नामांतरावरुन शिवसेनेची गोची अन् उध्दव ठाकरेंची कसोटी

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा राज्यात रंगला आहे. औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करावे अशी जुनी मागणी आहे. शिवसेना औरंगाबादचा उल्लेख कायमच संभाजीनगर असा करते. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील बातम्यांतही हा उल्लेख संभाजीनगर असाच असतो. नामांतराची ही चर्चा नवी नसून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचे सरकार राज्यात होते तरीही या दोन शहराचे नामांतर होऊ शकले नाही. आता औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरु झाला आहे. औरंगाबादचे नामांतर व्हावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. तर काँग्रेसने नामांतरास स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे. महापालिका निवडणुकीत औरंगाबादच्या नामांतराचा हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. याची जाणीव काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनाही असल्याने या विषयावरची आपली भूमिका दोन्ही पक्ष सोडतील का? या प्रश्‍नाचे उत्तरच निवडणुकीची दिशा स्पष्ट करेल.

 


नामांतराची चर्चा गेल्या ३० वर्षांपासून

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक १९८८पासून संभाजीनगर नावाभोवतीच गाजत आहे. एका प्रचार सभेत बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचे आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात औरंगाबादमध्ये वास्तव्य होते, त्यामुळे या शहराला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करणारा ठराव औरंगाबाद महापालिकेने १९९५ मध्ये मंजूर केला. युतीच्या तत्कालीन मंत्रिमंडळाने अधिसूचना काढली. पण प्रकरण न्यायालयात गेले. नंतर निकाली निघाले. दरम्यानच्या काळात युतीची राज्यातून सत्ता गेली. त्यामुळे तेव्हा नामांतर बारगळले. ४ जानेवारी २०११ मध्ये महापालिकेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. ४ जानेवारी २०११ मध्येही पुणे महापालिकेत दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यात आला होता; याला उत्तर म्हणून शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एकदा औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर असे करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. या ठरावावर आघाडी सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. महापालिकेच्या गत निवडणुकीवेळी दरम्यान खुद्द उध्दव ठाकरे म्हणाले होते की, औरंगजेबांच्या स्मृती किती दिवस बाळगायच्या? राज्यात अन् केंद्रात आता आपले सरकार आहे, तेव्हा औरंगाबादच्या नामकरणाच्या परवानगीसाठी प्रयत्न करा, असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची आग्रही मागणी केली होती. 

शिवसेनेची गोची होणे स्वाभाविक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यूपीतील काही शहरांची नावे बदलल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा झाली पण पुढे काहीही झाले नाही. खरंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असताना नामांतर करणे शक्य होते, तेंव्हा शिवसेना देखील सत्तेत भागीदार होती पण भाजप आणि शिवसेनेच्या श्रेयवादाच्या राजकारणामुळे औरंगाबादचे नामांतर काही झाले नाही. आता उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी नामांतराचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नसल्याने भाजपा, मनसेने घेतलेल्या भुमिकेमुळे शिवसेनेची गोची होणे स्वाभाविक आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत नामांतराचा मुद्दा भावनिक केला जातो. केवळ सुरक्षा आणि भावनांच्या आधारावर शिवसेना मतदारांना आवाहन करते. मतदारही त्यास साद घालतात. विकास करायचा नाही; केवळ भावनेच्या जोरावरच महापालिका ताब्यात घ्यायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र यंदा शिवसेनाला हे पारंपारिक कार्ड खेळता येईल का? हा मुख्य प्रश्‍न आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचे ठामपणे सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमांमध्येही हा विषय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आयती संधी चालून आली.

महाविकास आघाडीत नाराजीचे नगाडे

यावर राजकारण झाले नसते तर नवलच! यावर प्रतिक्रिया देतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे केले आहे. त्यामुळे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे, असे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीत नाराजीचे नगाडे वाजू लागले आहेत. शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतरावरून आपली हीच भूमिका कायम ठेवली, तर काँग्रेसची नाराजी वाढण्याचा धोका आहे. मुळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन घटक पक्षांनी मिळून बनलेल्या सरकारमध्ये काँग्रेसकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची भावना गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील विविध नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि आता काँग्रेसचा ज्या विषयाला पूर्वीपासून विरोध आहे तोच विषय पुढे रेटण्याचे काम शिवसेनेने केले तर काँग्रेस नेत्यांची नाराजी अधिकच वाढणार आहे. या आगीत तेल ओतण्याचे काम करत भाजपने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावर आधीच भाजपाने शंका उपस्थित केल्याने यावेळी शिवसेना औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावरून माघार घेईल का, अशी पण एक शंका आहे. पण या वादामुळे सरकारच्या अस्तित्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशाच प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा विषय हाताळावा लागणार आहे. 

Post a Comment

Designed By Blogger