चीनची हुकूमशाही आणि बेपत्ता जॅक मा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यानंतर जॅक मा कुठेही दिसलेले नाहीत. कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकुमशाहीवर पुन्हा एकदा जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. निरंकुश सत्ता हाती घेतलेल्या वा ती प्रदीर्घकाळ उपभोगणार्‍या सत्ताधीशाची लालसा व अनिर्बंध सत्तेच्या हव्यासामुळे हुकूमशाही राजवटीची सुरुवात होते. याचे ठसठशीत उदाहरण म्हणजे स्वत:ला साम्यवादी म्हणवून घेणारा चीन! चीनमध्ये साम्यवादाच्या गोंडस नावाखाली हुकूमशाही राजवटीखालीच आहेत, हे आता जगापासून लपून राहिलेले नाही. सर्वसामान्य जनतेस फारसे नागरी स्वातंत्र्य बहाल न करता, त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने लादायची व त्या विरोधात आवाज उठवणार्‍यांचा आवाज कायमचा बंद करायचा, हिच चीनची वृत्ती राहिली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.


चीनची माणसे जगाचे बोलतात, पण स्वत:च्या देशाच्या राजकारणाविषयी बोलणे टाळतात

साम्यवादी विचारसरणी आणि माओचा डावा विचार यांना कधीचीच तिलांजली दिलेल्या व १९७५ मध्येच जागतिक स्तरावर खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेल्या चीनने ८०च्या दशकानंतर वेगवान प्रगती करत चीनला जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थसत्ता, लष्करीसत्ता व महासत्ता बनविले. मात्र दुसरीकडे चीनने आपली राजकीय हुकूमशाही मात्र कायम ठेवली आहे. कृषी उत्पादनापासून ते अण्वस्त्रे विकसित करण्याच्या प्रचंड ईर्ष्येने चीनने प्रत्येक क्षेत्रांत अमेरिकेसोबत स्पर्धात्मक वाटचालीला प्राधान्य दिले. दक्षिण चीनी समुद्र असो वा आपल्या सीमेशेजारील छोटे छोटे देश असोत, चीनची सत्तालालसा आज वेगाने वाढली आहे. याच सत्ता लालसेने चीनचे अध्यक्ष शी झिपिंग यांची त्या देशाने आपले तहहयात अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तेच राष्ट्रप्रमुख, लष्करप्रमुख, विधिमंडळप्रमुख व पक्षाचेही सर्वश्रेष्ठ नेते आहेत. १५० कोटी लोकसंख्येचा देश त्यांनी या सार्‍या बळावर व नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या मुठीत ठेवला आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या एककल्ली व हुकूमशाही वृत्तीच्या नेत्याची वाटचाल चीनचा ‘दुसरा माओ’ होण्याच्या दिशेने सुरु असल्याचे मानण्यात येते. चीनची माणसे जगाचे बोलतात, पण स्वत:च्या देशाच्या राजकारणाविषयी बोलणे टाळतात. चीनचा विकास प्रचंड वेगाने झाला, मात्र सर्वसामान्य चिनी नागरिकांचे जीवनमान किती उंचावले, हे लाल पोलादी भिंतीआडच राहिले. चीनच्या या हुकूमशाही वृत्तीची पुन्हा चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे चीनचे अरबपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जॅक मा यांनी चीनची बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांसंदर्भात बोलताना ऑक्टोबरमध्ये शांघाईत दिलेल्या भाषणात टीका केली होती. 

चिनी सरकारसोबत झालेल्या वादानंतर जॅक मा बेपत्ता

जगभरातील कोट्यवधी लोकांचा आदर्श असलेले जॅक मा यांनी सरकारला आव्हान दिले होते. त्यांनी चीनमधल्या बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. जॅक मा यांच्या भाषणानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासून जॅक मा यांच्यावर सत्ताधार्‍यांकडून निशाणा साधण्यात येत होता. हा वाद एवढ्यावरच न थांबता पुढे जॅक मा यांनी स्थापन केलेला अलिबाबा समूहावर कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकार्‍यांनी जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे ३७ अब्ज डॉलर्सचे आयपीओ निलिंबित केले. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचे आदेश थेट चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर जॅक मा यांना ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जॅक मा यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. जोपर्यंत अलिबाबा समूहावर करण्यात आलेली कारवाई सुरु आहे, तोपर्यंत जॅक मा देशाबाहेर जाऊ शकत नाहीत, असे चिनी अधिकार्‍यांनी जॅक मा यांना सांगितलं होते. त्यानंतर जॅक मा त्यांचा प्रसिद्ध टीव्ही शो ’अफ्रीका बिजनेस हीरोज’ यातही नोव्हेंबरपासून दिसलेले नाहीत. एवढंच नाहीतर या शोमधूनही जॅक मा यांचा फोटो हटवण्यात आला आहे. अलिबाब समूहाचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक मा यांना चिनी सरकारसोबत झालेल्या वादानंतर शोमधील परिक्षकांच्या पॅनलमधून पायउतार करण्यात आले आहे. दरम्यान, या शोच्या फायनलपूर्वी काही आठवड्यांआधी जॅक मा यांनी एक ट्वीट केले होते. त्यानंतर पासून त्यांच्या तिनही ट्विटर अकाउंटवरुन एकही ट्वीट करण्यात आलेले नाही.

चीनमध्ये शेकडो उद्योगपती, विचारवंत आणि अभ्यासक गायब

चिनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चिनमधील सत्ताधार्‍यांनी जॅक मा यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. परंतु, चिनमध्ये हे पहिल्यांदाच घडत नसून याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधीही सरकार विरोधात बोलणार्‍या अनेकांना चिनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. याआधी शी जिनपिंग सरकारवर टीका करणारे प्रॉपर्टी बिजनसमन रेन झिकियांग अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शी जिनपिंग यांना सल्ला देत त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी यांना ‘जोकर’ म्हटले होते. बेपत्ता झाल्यानंतर सहा महिन्यांनी, भ्रष्टाचाराच्या विविध गुन्ह्यांची कबुली दिल्याबद्दल त्याला १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अब्जाधीश फायनान्सर झियान जियान्हुआ यांना हाँग-योंग येथील हॉटेलमधून ताब्यात घेतल्यावर अजूनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. तीन वर्षांहून अधिक काळ नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. अशा पद्धतीने चीनमध्ये शेकडो उद्योगपती, विचारवंत आणि अभ्यासक गायब झालेले आहेत. केवळ उद्योगपतीच नव्हे तर आपल्या सरकारविरुद्ध तोंड उघडणार्‍या लोकांविरुद्ध मोहीम लढल्याबद्दल चीनवर टीका करण्यात येते. हुकुमशाही व्यवस्था किती क्रूर आणि भयानक असते याचेच हे द्योतक आहे. मात्र कोणतीही हुकूमशाही फार काळ टिकत नाही. जगातल्या हुकूमशाह्या गेल्या ५० वर्षांत झपाट्याने कमी झाल्या आहेत, याची जाणीव चीनला असेलच!

Post a Comment

Designed By Blogger