रामदेव बाबा आणि पतंजली पुन्हा वादात

कोरोना व्हायरसशी लढणारे औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने कोविड-१९ आजारावर ‘कोरोनिल’ या आयुर्वेदिक औषधाची घोषणा नुकतीच केली. अश्वगंधा, गुळवेल, श्वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार करण्यात आलेले औषध कोरोनारुग्णांना ठणठणीत बरे करू शकते, त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतलीय, असा बाबा रामदेव यांचा दावा आहे. रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनील या औषधाचे लाँचिंग केले. तसेच या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र मिळाल्याचे म्हटले. त्यानंतर थेट डब्लूएचओ नेच आपण अशा कोणत्याही पारंपारिक, आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेले नाही असे स्पष्ट केले. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचे औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारल्याने रामदेव बाबा, पतंजली आणि ‘कोरोनिल’ वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.जागतिक आरोग्य संघटनेने हात झटकले 

डिसेंबर-जानेवारी महिन्यात काहीसा कमी होणार्‍या कोरोनाने फेब्रुवारी महिन्यात पुनरार्गमन केले आहे. सर्वसामान्यांपर्यंत अद्याप लसीकरण पोहचले नसतांना, पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोविडवर उपचार होतील. ७० टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील, असा दावा करत पतंजलीने कारोनिल औषधाचे थाटात लाँचिंग केले. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयंत लेले यांनी तसा ईमेल पाठवून विचारणा केली असता, या औषधाला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ट्वीट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसेच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेले नसल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीने औषध लॉन्च केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व एशियाच्या रीजनल अधिकार्‍यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यामुळे कोरोनिल हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनचाही विरोध 

दुसरीकडे रामदेवबाबा यांच्या या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेने विरोध केला आहे. या औषधाला कुठल्याच मान्यताप्राप्त अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळाली नाही, ती मिळाली असल्यास तसे सिद्ध करावे, अशीही मागणी आयएमएने केली आहे. हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. जिथे लस येण्यासाठी इतक्या महिन्यांचा कालावधी लागला, तिथे हे औषध कसे उपलब्ध झाले? त्याला कुणी मान्यता दिली, असे प्रश्न आयएमएने उपस्थित केले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी अशाप्रकारच्या अवैज्ञानिक औषधाचे लाँचिंग करणे कितपत बरोबर आहे. आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर आहेत तरीही ते अशाप्रकारच्या औषधाला प्रोत्साहन देत आहेत हे किती नैतिक आहे, असा खडा सवाल आयएमएने केला आहे. हे औषध म्हणजे लोकांनी फसवणूक असून पतंजलीचा दावा थेट जागतिक आरोग्य संघटनेने खोडल्याने देशाचीही जागतिक पातळीवर नाचक्की झाली आहे. जर कोरोनील खरंच नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करत असेल तर सरकार कोरोना लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपये का खर्च करत आहे? असाही सवाल आयएमएने विचारला. ‘योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे ’कोरोनील’ हे औषध कोट्यवधी लोकांना जीवन देत आहे, तसेच वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या,’ असा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता, त्यात कोणता वैज्ञानिक आधार आहे याची माहिती द्यावी, अशीही मागणी आयएमएच्या राष्ट्रीय संघटनेने केली आहे. यामुळे पतंजलीचे टेन्शन वाढले आहे. 

जितका हास्यास्पद, तितकाच चिंताजनक

या आधी, गेल्या वर्षी २३ जून रोजी कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ‘कोरोनिल’ नावाचे एक ‘इम्युनिटी बुस्टर’ अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध काढण्यात आले. त्यावरून मोठा वाद झाल्यानंतर हे औषध केवळ कोरोनावर मात करू शकत नसल्याचे तसेच हे औषध केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करेल, असे पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’कडून ‘कोरोनिल टॅबलेट’ नावाने दुसर्‍यांदा हे आयुर्वेदिक औषध बाजारात आणले गेले. संपूर्ण जगाला आयुर्वेद भारताने दिले आहे. मात्र याचे आता व्यापारीकरण झाल्याने अशाप्रकारचे वाद होतांना दिसतात. आधीच भारतावर कोरोनाचे संकट पुन्हा उभे ठाकले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करता अमेरिकेतील अनेक राज्यांसह युरोपमधील अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. भारतात अजून पुर्णपणे लॉकडाऊन जारी केले नसले तरी अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पर्व सुरु झाले आहे. दुसरीकडे लसीकरणानंतर काहीजणांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संकटसमयी पतंजलीचा अशाप्रकार वाद निर्माण होणे योग्य नाही. पतंजलीच्या आधीच्या औषधांमुळे किती लोकांचा कोरोना बरा झाला किंवा किती लोकांची इम्यूनिटी वाढली, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिन दिवसात कोरोना बरा होण्याचा दावा हा जितका हास्यास्पद आहे तितकाच चिंताजनक देखील आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी परिश्रम घेत असतांना अशा प्रकारचे दावे करणे हा एका प्रकारे शास्त्रज्ञांचा अपमान आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger