महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चेंडू जनतेच्या कोर्टात टाकला आहे. राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा पडण्याचे कारण म्हणजे, राज्यात गेल्या २४ तासांत ३,६६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गत तिन-चार महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास नोव्हेंबर ४,७७५ रुग्ण आढळले होते त्यानंतर डिसेंबरमध्ये ३,८९३, जानेवारीत २,९७३, १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान २,९२६ रुग्ण आढळले १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सरासरी ३५८१ रुग्णांची भर पडली आहे. मुंबईसह अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आठवडाभरात रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. कोरोनाचा पुन्हा प्रकोप झाल्यास यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशा इशारा साथरोग तज्ञांनी दिला असल्याचे कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे.
रुग्णसंख्या घटल्याने जनतेत बेफिकिरी वाढली
राज्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पूर्वी कोरोनावर लस नव्हती. आता त्यावर मात करण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे. राज्यातील दररोजची कोरोना बाधितांची रुग्णसंख्या पाहिल्यास सरासरी तीन हजारांच्या जवळपास असून मृतांचा आकडाही पन्नासच्या खाली आहे. ही सकारात्मक बाजू असली तरी मधल्या काळात करोनाची रुग्णसंख्या घटल्याने जनतेत बेफिकिरी वाढली. त्यातूनच करोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. राज्यातल्या सर्वच शहरांमध्ये सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. जणू काही कोरोना संपल्यागत सगळे वावरत आहेत. निर्बंध शिथिल केल्याने राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असताना कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेले वर्षभर कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रांसाठी नियम ठरविले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत. लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या आणि इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमाविना होताना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा वाढविल्या आहेत. मात्र, तिथेही नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येची दखल घेत राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला आहे, ज्याला पूर्णपणे चुकीचे म्हणता येणार नाही.
पुन्हा लॉकडाऊन न परवडणारे
रुग्णसंख्या वाढते. म्हणून ताबडतोब लॉकडाऊन करणे हे परवडणारे नाही. शासनाने हवे तर निर्बंध कडक करावेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायला हवी. निर्बंध शिथिल करावेत म्हणून विविध व्यावसायिक संघटनांनी सरकारकडे नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. या सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून त्यांना या आश्वासनाची आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. राज्याची अर्थघडी व्यवस्थित सुरु झालेली असताना पुन्हा लॉकडाऊन कसे शक्य? याचा विचार करावा लागणार आहे. आधीच २०१८ पासून जगावर असणार्या मंदी, महागाईने जगभरातील नोकरदार, भांडवलदार, सर्वसामान्य हवालदिल आहेत. त्यातच ‘मेड इन चायना’ कोरोना व्हायरसमुळे जगभराला तीव्र मंदी आणि प्रचंड महागाईला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे अमेरिका व ब्रिटनसारख्या महासत्ता हादरल्या. आयात-निर्यात ठप्प झाल्याने बड्या कंपन्यांवर उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली. परिणामी जागतिक अर्थव्यवस्था ठप्प पडण्याच्या मार्गावर येवून ठेपली. मंदीची झळ बड्या अर्थव्यवस्थांना बसू लागल्याने बेरोजगारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. गत वर्षभरात अनेक कंपन्या, संस्था, शाळा, महाविद्यालयांना संबंधितांना पगार देणे जमलेले नाही. अनेकांना नाईलाजास्तव दुसरा व्यवसाय सुरु करावा लागला आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आलेला असताना पुन्हा लॉकडाऊन न परवडणारे आहे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक, राजकीय सभा, धार्मिक महोत्सव येथे गर्दीवर नियंत्रण आणावे. तसेच नागरिकांनीही पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावे. शेवटी राज्य सरकारलाही जनतेचा विचार करावा लागणार आहे.
भारतात लसीकरणाचा वेग मंदावला
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा मंदावलेला वेग! जवळपास वर्षभरापासून संपूर्ण जगाला वेठीस धरणार्या कोरोना व्हायरस विरुध्द सुरु असलेल्या लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक लस कधी येणार याची सारे जग वाट बघत होते. कोरोना रोखण्यासाठी व शरीरात कोरोना प्रतिबंधक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस कधी या विषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. संशोधक व शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत व परिश्रम घेऊन अत्यंत कमी वेळेत काही लसींची निर्मिती केली. यापैकी भारत सरकारने ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ अशा दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला तीन कोटी लोकांना लस टोचली जात आहे व नंतर देशातील तीस कोटी जणांना लस देण्यात येणार आहे. कोरोना काळात फ्रटंफुटवर लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाचा उल्लेख जगातील सर्वात मोठी मोहिम म्हणून केला जात आहे. यामुळे जगभरातून याचे मोठे कौतुक केले जात असले तरी भारतात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, यात यंत्रणेचा दोष नसून लस टोचून घेण्यास अनेकजण उत्सूक नसल्याचे आता उघड झाले आहे. हा एकाप्रकारे शास्त्रज्ञांवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची आवश्यकता आहे. कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला काही होणार नाही, माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, अशा भ्रमात न राहणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
Post a Comment