अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात थेट चर्चा झाली. कोरोनाविरोधातील लढाई, जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे, दहशतवादाविरोधात एकत्र लढणे अशा महत्वाच्या मुद्द्यांवर महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्याचे बायडेन आणि मोदी यांनी निश्चित केले. दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशात संचार स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि प्रादेशिक एकात्मता टिकविण्यासाठी एकमेकांना अधिक सहकार्य करण्याचे मान्य केले. भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण आहे. कारण परंपरेप्रमाणे, अमेरिकेचे नवे अध्यक्ष सर्वप्रथम कॅनडा आणि मेक्सिको या शेजारील देशांच्या प्रमुखांशी चर्चा करतात. यानंतर बायडेन यांनी ‘नाटो’ करारातील देशांबरोबर संवाद साधला. आकडेवारीबाबत बोलयाचे म्हटल्यास गेल्या महिन्यात २० जानेवारील शपथ घेतल्यानंतर बायडेन यांनी आतापर्यंत केवळ नऊ देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. नाटो सहकारी आणि शेजारील देश वगळता बायडेन यांनी ज्यांच्याशी संवाद साधला असे मोदी हे पहिलेच नेते आहेत. यावरुन अमेरिकेच्या दृष्टीने भारताचे असलेले महत्व लक्षात येते. त्याचप्रमाणे जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान खूप वरचे असल्याचेही स्पष्ट होते.
अमेरिकेचे भारताबरोबरचे संबंध कसे राहतील?
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर जो बायडेन राष्ट्राध्यक्षपती विराजमान झाल्यानंतर भविष्यातील भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधाबाबत चर्चा होणे स्वाभाविक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेसोबतच्या संबंधात चांगली सुधारणा झाली होती. त्यामुळे बायडेन यांच्या राजवटीत अमेरिकेचे भारताबरोबरचे संबंध कसे राहतील, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोे बायडेन हे भारताचे महत्त्व जाणून आहेत आणि भारतासाठी देखील अमेरिका महत्त्वाचा देश आहे. भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह बायडेन प्रशासनात भारतवंशाच्या अनेकांना संधी देण्यात आली आहे. यावरुन बायडेन यांना भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? याचा अंदाज लावता येतो. बायडेन यांनी बराक ओबामा राष्ट्रपती असतांना उपराष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तेंव्हा त्यांनी अणू करारापासून अनेक महत्वपूर्ण करारांमध्ये भारताच्या बाजूने महत्त्वाची भुमिका निभावली आहे. यामुळे आता त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत-अमेरिकेच्या मैत्रीवर चर्चा होतांना दिसते. बायडेन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय रक्क करण्यास सुरुवात केली आहे. बायडेन यांनी वातावरण बदलाशी लढण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात महत्वपूर्ण घोषणा करत या करारामधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे. याशिवाय बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले इतरही काही निर्णय रद्द केलेत.
भारतीयांना न्यू ईअर गिफ्ट
यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द केला. या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवण्यात आला, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदांमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र अशा परिस्थितीतही बायडेन यांनी भारतासोबतच्या संबंधाना झुकते माप दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तत्काळ बायडेन यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ‘एच-१ बी’ व्हिसासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या निर्बंधांच्या भूमिकेत शिथिलता आणण्याचा अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेतला. भारतीयांच्या दृष्टीने हा अत्यंत कळीचा मुद्दा होता. अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहणारे भारतीयांची याच व्हिसाला प्रथम पसंती असते. ‘एच-१ बी’ व्हिसाचा सर्वाधिक वापर हा टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा यांसारख्या ५० हून अधिक भारतीय आयटी कंपन्यांशिवाय मायक्रोसॉफ्ट, गुगल यांसारख्या मोठ्या अमेरिकी कंपन्यादेखील करतात. यासंदर्भात ट्रम्प यांचा वादग्रस्त निर्णय बदलवून बायडेन यांनी भारतीयांना न्यू ईअर गिफ्टच दिले आहे. यासह त्यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
भारत-अमेरिका संबंधांना बळकटी
आता भारत-अमेरिका संबंधांना बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोनाविरोधातील लढाई, जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे, दहशतवादाविरोधात एकत्र लढणे, हिंद-प्रशांत प्रदेशातील शांततेसाठी प्रयत्न करणे अशा मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्यात येणार आहे. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशात संचार स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि प्रादेशिक एकात्मता टिकविण्यासाठी एकमेकांना अधिक सहकार्य करण्याचे मान्य केले. पर्यावरण बदलाच्या मुद्द्यावरही गंभीरपणे काम करण्याचा निश्चय दोन्ही देशांनी व्यक्त केला. म्यानमारमधील परिस्थितीवरही दोघांनी चर्चा केली. भारत हा निश्चितपणे महासत्ता आहे, हे आता अमेरिका देखील मान्य करते. यामुळेच बायडेन यांनी भारतासोबत संबंध बळकट करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले आहे. मोदी आणि बायडेन यांच्या चर्चेआधी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत चर्चा करून हिंद प्रशांत क्षेत्रात संरक्षण सहकार्य आणखी द़ृढ करण्यावर भर दिला आहे. दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय संरक्षण सहकार्य आणि उभय देशांत सामरिक सहकार्य मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शविली. भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलविन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना भविष्यातील रणनीती आखण्यासाठी चर्चा करण्यास निमंत्रण दिले आहे. भारतासाठी हिंद प्रशांत क्षेत्र नेहमीच डोकेदुखी ठरली असल्याने दोन्ही देशांमधील चर्चेला निश्चितपणे महत्व आहे.
Post a Comment