सात कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकणार्‍या एका शिक्षकाची गोष्ट...

पुस्तकाचे पारंपरिक शिक्षण कधी कधी मुलांना रटाळ, कंटाळवाणे वाटते. मात्र, तेच ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून शिकवले तर मुलांना अधिक रस वाटू शकतो. मात्र आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे का? याबाबतील सरकारने काहीतरी केले पाहिजे, असा केवळ विचार करत न बसता ते स्वत: सत्यात उतरणविणार्‍या एका मराठमोळ्या शिक्षकाची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. रणजितसिंह डिसले हे त्या शिक्षकाचे नाव! सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत डिसले शिक्षक आहेत. परितेवाडी हे माढा तालुक्यातील (जि. सोलापूर) छोटंसे गाव. परंतू मूळ बार्शीचे असणारे रणजितसिंह डिसले तळमळीने शिक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून देत पिढी घडवणार्‍या या शिक्षकाच्या जिद्दीची दखल सातासमुद्रापार घेतली गेली व युनेस्को तसेच लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सुमारे ७ कोटी रुपयांचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींच्या नावाची घोषणा हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी लंडन येथे एका समारंभात केली. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.


‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार

भारतात प्राचीनकाळापासून गुरु-शिष्याची परंपरा चालत आली आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळातदेखील एवढा मोठा योगी चांगदेव पण त्याने लहानग्या मुक्ताईला गुरू मानले. इथे वयाचा संदर्भ जोडताच येत नाही. येतो प्रश्न तो ज्ञानाचा. जीवनाचे तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळते तो म्हणजे गुरू. आई-वडिलांनंतर घराबाहेर पहिला गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक... शिक्षणाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजातही आमूलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद शिक्षकाकडे असते. स्वत:च्या ज्ञानाच्या जोरावर एक शिक्षकाने अर्थात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली आहे. शिक्षणाचा अभाव हे आजही जगभरात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे. दारिद्र्य, भेदभाव आणि संघर्षाचे समूळ उच्चाटन करण्याची शक्ती केवळ शिक्षणातच आहे. यामुळे पुढची पिढी घडविणार्‍या शिक्षकाचे कार्य अनन्य साधारणच आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. अर्थात तो शिक्षणक्षेत्रालाही लागू आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत व होतही आहेत. नवीन शैक्षणिक धोरण ठरवतांना केंद्र सरकारने ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी विद्यार्थी दोघांचा विचार करून हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर भर दिला आहे. नवीन शिक्षण धोरणात स्पष्ट सांगितले आहे की तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे दोन्ही आवश्यक आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे न्यू एज्युकेशन पॉलिसीला अपेक्षित आहे. यामुळे शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होणे ही भविष्याची गरज आहे हे ओळखून ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणार्‍या रणजितसिंह डिसले यांनी माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. 

शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक बदल

आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून काम करताना सुरुवातीच्या काळात नाममात्र विद्यावेतनावर काम केले. तंत्रज्ञान हा शिक्षणाचा भाग असू शकतो याची त्यांना जाणीव होती. तंत्रज्ञानाशिवाय असलेल्या शिक्षणाची स्थिती काय असेल यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहिले. स्वत:चे लॅपटॉप घेवून ते शाळेत जाते, तेथे विद्यार्थ्यांना हळूहळू विविध गेम्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची गोडी निर्माण केली. नंतर शालेय शिक्षणातील काही बाबींचे व्हिडिओ दाखवण्याची सुरुवात केली. त्यांच्या आकाराची मर्यादा आणि मोबाइल, डिस्क, पेनड्राइव्ह इत्यादींद्वारे त्याची देवाणघेवाण करताना अनेक अडचणी येत होत्या. नंतर इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावसायिकांकडून क्यूआर कोडबाबत माहिती मिळाली, याचा वापर शालेय शिक्षणासाठी चांगला होऊ शकेल हे लक्षात आल्याने त्याचा वापर सुरू केला त्यानंतर घडलेली शैक्षणिक क्रांती सर्वांच्याच समोर आहेच...मातृभाषेतून मुलांना आकलन चांगले होते म्हणून त्यांनी क्रमिक पुस्तकांचा अनुवाद करून ती सहज मिळावीत म्हणून क्यूआर कोडचा वापर केला. त्यामुळे ऑडिओ कविता, व्हिडिओ लेक्चर्स, कथा आणि गृहपाठाचा सहज अ‍ॅक्सेस मिळला. त्यांनी विकसित केलेल्या क्यूआर कोड पद्धतीचा प्रथम शासनाने सर्व ग्रेडसाठी लागू करावी म्हणून २०१७ मध्ये राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला. २०१८ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याची दखल घेऊन क्यूआर कोडची पद्धत एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांसाठी लागू करण्याची घोषणा केली. डिसले यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे सर्वात मोठे यश ठरले. हा शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठा क्रांतिकारक बदल समजला जातो. आता त्यांच्या याच क्यूआर कोड पद्धतीची जागतिक पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. तंत्रवैज्ञानिक बदल आगामी काळात अजूनच प्रभावी असतील आणि जग ज्या पद्धतीने बदलत आहे त्या स्पर्धेत भारताला उतरायचे असेल तर शिक्षणात गुंतवणूक करणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी शिक्षकांनी तंत्रस्नेही होऊन नव्या भारताची सुरुवात करायची आहे.

क्यूआर कोड म्हणजे काय ?

क्यूआर कोडचा इतीहास मोठा रंजक आहे. १९९४ मध्ये डेन्सो वेव्ह या जपानी कंपनीने क्यूआर कोड सिस्टमचा शोध लावला होता. मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान वाहनांचा मागोवा ठेवणे हा त्या मागचा हेतू होता. आता एखादी ऑडीओ ऐकण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी, एखाद्या प्रॉडक्टची अधिक माहिती घेण्यापासून डिजिटल पेमेंट करण्यापर्यंत क्यूआर कोडचा वापर केला जातो. २०१६ मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने भारत क्यूआर नावाचा एक सामान्य क्यूआर कोड सुरू केला, जो चारही प्रमुख कार्ड पेमेंट कंपन्यांद्वारे संयुक्तपणे तयार केला गेला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी मास्टरकार्ड, व्हिसा आणि अमेरिकन एक्सप्रेस यांच्यासह रुपे कार्ड चालवते. आता दिसले यांच्या प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्रात याचा मोठ्याप्रमाणात वापर होवू लागला आहे.

पुरस्काराच्या ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना

सन २०१५ मध्ये या पुरस्कारास सुरुवात झाली. संबंधित देशांच्या स्थानिक कायद्यांनुसार मान्यता असलेल्या शाळांमध्ये शिकवणारा जगातील कोणत्याही देशाचा शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र ठरतो. आतापर्यंत २०१५मध्ये नॅन्सी अ‍ॅटवेल (अमेरिका), २०१६ हनान अल हरब (पॅलेस्टाइन), २०१७ मॅगी मॅकडोनेल (कॅनडा), २०१८ अ‍ॅन्द्रिया झफिराकू (इंग्लंड), २०१९ पीटर ताबिची (केनिया) तर आता २०२० मध्ये रणजितसिंह दिसले यांची निवड झाली आहे. यावेळी ज्या अंतिम १० मधून डिसले यांची निवड झाली त्या दहा जणांत ओलासुनकामी ओपिफा (नायजेरिया), जेमी फ्रॉस्ट (ब्रिटन), कार्लो मेझोन (इटली), मोखुंदू सिंथेया मकाबा (द. आफ्रिका), ली ज्युल्क (अमेरिका), युन जेआँग ह्यून (द. कोरिया), सॅम्युएल इसाई (मलेशिया), डोआनी इमॅनुएला (ब्राझील) आणि व्हिएतनामच्या आणखी एका स्पर्धकाचा समावेश होता. यातून डिसले गुरुजींनी बाजी मारली. त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे. त्या माध्यमातून ९ देशांतील शेकडो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ३० टक्के रक्कम डिसले ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार आहे. त्यामुळे देशातील शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळण्याचा प्रयत्न करण्यात येईल तर, उर्वरित २० टक्के रक्कम विविध देशातील विद्यार्थ्यांच्या ’पीस आर्मी’साठी देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे.

Post a Comment

Designed By Blogger