मधाचा ‘विषारी’ गोडवा

भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर सातत्याने चर्चा होत असते. हे ‘स्लो पॉयझनिंग’सारखे काम करत असल्याने तारुण्यात अनेकांना विविध व्याधींनी ग्रासण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवाळीत भेसळयुक्त माव्याची मिठाई, युरिया मिश्रीत दूध, फळभाज्या पिकविण्यासाठी होणारा रसायनांचा वापर ही दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे आहेत. गेल्यावर्षी मॅगीतील भेसळ हे प्रकरण खूपच गाजले होते. आता औषधी गुणधर्म असणार्‍या मधातही भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. आधी दारोदारी विकल्या जाणार्‍या मधात साखरेचा किंवा गुळाच्या पाकाचा वापर करुन भेसळ केल्याच्या तक्रारी होत असत मात्र आता विश्‍वासर्हातेच्या नावावर विकल्या जाणार्‍या मोठ्या ब्रॅण्डच्या मधातही भेसळ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत सेंटर फॉर सायन्स अँड एनवॉयरनमेंटने(सीएसई) खुलासा केला आहे. सीएसईने १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचे दिसून आले. यात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.मधात शुगर सीरपची भेसळ

भारतात प्राचीन काळापासून औषधी गुणधर्म असलेल्या मधाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. मध आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्येही मधाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मधमाश्या फुलांमधून परागकण गोळा करतात व पोळ्यांमध्ये साठवतात. मधकोशात साठवून ठेवलेल्या या परागकणांमधून मध तयार होते. त्याला अतिशय शुद्ध मानले जाते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, लहान मुलांच्या दुधामध्ये मिसळण्यासाठी मधाचा वापर केला जातो. विविध गोष्टींवर गुणकारी ठरणारे मध शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करते. परंतु मधाचा हा गोडवा विषारी असल्याचे समोर आले आहे. सीएसईनुसार, बाजारात विक्रीसाठी असणार्‍या मधात शुगर सीरपची भेसळ केली जाते, जी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. मधासंबंधीचा हा रिपोर्ट भारत आणि जर्मनीच्या प्रयोगशाळेत झालेल्या एका अध्ययनावर आधारित आहे. अर्थात डाबर आणि पतंजलीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे. याआधी एफएसएसएआयने देशात आयात केला जाणारा मध गोल्डन सिरप, इनव्हर्ट शूगर सिरप आणि राईस सीरपची भेसळ करून विकला जात असल्याचे सांगितले होते. चीनमधील कंपन्या फ्रक्टोजच्या रुपात हे सीरप भारतात पाठवतात. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मधाचे सेवन

देशभरातील लोक सध्या कोरोनाशी लढा देत असून त्यातून बचावासाठी अद्याप कोणतंही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. या कठिण काळात जेवणात साखरेचे प्रमाणाहून अधिक सेवन अधिक हानिकारक ठरू शकते, त्याशिवाय कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीय मधाचे अधिक सेवन करतायेत. अशात भेसळयुक्त मधामुळे वजन आणि लठ्ठपणा अधिक वाढू शकतो, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मधासह अनेक अन्न पदार्थांमध्ये होणार्‍या दुष्परिणाम अनेक आहेत व रोज भेसळीचे अन्न पोटात जाऊन काही काळानंतर परिणाम दिसायला लागतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यास लवकरच दमा, डोकेदुखी, मधुमेह, शरीरावर व्रण उमटणे, अ‍ॅलर्जी यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे चार जिने चढून गेले तरी धाप लागणे, हातपाय थरथरणे, शरीरातील आंतरअवयव निकामी होण्याचेही धोके वाढत आहेत. काही वेळा मात्र ताबडतोब दुष्परिणाम दिसतात व मृत्यूही येऊ शकतो. भेसळीमुळे बर्‍याच लोकांना अपंगत्व आलेले आहे. तरीही भेसळ अखंडपणे चालूच आहे. एका अहवालानुसार, गेल्या काही वर्षात संपूर्ण जगभरात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर सन २०३० पर्यंत हा आजार जगातील सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर किंवा गोड पदार्थ जास्त खाल्याने मधुमेह होण्याची शक्यता असते. या आजाराचे निदान लवकर झाले नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. ५० टक्के मधुमेही रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकार आणि पक्षाघात आहे. 

थोड्या पैशाच्या लालसेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ

जगातील अंधत्व हे मधुमेहाच्या दृष्टिपटलावरील परिणामामुळे होते. मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करायला लागण्याचेदेखील महत्त्वाचे कारण मधुमेह हे आहे. अशावेळी अनेक जण गोड टाळतांना साखर किंवा गुळाऐवजी मधाचा वापर करतात मात्र त्या मधातही साखरेचा पाक असल्याने एकाप्रकारे ते विषाचेच सेवन करत आहेत. भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री हा देशातील एक चिंतेचा विषय आहे. थोड्या पैशाच्या लालसेसाठी भेसळ माफिया लोकांच्या जीवाशी खेळतात. आपण रोज खातो त्या अन्नात काय काय मिसळलेले असते आणि किती कस असतो हा प्रश्न बर्‍याच लोकांना पडतो. यासाठी अनेकजण ब्रॅण्डेड पदार्थांची निवड करतात मात्र आता या ब्रँडेड कंपन्यादेखील भेसळीच्या जाळ्यात ग्राहकांना ओढत असल्याने, आता करावे तरी काय आणि खावे तरी काय? हा प्रश्‍न सतावू लागला आहे. भेसळीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. काही वेळा छापे मारुन भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणार्‍यांवर कारवाई केली जाते. मात्र प्रशासनाची ही कारवाई अपुरी पडते का? भेसळयु्क्त खाद्यपदार्थ विकणार्‍यांना अभय कोणाचे? कारवाईबाबत नियोजनाचा अभाव आहे का? भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणारे व तयार करणार्‍यांविरोधात सतत मोहिम का राबवली जात नाही? भेसळखोरीला लगाम लावण्यासाठी नेमकी काय उपाययोजना आवश्यक आहे? या बाबींचा सरकारने गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढची पिढी कधीच माफ करणार नाही. ही समस्या मुळापासून सोडविण्यासाठी सेंद्रिय पध्दतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. भाजीपाल्यासह खाद्यपदार्थ सेंद्रिय पध्दतीने पिकविले गेले तरच भेसळीचे विष पोटात जाणे कमी होईल. यासह जंकफूड टाळणे आपल्या हातात आहे. मुलांना घरी बनविलेल्या पदार्थांची गोडी लागली की ही समस्या काही प्रमाणात निश्‍चितपणे कमी होवू शकते!

Post a Comment

Designed By Blogger