शेतकर्‍यांना पुन्हा ‘अवकाळी मार’

आस्मानी संकटांची मालिका शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. तिन-चार वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप, रब्बी पिके हातात आली नाहीत. त्यानंतर अतिपावसाने पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर दिवाळीत गारपीट व वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला. या धक्क्यातून कसेबसे सावरलेल्या शेतकर्‍यांनी पुन्हा मोठ्या हिंम्मतीने कापूस, मका, हरबरा, गहू आदी पिकांची पेरणी केली. हे पिकं कापणीला आले असताना आता अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्यभरात हजेरी लावली. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीने झोडपल्याने काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा उद्ध्वस्त झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. नाशिकमध्ये द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्‍या बाजूला अवकाळी पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे.शेतकर्‍यांना फटका 

शेतकरी व कृषीक्षेत्रात एकामागून एक सुरु असलेली संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाही. चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला. परिणामी चीनमधील उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली. निर्यात बंद झाली. याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर झाला. अमेरिका व चीन मधील व्यापारयुध्दात होरपळलेली जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येण्याची चिन्हे दिसत नसतांना आता चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले. एक-एक करून वेगवेगळी क्षेत्रे त्याला त्याला बळी पडले. याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही होवून देशांतर्गत महागाईने कळस गाठला. याचा फटका शेतकर्‍यांना देखील बसला. कारण शेतीशी निगडीत अनेक विषयांवर भारत चीनवर अवलंबून आहे. चीनमधील उद्योग बंद पडल्याने तर रासायनिक खते, पेस्टीसाईड्स आदींच्या किंमती वाढल्या. यातूनही शेतकर्‍यांनी मार्ग काढत मोठ्या जोमाने पेरण्या केल्या. आधीच शेतकर्‍याच्या डोक्यावर कर्ज आहेच. एकंदरीच संकटांची मालिका चहूबाजूने घेरून आली आहे. या संकटातून शेतात उभा असलेला हरभरा, गहू, मका, ज्वारी, द्राक्षबागा तारुण नेतील अशी अपेक्षा असताना, बुधवारी व गुरुवारी राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला, राज्याच्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस सुरूच आहे. 

शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये

राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून पुढील ४८ तास पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले. विशेष करुन द्राक्ष उत्पादक आणि ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे. काही ठिकाणी या पावसात खळ्यात मळ्यात उघड्यावर असलेली पिकं पाण्यात भिजून खराब झाली. अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. कांदे भिजून खराब झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून किमान तिन-चार दिवस पाऊस सुरु राहणार आहे. राज्यातील शेत शिवारांची स्थिती अशी आहे की, काही ठिकाणी गहु, हरबरा, मका कापणीवर आले तर काहींची कापणी होऊन शेतात ढीग रचून ठेवलेले आहेत. पावसामुळे पिकं पडण्याची शक्यता बळावली असल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस नाही पडला तरी नुकसान व पडला तरी नुकसान अशा फेर्‍यात शेतकरी गुदमरला आहे. यावर्षी गत महिन्यात आधीच अति पावसामुळे मूग, उडीद या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातून सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा गहु, हरबरा हातातून जात आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. 

कोरोनामुळे शेतकरी अडचणीत

राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेच, पण जगायचे कसे आणि मरायचे कसे या विवंचनेत आहे. आधीच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. त्यात आता अवकाळी पावसाने भर घातली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच जर खचला तर कसे होईल? यामुळे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. या संकटावर मात व्हावी. यासाठी सरकारने कोणतेही राजकारण न करता चौकटीबाहेर जावून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आधीच दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनांमुळे हे केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे व राज्यातील सरकार हे शेतकर्‍यांच्या विषयावरही राजकारण करणारे आहे, अशी प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. राजकारण तर प्रत्येक विषयावर करायचे जणू ही शपथ सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे मात्र किमान शेतकर्‍यांच्या विषयावर तरी राजकारण होवू नये, अशी अपेक्षा आहे. दिल्लीच्या वेशीवरील शेतकरी आंदोलनावरुन सुरु असलेले राजकारण संपूर्ण जग पाहत आहे. मात्र आता राजकारण तुर्त बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे व विरोधीपक्षाने त्यांना साथ देण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याच्या स्थितीत येवून ठेपली आहे, अशावेळी शेतकर्‍यांना ताकद दिल्यास या संकटातून बाहेर पडणे शक्य होईल.

Post a Comment

Designed By Blogger