गेल्या आवडाभरापासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या दुप्पटीच्या वेगाने वाढत असल्याने राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येत असून येत्या आठ दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र पुन्हा लॉकडाऊन परवडेल का? याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध परवानग्या दिल्या. मात्र, त्यामुळे सर्वत्र गाफिलपणा आला आहे. अशाच मानसिकतेमुळे युरोपमधील अनेक देशांवर दुसर्यांदा कठोर लॉकडाऊन लादण्याची वेळ आली. भारतात विशेषत: महाराष्ट्रात गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात बंद झालेले उद्योग आता पूर्वपदावर येत असतानाचा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जर पुन्हा लॉकडाऊन झाले तर ते परवडणारे ठरणार नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य काळजी घेणेच उत्तम पर्याय आहे.
राजकीय कार्यक्रमच कोरोनाचे सुपर स्प्रेडर
सप्टेंबर २०२०नंतर कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने सर्वच उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. सहा ते सात महिने मोठ्या आर्थिक झळा सहन केलेल्या सर्वांचीच घडी आता बसू लागली आहे. त्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्यविषयक तसेच अर्थविषयकही चिंता वाढणे स्वाभाविक आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला व लॉकडाऊनमध्ये उद्योगांची चाके थांबली. त्यामुळे कधी नव्हे एवढे कामगार, मजुरांचे स्थलांतर झाले. शिवाय उद्योगांचीही घडी विस्कटली. यातून सावरत असताना मजूरही पुन्हा परतले व उद्योगांनी वेग घेतला. मात्र आता कोरोना वाढून पुन्हा उद्योग बंद ठेवायचे म्हटल्यास ते कोणालाही परवडणारे नाही, याची जाणीव सर्वांनाच आहे मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणी वावरतांना बेफिकरी वाढली आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. विशेषत: मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अमरावती, यवतमाळ, अकोला यांना कंटेनमेंट झोन जाहीर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला इथली कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीला सर्वसामान्य जनता जितकी कारणीभूत आहे तितकेच राजकारणी देखील कारणीभूत आहेत. गत दोन-तिन महिन्यापासून राजकीय सभा, मेळावे, बैठकांचा धडाका सर्वच पक्षांनी लावला आहे. हे राजकीय कार्यक्रमच कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनले आहेत. याचा अनुभव जळगाव जिल्ह्याने नुकताच घेतला.
लग्नसमारंभांना होणारी गर्दी चिंतेचा विषय
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चार दिवसीय दौरा पार पडल्यानंतर जयंत पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यानंतर जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पॉझिटीव्ह आले असून काही जण क्वारंटाईन झाले आहेत. राज्यातील अन्य बडे नेतेही पॉझिटीव्ह येत आहेत. यामुळे सर्व दोष सर्वसामान्यांवर ढकलून चालणार नाही! महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चेंडू जनतेच्या कोर्टात टाकला आहे. मुख्यमंत्र्यांची ही भुमिका चुकीची म्हणता येणार नाही. कारण मधल्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने जनतेत बेफिकिरी वाढली. त्यातूनच कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. राज्यातल्या सर्वच शहरांमध्ये सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. जणू काही कोरोना संपल्यागत सगळे वावरत आहेत. निर्बंध शिथिल केल्याने राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असताना कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेले वर्षभर कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रांसाठी नियम ठरविले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लग्नसमारंभांना होणारी गर्दी निश्चितपणे चिंतेचा विषय आहे. कोरोनाचा पुन्हा प्रकोप झाल्यास यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशा इशारा साथरोग तज्ञांनी दिला असल्याचे कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे.
कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही
कोरोनाची दुसरी लाट दरवाजावर धडका मारत असल्याने पुन्हा एकदा मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरसारख्या उपायांचे काटेकोर पालन करणे आवश्यक बनले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येची दखल घेत राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला आहे, यास गांभीर्याने घ्यावेच लागेल. मात्र रुग्णसंख्या वाढते. म्हणून ताबडतोब लॉकडाऊन करणे हे परवडणारे नाही. शासनाने हवे तर निर्बंध कडक करावेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायला हवी. निर्बंध शिथिल करावेत म्हणून विविध व्यावसायिक संघटनांनी सरकारकडे नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. या सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून त्यांना या आश्वासनाची आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. राज्याची आर्थिकघडी व्यवस्थित सुरु झालेली असताना पुन्हा लॉकडाऊन कसे शक्य? याचा विचार करावा लागणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची आवश्यकता आहे. कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला काही होणार नाही, माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, अशा भ्रमात न राहणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सर्वकाही राज्य व केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही.
Post a Comment