लसीकरणाबाबत उदासिनता

जवळपास वर्षभरापासून संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना व्हायरस विरुध्द सुरु असलेल्या लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक लस कधी येणार याची सारे जग वाट बघत होते. कोरोना रोखण्यासाठी व शरीरात कोरोना प्रतिबंधक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी लस कधी या विषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. संशोधक व शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत व परिश्रम घेऊन अत्यंत कमी वेळेत काही लसींची निर्मिती केली. यापैकी भारत सरकारने ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ अशा दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवातीला तीन कोटी लोकांना लस टोचली जात आहे व नंतर देशातील तीस कोटी जणांना लस देण्यात येणार आहे. कोरोना काळात फ्रटंफुटवर लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाचा उल्लेख जगातील सर्वात मोठी मोहिम म्हणून केला जात आहे. यामुळे जगभरातून याचे मोठे कौतुक केले जात असले तरी भारतात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, यात यंत्रणेचा दोष नसून लस टोचून घेण्यास अनेकजण उत्सूक नसल्याचे समोर आले आहे. 



आपली लस पूर्ण सुरक्षित

भारतात सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ व भारत बायोटेकची ‘कोवॅक्सीन’ या दोन लसींचा वापर केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात देखील झाली आहे. अन्य देशांतील लसींच्या तुलनेत भारतातील लसींचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. व ज्या काही अपवादात्मक घटना घडल्या आहेत, त्या फारशा गंभीर नाहीत. कोणत्याही लसींमुळे किरकोळ त्रास होत असल्याने वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. भारताने कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर व त्यांच्या गुणवत्तेबाबत खात्री झाल्यानंतर आखाती क्षेत्र, आशियासह आफ्रिका खंडातील अनेक देशांनी सरकारकडे लसीची मागणी केली आहे. भारताने आतापर्यंत सौदी अरेबिया, भूतान, मालदिव, सेशेल्स, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारसारख्या देशांना लसीचे डोस पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. भारताने ब्राझीलला २० लाख कोविड लसीचे डोस पाठवल्याने ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांना इतका आनंद झाला आहे की त्यांनी भारताचे आभार मानताना हनुमान संजीवनी घेऊन जात असलेला फोटो शेअर केला आहे. भारताच्या दोन्ही लसींच्या गुणवत्तेबाबत कौतुक होत आहे. ‘सीरम’चे सीईओ अदर पुनावाला यांनी स्वत:च लस टोचून घेतली व त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आपली लस पूर्ण सुरक्षित आहे, हाच संदेश पुनावाला यांनी त्यातून देशवासीयांना दिला आहे. 

लसीकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप

भारत कोरोना लसीकरणामध्ये जागतिक पुरवठा केंद्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लस आपल्याला कशी मिळणार, आपल्यापर्यंत कशी पोहोचणार, याची जनतेत जास्त उत्सुकता आहे. पण या लसीच्या गुणवत्तेविषयी काहींनी संशय व्यक्त केला आहे. लसीबाबतचा गैरसमज, चुकीची माहिती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. तसाच काहीसा प्रकार भारतात दिसून येत असल्याने पहिल्या टप्प्यात निर्धारित केलेल्या लसीकरणाच्या उद्दिष्ठांपेक्षा कमी प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे आकडेवारीवरुन दिसते. लस चांगली आहे, मग सरकारमधील मंत्री ती का टोचून घेत नाहीत, असा प्रश्न भाजपच्या विरोधकांनी विचारला आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हैरिस, ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ, पंतप्रधान बोरीस जॉन्सन आदी जागतिक नेत्यांनी लस टोचून घेतली आहे, मग केंद्रातील नेते का लस घेत नाहीत, अशी खोचक विचारणा विरोधी पक्षाने केली आहे. खरे तर राजकारण करण्याची ही वेळ नाही. लसीकरणावरुन सुरु झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप या मोहिमेत स्पीड ब्रेकरचे काम करु शकतात. विरोधीपक्षांकडून लसींवर दररोज प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारतात ज्या लसी विकसित केल्या आहेत, त्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखविले आहे. यामुळे यावर केवळ राजकारण करण्यासाठी चिखलफेक करणे चुकीचे आहे. किमान या संकट काळात राजकीय मतभेद बाजूला सारुन सर्व पक्षांनी लसींबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केल्यास आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होवू शकते. 

लसीकरणाबाबतची उदासिनता मोठ्या संकटांची नांदी!

पहिल्या टप्प्यात सर्वसामान्यांना ही लस मिळणार नसली तरी लसींवरचा विश्‍वास वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांना तयार करणे, हे मोठे आव्हान देखील सरकारला पेलावे लागणार आहे. लस टोचून घेणार्‍याची रोग प्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे लस न टोचलेल्या व्यक्तिला त्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो. परिणामी कोरोनाचा वेग मंदावतो. आजच्या स्थितीत भारतात कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला असला तरी जगाच्या पाठीवर ब्रिटन, अमेरिकासह अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणुमध्ये वेगाने बदल होत (म्युटेशन) आहेत. लसीकरणाला जितका विलंब होईल, तितकी सध्याच्या चाचण्या, उपचार आणि लशीला चकमा देणार्‍या नव्या प्रकारच्या विषाणुच्या उदयाची शक्यता अधिक असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दिला आहे. कोरोना विषाणू दिवसेंदिवस अनुवांशिकदृष्ट्या अधिक वैविध्यपूर्ण बनत आहे. त्यामागे नव्या रुग्णांचे वाढते प्रमाण हे एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक नव्या संसर्गामुळे विषाणुला स्वत:मध्ये बदल घडवून स्वत:चे अनेक नमुने तयार करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे, कोरोनावरील आत्तापर्यंत मुश्कीलीने मिळविलला ताबा पुन्हा निसटून परिस्थिती मूळपदावर जाण्याची चिंताही संशोधकांना सतावत आहे. आत्तापर्यंत, कोरोनावर लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे संकेत आहेत. मात्र, भारतात लसीकरणाबाबत दिसून येणारी उदासिनता व भीती नव्या संकटांना आमंत्रण देणारी ठरु शकते. आधीच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे, बेरोजगारीचे संकट गहिरे झाले आहे. या सर्वांची पुनर्रावृत्ती होवू द्यायची नसेल तर प्रत्येकाने कोरोनाबाबत गंभीर होणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबतची उदासिनता भविष्यात मोठ्या संकटांची नांदी ठरु शकते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी!

Post a Comment

Designed By Blogger