आनंदी पुणेकर अन्त्र स्त जळगावकर

भारतामधील सर्वात आनंदी शहरांच्या यादीची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’च्या या यादीमधील देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे १२व्या क्रमांकावर, नागपूर १७ तर मुंबई २१व्या क्रमांकावर आहे. शहरात राहतांना मिळणार्‍या सुखसोयी, शिक्षण, कमाई आणि वयोमान तसेच जीवनशैली यांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत जळगाव शहर कोणत्या क्रमांकावर आहे? असा प्रश्‍न जळगावकरांना पडणे स्वाभाविकच आहे. कोणत्याही नागरिकाच्या आनंदाचा संबंध त्याच्या मुलभुत सुविधांसह रोजगार व जीवनशैलीशी असतो. मात्र जळगाव शहरातील रस्ते, गटारी, पथदिव्यांसह विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. साफसफाईच्या समस्या सर्वाधिक असून, रस्त्यांवरील खड्डे व धुळीबाबत नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात ओरड होत आहे. सुवर्णनगरी, केळी व कापसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या जळगावचा औद्योगिक विकास खुंटला आहे. यामुळे जळगावकर किती आनंदी आहेत यापेक्षा किती त्रस्त आहेत, याचा प्रामाणिकपणे शोध घेण्याची वेळ आली आहे.



इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०

‘इस शहर मे हर शक्स परेशान सा क्यों है,’ असा प्रश्‍न जळगावकरांच्या बाबतीत सातत्याने उपस्थित होत असतो. अर्थात यास अनेक कारणे आहेत. जळगावकरांच्या आनंदाच्या बाबतीत आता चर्चा सुरु होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ अनेक दशकांपासून व्यवस्थापनसांदर्भातील संशोधनामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील १३ हजारहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन ३४ आनंदी शहरांची यादी तयार केली आहे. त्यांच्या या प्रोजेक्टमुळे पहिल्यांदाच भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड ही तीन शहरे अव्वल स्थानी आहेत. तर टू टीयर सीटींच्या यादीमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली ही शहरे सर्वाधिक आनंदी शहरे ठरली आहेत. त्याचप्रमाणे टू-टीयर सीटींच्या यादीत लुधियाना, चंदिगड आणि सुरत या तीन शहरांनी बाजी मारली आहे. टीयर थ्री व टीअर फोर मध्ये मोडणार्‍या शहरांची नावे यात नसल्याने जळगावचे नाव देखील या यादीत झळकलेले नाही. असे का झाले? याचा शोध घेण्यासाठी या संशोधनाच्या मुळाशी जावे लागेल. आनंदी जीवनाचा संबंध तपासतांना त्याच्याशी निगडीत अन्य बाबींवर देखील लक्ष द्यावे लागते. यात प्रामुख्याने उल्लेख करावयचा म्हटल्यास, मुलभूत सुविधांपासून बेरोजगारी, गुन्हेगारी, असमानता या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आनंदी राहण्यावर पडतो असतोच! 

मुलभुत प्रश्‍न व समस्यांकडे प्राधान्यांने लक्ष देण्याची आवश्यकता

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गरीबी...गरिबीचा आणि आनंदी असण्याच्या प्रत्यक्ष संबंध आहे. या जोडीला सामाजिक एकोपा व एकमेकांवरील विश्‍वास वाढविण्याची गरज आहे. जर आपण जगातील आनंदी पहिल्या पाच देशांचा अभ्यास केल्यास फिनलँड या छोट्याशा देशाचे उदाहरण मार्गदर्शक ठरु शकते. फिनलँड हा देश सलग तिसर्‍या वर्षी जगातील आनंदी देश ठरला. आनंदाचे उत्स्फूर्त प्रदर्शन करण्याऐवजी या देशातील नागरिक शांतता आणि एकांत पसंत करतात. फिनलंडमधील नागरिकांची जीवनशैली उत्कृष्ट असून, सुरक्षा आणि सार्वजनिक सेवांमध्येही हा देश आघाडीवर आहे. सामाजिक विषमता आणि दारिद्र्य यांचे अस्तित्व तळाला आहे. तेथील लोकांचा स्थानिक सरकार, प्रशासन, पोलीस यांच्यावर अधिक विश्‍वास असतो. असाचा विश्‍वास आपल्याकडेही निर्माण होण्याची आवश्यकता आहे. जळगाव शहरालाही आनंदी शहरांच्या यातीत स्थान मिळवून द्यायचे असेल तर सर्वात आधी शहरातील मुलभुत प्रश्‍न व समस्यांकडे प्राधान्यांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज महापालिकेला रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाइट, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नियमित देणे अवघड झाले आहे. एकूणच गेल्या काही वर्षांत शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांना नागरी सुविधा मिळणेही मुश्कील झाले आहे. मनपावरील कर्ज, अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना, उड्डाण पुल, समांतर रस्त्यांचा प्रश्न सुटला असला तरी गाळ्यांचा प्रश्न, शहरातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व असुविधा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खड्ड्यांनी धूळधाण झालेल्या रस्त्यामुळे अपघाती मृत्यू होत असताना येथे आनंदी कोण राहू शकतो. 

आनंदासाठी समृद्धी आवश्यक

रोजगाराचा प्रश्न, उद्योगाची वाताहत तर झालीच; पण विकासाचे पर्वही थांबले आहे, हे नाकारुन चालणार नाही. साडेपाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असतानाही शहरांतर्गत बससेवा नाही. शहरातचा वाढता विस्तार लक्षात घेता रस्त्यांचे रुंदीकरण, उपनगरांमध्ये मूलभूत सविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. शैक्षणिकदृष्ट्या शहरात महाविद्यालये व व्यावसायिक अभ्यासक्रम देणार्‍या संस्थांची संख्या मोठी असली, तरी आयटी पार्कसारखे मोठे प्रोजेक्ट इथे नाहीत. दोन-चार अपवाद वगळता येथे मोठे उद्योग नाहीत. खरं तर ज्या शहरात विमानतळ असूनही त्या शहराला विकासाचे पंख का मिळाले नाहीत? याचे तटस्थपणे मुल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. येथे औद्योगिक वसाहत असूनही मोठे उद्योग येत नाहीत, नवीन उद्योग येथे यायला तयार नाहीत व आहे ते उद्योग बंद पडत आहेत. आवश्यक सुविधा व पोषक वातावरण नसल्यामुळे उद्योगांची वाताहत झाली आहे. परिणामी बेरोजगारीचा प्रश्न मोठा झाला आहे. आनंदासाठी समृद्धी आवश्यक असते व समृध्दीसाठी शहरातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे व प्रत्येकाला स्वावलंबी होणे आवश्यक आहे. यामुळे उद्योगनगरीला सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. उद्योगांच्या बाबतीत एकेकाळी जळगावच्या मागे असलेली औरंगाबाद व नाशिक सारखी शहरे आज खूप पुढे निघून केली आहे. यास अनेक कारण आहे. राजकीय वर्चस्वाची लढाई, हे त्याचे प्रमुख कारण असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. जळगाकरांना आनंदी ठेवायचे असेल तर सर्वात आधी जळगावच्या विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger