काँग्रेस पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर!

काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा ‘जी-२३’ गट व गांधी परिवार समर्थक गट अशी उघड दुफळी काँग्रेसमध्ये पडत चालली आहे. बिहारसह सात राज्यातील पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचे फटाके फुटाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील काही प्रमुखांसह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना नेतृत्व बदला विषयी पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती. मात्र यानंतर पक्ष बांधणी तर दुरच राहिली पण काँग्रेस पक्षाला स्वत:ची चुक दाखविणार्‍या या ज्येष्ठ नेत्यांना मुख्य प्रवाहापासून दुर लोटल्याने साहाजिकच, त्यांच्यामध्ये मोठी घालमेल सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुलाम नबी आझाद यांनी जम्मूत एक शांती संमेलन घेतले आणि त्यात नेमके त्याच २३ पैकी अनेक काँग्रेस नेते अगत्याने उपस्थित होते. या संमेलनात गुलाब नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याने गजहब उडाला नसता तर नवलच! दुसरीकडे होवू घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून या सर्व नेत्यांना चार हात लांब ठेवण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसपक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा तर नाही ना? असा प्रश्‍न सर्वसामान्य काँग्रेस कार्यकत्यांना पडला असेल, यात शंका नाही.



काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट होण्यास केंद्रीय पातळीवरील सक्षम नेतृत्वाचा अभाव, हेच प्रमुख कारण असल्याची प्रबळ भावना काँग्रेसच्या एका गटात निर्माण झाली आहे. याचीच परिणिती म्हणून २३ ज्येष्ठ नेत्यांच्या सह्या असलेला लेटरबॉम्ब गेल्या काही महिन्यांपूर्वीच फुटला होता. एकेकाळी देशातील सर्वात प्रबळ पक्ष असलेला काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांपासून विशेषत: २०१४ पासून गटांगळ्या खात आहे. पक्षात जुन्या जाणत्या नेत्यांचा एक गट तर दुसरीकडे राहुल गांधी यांचा दुसरा गट अशी उघड दुफळी निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा नाराजीचे फटाके फुटण्याचे कारण म्हणजे, पश्‍चिम बंगाल, केरळसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची धामधूम सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनी केरळ तर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत करत दोघं बहिणभावाने पाचही राज्यांचे दौरे सुरु केले आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याचे मुख्य कारण म्हणजे, पाचपैकी जवळपास सर्व राज्यांत काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवीत नसून आघाडीतूनच लढायचे आहे. साहजिकच, जागावाटप व देवाण-घेवाण सुरू आहे; पण त्यातही जी-२३ गटातील सर्व नेत्यांना जणू खड्यासारखे बाजूला ठेवलेले आहे. यापार्श्‍वभुमीवर जम्मूत पार पडलेल्या बैठकीत गुलाम नबी आझाद यांनी चक्क नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही उघड नाराजी व्यक्त करत गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा काँग्रेस उपयोग का करून घेत नाही, अशीही तक्रार केली. 

गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद

या गृह कलहास निमित्त ठरली, पश्‍चिम बंगालमधील काँग्रेसची आघाडी! काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांचा पश्चिम बंगालमधील मुस्लीम समुदायावर प्रभाव असला तरी त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले होते. ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. काँग्रेस सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरोधात नेहमी लढत आला असल्याचे ट्वीट शर्मा यांनी केले होते. पश्चिम बंगालमध्ये आघाडी करण्यासंदर्भात कार्यकारी समितीत चर्चा करायला हवी होती, असाही मुद्दा शर्मा यांनी उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमधील संमेलनात मोदींची स्तुती केली होती. त्यावर, ‘निवडक मान्यवर काँग्रेसवासींनो (जी-२३ गट) वैयक्तिक लाभाचा मोह सोडा आणि पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळण्यात वेळ दवडू नका.. पक्षाला मजबूत करा, तुम्हाला मोठे करणार्‍या पक्षाच्या मुळावर घाव घालू नका”, असे ट्वीट अधीर रंजन यांनी केले आहे. 

खुशमस्कर्‍यांचा गोतावळा

तसे पाहिल्यास पाच राज्यांतल्या निवडणुका ही सोपी बाब नाही. आधीच गलितगात्र असलेेला काँग्रेसपक्ष आता सेनापती अर्थात राष्ट्रीय अध्यक्षाविनाच मैदानात उतरला आहे. यामुळे तिकीट वाटप, आघाड्या, रणणीती, पक्षाची भुमिका व दिशा यामध्ये समन्वय नसल्याने काँग्रेसमधील गृहकलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गत काही महिन्यांपासून एकामागून होत असलेल्या अशा प्रकारच्या नाराजीनाट्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे मानले जावू लागले आहे. परंतू अशी वेळ पहिल्यांदा आलेली नाही. याआधी साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी असाच संघर्ष काँग्रेसमध्ये उफाळून आलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंचे समकालीन ज्येष्ठ नेते आणि त्यांचीच कन्या इंदिरा गांधी, यांच्यात तो संघर्ष पेटला होता. त्यावेळी कात टाकून काँग्रेसला नव्याने उभी करताना इंदिरा गांधींनी त्या नेत्यांशी दोन हात केले होते. त्याचीच परिणिती म्हणून काँग्रेसने भरारी  घेतली होती मात्र त्यावेळी इंदिराजींकडे दुरदृष्टी होती सोबतीला अभ्यासू तरुण नेत्यांची साथ होती. मात्र आता राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या भवती खुशमस्कर्‍यांचा गोतावळा दिसून येतो. पक्षाने या परिस्थितीबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. 

Post a Comment

Designed By Blogger