अचानक विज पुरवठा खंडीत झाला आणि कधीही न झोपणारे शहर ठप्प झाले. तांत्रिक बिघाडामुळे असे झाले असावे असा प्राथमिक अंदाज बांधला गेला. पण चीनी हॅकर्सच्या ट्रोजन हॉर्स या विघातक प्रोग्रॅम्समुळे वीज पुरवठा ठप्प झाल्याचा दावा महाराष्ट्राचे गृहमंत्री व उर्जामंत्र्यांनी केला आहे. याचवेळी १ मार्च २०२१ ला न्यू यॉर्क टाईम्स आणि द वॉल स्ट्रीट जर्नल या दोन अमेरिकन वृत्तपत्रांनी या बिघाडामागे चीन आणि इतर काही देशांतून झालेला सायबर हल्ला होता अशी बातमी दिली. यामुळे राज्यातील राजकारण तापले, आपल्याकडे उठसुट कोणत्याही विषयावर राजकारण करण्याची जणू प्रथाच झाली आहे. हा तांत्रिक बिघाड नसून घातपातच होता असा दावा राज्य सरकार करत आहे तर राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष भाजपाकडून सरकारचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. सायबर हल्ला होण्याइतक्या आपल्या ट्रान्समिशन लाईन्स आधुनिक नसून आपल्याकडे सर्व कामकाज हे मॅन्युअलीच केले जात असल्याने सायबर हल्ला होवूच शकत नाही, असे भाजप नेते व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे म्हणणे आहे. सरकार स्वत:चे अपयश झाकण्यासाठी हा सर्व खटाटोप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 



ट्रोजन हॉर्सेसचे सायबर हल्ले 

गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान प्रांतात संघर्ष झाला होता. यानंतर चारच महिन्यात मुंबईत वीजपुरवठा करणार्‍या पॉवरग्रिडमध्ये बिघाड झाला आणि काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अखंड वीजपुरवठा मिळणारे शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालये, कोविड सेंटर आणि दैनंदिन व्यवहारांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसला होता. देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने गृह विभागाच्या महाराष्ट्र सायबर सेलकडून याची चौकशी करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने त्याची माहिती दिली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार, विघातक प्रोग्राम्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या १४ ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश केल्याचे आणि त्याद्वारे विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही ट्रोजन हॉर्सेस यांनी यापूर्वीही जगात अश्या प्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत. 

पॉवर ग्रीड, आयटी कंपनी आणि बँकींग क्षेत्रावर ४० हजार ५०० वेळा सायबर अटॅक

विदेशातील विशेषतः संशयास्पद आणि ब्लॅकलिस्टेड असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल अड्रेसवरून राज्य भार प्रेषण केंद्राच्या (एसएलडीसी) सायबर सर्व्हरमध्ये लॉगईन करणे, यंत्रणा हॅक करणे, यंत्रणेस विघातक ठरतील या प्रकारचे प्रयत्न वारंवार केले असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे इंटरनेट प्रोटोकॉल ड्रेस संशयास्पद आणि विघातक असल्याचे महत्वाच्या क्रेडिट रेटींग एजन्सींनी प्रमाणित केले असल्याचे अहवालात म्हटले आहे. सायबर क्षेत्रात ट्रोजन हॉर्सचा वापर केला जातो. काही ट्रोजन हॉर्सेस यांनी यापूर्वीही जगात अशा प्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत. मुंबईला विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणार्‍या आयटी आणि ओटी सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये या ट्रोजन हॉर्सेसने सहजतेने प्रवेश केला असेही चौकशी अहवालात आढळून आले आहे. सायबर किंवा संगणकाच्या भाषेत ट्रोजन हॉर्स एक मॅलिसीयस कोड किंवा फाईलच्या स्वरुपात असतो. हा कोड किंवा फाईल किंवा लिंक दिसताना वैध दिसते. पण याने संगणक किंवा मोबाईलमध्ये प्रवेश केल्यास यंत्रणांना मोठी हानी पोहचते. डेटा चोरी करणे, माहिती मिळवणे, मोबाईल किंवा संगणकावर नियंत्रण मिळवणे, नेटवर्कमध्ये व्यत्यय आणणे, इत्यादी अशा अनेका कामांसाठी ट्रोजन हॉर्सचा वापर केला जातो. विविध देशांतल्या इंटरनेटचा अभ्यास करणार्‍या अमेरिकेतल्या रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीच्या अहवालात असे म्हटले आहे की चीनच्या सरकारशी संलग्न हॅकर्सच्या समूहाने मालवेअरच्या माध्यमातून भारतातल्या महत्त्वपूर्ण पॉवरग्रिडला लक्ष्य केले गेले. हाच धागा पकडत अमेरिकन मीडियाने यावर वृत्त प्रकाशित केले. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनी हॅकर्सने ऑक्टोबर २०२० मध्ये पाच दिवसांत भारतातील पॉवर ग्रीड, आयटी कंपनी आणि बँकींग क्षेत्रावर ४० हजार ५०० वेळा सायबर अटॅक केला होता. 

भविष्यातील नव्या प्रकारच्या युध्दांसाठी तयारी पाहिजे

भारतातील पॉवर ग्रीड विरोधात चीनने मोठे अभियान चालविले होते. त्यावेळी गलवान खोर्‍यामध्ये जी झटापट झाली होती. त्यावेळी भारताने चीनविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. भारत सीमेवर जर चीनविरोधात कारवाई करत असेल, तर भारतातील अनेक पॉवर ग्रीडवर मालवेअर अटॅक करून त्यांना बंद करू, असे चीनचे नियोजन असल्याचे त्या वृत्तामध्ये दिले आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोपही केला जातोय. मात्र भारतात अशाप्रकारचा सायबर हल्ला होवूच शकत नाही, असे म्हणणे थोडेसे धोरिष्ठ्याचेच म्हणावे लागेल कारण कोरोनामुळे संपूर्ण जग हतबल झाले असतांना सायबर हल्ल्यांचे प्रमाण जगभरात वाढले. यामुळे या गंभीर विषयाकडे राजकीय चष्म्यातून न पाहता. भविष्यातील नव्या प्रकारच्या युध्दांसाठी पुरेसी तयारी करण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. जगभरातील सायबर तज्ञांचे मते भविष्यातील युध्द हे कोणत्याही परमाणु किंवा अन्य कोणत्याही पारंपारिक हत्यारांनी लढली जाणार नाही तर ती इंटरनेट अर्थात सायबर युध्दासंबंधीत असतील. गेल्या आठवड्यातच रशिया व चीनमधील हॅकर्सने भारतातील कोरोना व्हायरस लॅबवर सायबर हल्लाकरुन फॉम्यूला चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त होते. यावरुन सायबर हल्ल्याची व्याप्ती लक्षात येते. चीन तसा कुटील देश आहे. सध्या भारताने लष्करी व व्यापारी आघाडीवर चीनला चीतपट केल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाकारुन चालणार नाही. यामुळे मुंबईतील खंडित विज पुरवठ्याच्या विषयाकडे राजकारणापलीकडे जावून विचार करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger