प्रतिष्ठा आणि निष्क्रियता

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांबरोबरच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर झाला असून, दक्षिणेकडील तिन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आसाममध्येही तीन टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. सर्व राज्यांतील सिकंदर कोण? हे २ मे रोजीच ठरणार आहे. पाचही राज्यांची निवडणुक ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची असल्याने पाचही ठिकाणी भाजपाने शक्ती पणाला लावली आहे. सध्यस्थितीत निवडणूक जाहीर झालेल्या राज्यांपैकी आसाममध्येच आसाम गण परिषदेच्या पाठिंब्याने  भाजपचे सरकार आहे. अन्य चार राज्यांत भाजप सत्तेवर नाही. बंगालसाठी भाजपने सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीमध्ये भाजप शिरकाव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना दिसत आहे. मात्र शेतकरी आंदोलन, महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किंमतींचा उडालेला भडका व देशातील अस्वस्थ वातावरणामुळे भाजपाला ही निवडणूक सोपी नाही, याची जाणीव भाजपामधील चाणक्यांना देखील आहे. भाजपासाठी दिलासादायक असलेली एकच बाब म्हणजे, काँग्रेसची निष्क्रियता...!भाजपाने कंबर कसली

होवू घातलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण गेल्या महिनाभरापासूनच तापायला सुरुवात झाली होती. पाचही ठिकाणची राजकीय स्थिती पाहता सर्व ठिकाणी रंगतदार लढती होण्याची चिन्हे आधीपासूनच दिसत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलला पराभूत करून सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. ममता बॅनर्जी यांनीही पुन्हा विजयी होण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीच्या हातातील सत्ता स्वत:कडे घेण्यासाठी काँग्रेसने केरळमध्ये जोर लावला आहे. पुदुच्चेरीत अण्णा द्रमुकच्या मदतीने तेथील सत्ता मिळविण्यासाठी भाजप नेते उत्सुक आहेत. तामिळनाडूमध्येही मुख्य सामना सत्ताधारी अण्णा द्रमुक व द्रमुक यांच्यात असून, भाजपने अण्णा द्रमुकशी समझोता केला आहे. आसाममध्ये सध्या भाजप व गण परिषद मिळून सरकार आहे. मात्र या वेळी भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तामिळनाडूमध्येही भाजपचा आमदार नाही मात्र येथेही पाय रोवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. यात सर्वाधिक चर्चा आहे ती, पश्‍चिम बंगाल आणि ममता बॅनर्जींची...

'ही' चुक भाजपा आतातरी सुधारणार का?

डाव्यांची तीन दशकांपासूनची एकहाती सत्ता त्यांनी उलथवून टाकणार्‍या तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींचे स्थान गेल्या लोकसभा निवडणुकीपासून डळमळीत झाले आहे. काही नेत्यांनी अलिकडेच त्यांची साथ सोडली. त्यातच आता निवडणुकांच्या तोंडावर बंगालमधील एका कोळसा घोटाळ्यात ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आता तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत. अभिषेक यांच्याकडे ममतादीदींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. ते तृणमूल काँग्रेसमधील बडे प्रस्थ. पक्षातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक दाखल झाले होते. तेव्हा तृणमूलने पूर्ण शक्तीने याचा प्रतिकार केला होता. इतकेच काय तर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या टीमला ओलीसच ठेवले होते. मात्र उत्तराधिकारी असलेला भाचा अडचणीत आल्यावर ममता शांत आहेत. ही वादळापुर्वीची शांतता आहे का खरोखरच दीदींची गोची झाली आहे, याचे उत्तर येणार्‍या काळात मिळेलच मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांची वाट सोपी नाही, हे देखील तितकेच खरे आहे. अलिकडेच ४५ जागांवर प्रभाव असणारे एक नेते सुवेंदु अधिकारी यांनीही ममतांची साथ सोडली. भाजपच्या तंबूत ते दाखल झाले. त्यापाठोपाठ अनेक बड्या नेत्यांनीही दीदींची साथ सोडली आहे. हिच संधी साधून अमित शहांसह अनेक बड्या नेत्यांनी बंगालमध्ये तंबुच ठोकला आहे. यामुळे येथे सर्वात मोठी रणधुमाळी पहायला मिळण्याचे संकेत आहेत. मात्र येथे भाजपाची डोकंदुखी वेगळी आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फोडून इतक्या नेत्यांना आयात करण्यात आले आहे की खुद्द बंगालमधील भाजप शाखेत अस्वस्थता पसरली आणि अखेर भाजपच्या नेतृत्वाला यापुढे आयात नाही, असे जाहीर करावे लागले. आयात उमेदवारांच्या जोरावर निवडणुक लढली की कसे अध:पतन होते याचा अनुभव भाजपाने महाराष्ट्रात घेतला आहे. यामुळे ही चुक भाजपा आतातरी सुधारणार का? हा मोठा प्रश्‍न आहे. बंगाल नंतर भाजपासाठी दुसरे महत्त्वाचे राज्य म्हणजे, आसाम. 

'ही' निष्क्रियताच काँग्रेसचा घात करणारी 

ईशान्य भारतात सात राज्यं आहेत ज्यांना सेव्हन सिस्टर्स असे म्हटले जाते. यातील सर्वात मोठी भगिनी म्हणजे आसाम. भाजपाने २०१६ सालची विधानसभा निवडणूक जिंकली. आसाममधील विधानसभा निवडणूक भाजपासाठी सोपी नसेल कारण आसामच्या दृष्टीने अतिशय संवदेनशील असलेला नागरिक सुधारणा कायद्यासह शेतकरी आंदोलनाचा मुद्दा प्रचारात भाजपाची डोकंदुखी ठरु शकतो. गेल्या वर्षी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी वगैरे दोन मुद्द्यांनी देशाचे राजकारण ढवळून निघाले होते. नागरिकत्व पडताळणीची सुरुवात झाली ती आसामपासूनच. आसाम हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जात असे मात्र येथे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आसामसधील एकूण १४ पैकी ७ जागा जिंकत विजयाचा शंखनाद केला. तेव्हापासून भाजपाल आसाम विधानसभेत यशाची शक्यता दिसू लागली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाम गण परिषदेच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन केले. गेली पाच वर्षे भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री सर्वांनद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे केली आहेत. आता पुन्हा एकदा भाजपाने येथे ताकद लावली आहे. या निवडणुकीचे अजून एक वैशिष्ठे म्हणजे पुदुच्चेरीसारख्या छोट्याशा राज्यातही भाजपाने पणाला लावलेली प्रतिष्ठा! भाजपाच्या तोडाफोडीच्या राजकारणामुळे पुदुच्चेरीमधील काँग्रेस सरकार पडले आणि अवघी तीस सदस्यीय विधानसभा असणार्‍या केंद्रशासित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मध्यप्रदेश आणि कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यांपासून गोवा आणि ईशान्य भारतातील छोट्या राज्यांपर्यंत जेथे भाजपला निवडणुकीत सत्ता मिळू शकली नव्हती तेथे भाजपने हाच हातखंडा प्रयोग केला आणि आपली सत्ता आणली. यामुळे पुदुच्चेरीत फारसे वेगळे घडले असे मानन्यात काही अर्थ नाही. राजकीय दृष्ट्या यात एक मोठी गोष्ट आहे. ती म्हणजे, एवढे छोटे राज्य असून भाजपने इतके उपद्व्याप केले. मात्र आपले सरकार कोसळत असताना देखील काँग्रेसवर ढिम्म परिणाम झाला नाही. मध्य प्रदेश किंवा कर्नाटकमधील आपली सरकारे कोसळल्याचा अनुभव असताना देखील काँग्रेस आपली उरलीसुरली राज्ये वाचविण्यासाठी काहीएक करीत नाही ही निष्क्रियताच काँग्रेसचा घात करणारी आहे. 


Post a Comment

Designed By Blogger