आंतरराष्ट्रीय कटाचे ‘टूलकिट’!

भारतात गत अडीच महिन्यांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसक आंदोलनाशी संबंधित सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या ‘टूलकिट’च्या मुद्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. स्विडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हे टूलकिट शेअर केले होते. यावर वाद सुरु झाल्यानंतर तिने लगेचच ते ट्विट डिलीट केले. शेतकरी आंदोलनातील हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. जर हे षडयंत्र नसते तर ग्रेटा थनबर्गला तिचे ट्विट डिलिट करण्याची गरजच भासली नसती. यासंदर्भात परदेशी शक्ती सक्रिय आहेत हे यावरून लक्षात येते. या प्रकरणात रविवारी बेंगळुरुतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनांच्या आडून राजकीय पोळी शेकणार्‍यांमध्ये राजकीय चिखलफेक सुरु झाल्याने मुळ मुद्दा पुन्हा एकदा बाजूला पडला आहे.



आंदोलनात खलिस्तानवादी ?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून ग्रेटा थनबर्गने एक ट्वीट केले होते. त्यासोबत एक टूलकिट शेअर केले होते. त्या टूलकिटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलन कशा प्रकारे करण्यात यावे याची माहिती देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विस्तार कशा पद्धतीने करायचा, काय पाऊले उचलायची याची सखोल माहिती या टूलकिटमध्ये देण्यात आली होती. शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट करताना कोणता हॅशटॅग वापरायचा, काय ट्वीट करायचे तसेच सरकारच्या कारवाईपासून कसा बचाव करायचा याची सखोल माहितीही देण्यात आली होती. नंतर यावरुन वाद झाल्याने ग्रेटा थनबर्गने ते टूलकिट डिलीट केले. हे टूलकिट खालिस्तानवादी समर्थकांकडून तयार करण्यात आले आहे असा संशय व्यक्त करुन दिल्ली पोलिसांनी त्या संबंधी गुन्हा नोंद केला होता. आता शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी अँगलने याचा तपास करण्यात येत असतांना तपासयंत्रणा दिशा रवी या २१ वर्षीय तरुणीपर्यंत येवून पोहचलेत. दिशा रवीने हे टूलकिट तयार करण्यात आणि ते फॉरवर्ड करण्यात महत्वाची भूमिका बजावली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिशा रवी ही बेंगळुरुतील माउंट कार्मेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून ती पर्यावरण चळवळीत सक्रिय आहे. दिशा रवी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या मोहीमेची सह-संस्थापक आहे. ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या मोहीमेच्या माध्यमातून पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली होती. खलिस्तानवादी समर्थक संघटना असलेल्या पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या मदतीने दिशा रवी देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र ‘मी टूलकिटमधील फक्त दोनच ओळी संपादित केल्या आहेत. मी हे फक्त शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ केले. ते आपले अन्नदाता आहेत. त्यांच्या आंदोलनाने मी प्रभावीत झाले. ते मला अन्न आणि पाणी देतात’, असे दिशाने कोर्टात सांगतिले. यानंतर कोर्टाने दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

भारताची प्रतिमा डागाळणे हा टूलकिटचा हेतू 

आता दिल्ली पोलिस गूगलला त्या आयपी एड्रेस आणि लोकेशनची माहिती विचारणार आहेत, जिथून हे टूलकिट प्रथम गुगल डॉक्सवर अपलोड केले गेले होते. आयपी एड्रेस आणि लोकेशनद्वारे ज्याने हे टूलकिट तयार करून ते गुगल डॉक्सवर अपलोड केले त्या व्यक्तीस शोधण्यात मदत होईल. टूलकिटचा मुद्दा भारतीय सायबर कायद्याच्या कक्षेत येतो. भारतात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० हाच या संदर्भातील कायदा आहे. हा कायदा संगणक, संगणकप्रणाली, संगणक नेटवर्क, संगणकीय उपकरणे आणि संचार उपकरणे याबरोबरच इलेक्टॉनिक स्वरूपातील डेटा आणि माहितीचा उपयोग करून केल्या जाणार्‍या प्रत्येक कृतीशी निगडित आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ डी अन्वये टूलकिटप्रकरणी कारवाई करता येऊ शकते. हा एक शिक्षापात्र गुन्हा असून, त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. यातही कलम ६६ एफ हे सायबर दहशतवादाशी संबंधित कलम आहे. सायबर दहशतवाद हाही शिक्षापात्र गुन्हा असून, त्याअंतर्गत देण्यात येऊ शकणारी कारावासाची शिक्षा जन्मठेपेपर्यंत प्रदीर्घ असू शकते. ग्रेटाला हे टूलकिट नक्की कुठून मिळाले याचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. हे टूलकिट खलिस्तान समर्थक संघटनेने ग्रेटा थेनबर्गला दिले आहे आणि तेच थनबर्गला वित्तपुरवठा करीत आहेत का? या दिशेनही दिल्ली पोलिसांचा तपास सुरु आहे. यात खरे खोटे काय आहे? हे तपासाअंती समोर येईलच मात्र या टूलकिटचा हेतू भारताची प्रतिमा डागाळणे हा होता, हे प्रथमदर्शनी दिसून येते. 

अमेरिकेतील ’ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ 

ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेले हे टूलकिट ‘पीस फॉर जस्टीस’ च्या वतीने तयार केले गेले होते. ही संस्था कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये आहे. या पॉवरपॉईंट सादरीकरणात भारताविरूद्ध लक्षित कारवाईची यादी सविस्तरपणे लिहिलेली होती. ग्रेटाने शेअर केलेल्या टूलकीटमध्ये, सध्या सुरू असलेल्या शेतकरी चळवळीविषयी आवश्यक अपडेट्स कसे मिळवायचे? जर कोणाला शेतकरी चळवळीवर ट्विट करायचे असेल तर त्याने कोणता हॅशटॅग वापरावा? जर काही समस्या असेल तर कोणाशी बोलावे? ट्विट करताना काय करणे महत्वाचे आहे? काय टाळावे? या सर्व गोष्टी आहेत. टूलकिट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. अमेरिकेतील ’ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या आंदोलनात अशा प्रकारचे टूलकिट पहिल्यांदा चर्चेत आले होते. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते. आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावे, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते.

Post a Comment

Designed By Blogger