‘किड ऑफ द इयर’ गीतांजली राव

भारतीय वंशाच्या गीतांजली राव या १५ वर्षांच्या मुलीने टाईम मासिकाचा २०२० या वर्षाचा ‘किड ऑफ द इयर’ हा मानाचा किताब मिळवला आहे. जगभरातील ५ हजार स्पर्धकांवर मात करत हा बहुमान तिने पटकावला. तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण ते औषधांचे व्यसन आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केले आहे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी गितांजलीने अचाट आणि अद्भूत कामगिरी करुन दाखवली आहे. यापूर्वी तिला डिस्कव्हरी एज्युकेशन एम ३ यंग सायंटिस्ट चॅलेंज पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यामुळे गीतांजलीला अमेरिकेतल्या सर्वोच्च पदावर काम करणार्‍या शास्त्रज्ञांबरोबर तिला तीन महिने कामाची संधी मिळाली होती. गीतांजलीने मध्यंतरी पाण्यातील शिसे शोधून काढण्याचे यंत्र विकसित केले होते. पाण्यामधील शिसे शोधण्याच्या पद्धतीवर जगभर प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण गीतांजलीने शोधलेली पद्धत सोपी तर आहेच, पण कमी खर्चात होणारी असल्याने जगभर कुठेही त्याचा सहज वापर शक्य आहे. तिच्या या शोधाचेही प्रचंड कौतूक झाले होते.


यंग सायंटिस्ट

एक प्रसिद्ध म्हण आहे की जर तुम्ही एका वर्षांसाठी नियोजन करत असाल तर शेतात पिकं पेरणी करा, जर तुमचे नियोजन दहा वर्षांसाठी असेल तर तुमच्या शेतात झाडे लावा अन् जर दीर्घ भविष्यासाठी नियोजन करायचे असेल तर येणार्‍या पिढीला सुशिक्षित करा. भारताच्या शिक्षणपध्दतीवर जेंव्हा चर्चा होते तेंव्हा गुणवत्तेबाबत नेहमी चिंता व्यक्त केली जाते. मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी माझे काय योगदान असेल? यावर कुणीही विचार करत नाही. अर्थात यास काही अपवाद असतात. आपल्याला जग बदलायचे असेल तर बदलाची सुरुवात स्वत:पासूनच केली पाहिजे, असा विचार अमेरिकेतल्या कोलोरॅडो राज्यात येथे राहणारी गीतांजली राव हिने वयाच्या दहाव्या वर्षीच केला होता. दहा वर्षांची असतांना गीतांजलीने कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नोलॉजीवर ती संशोधन करत असल्याचे पालकांना सांगितले. ज्या वयात कॅडबरी, नवे कपडे, खेळणी आदींसाठी पालकांकडे हट्ट धराला जातो त्या वयात तिने नाविन्यपूर्ण विषयावर संशोधनाचा श्रीगणेश: केला होता. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गीतांजलीने ‘डिस्कव्हरी एज्यूकेशन ३ एम सायंटिस्ट चॅलेंज’ ही स्पर्धा जिंकली. तिच्या संशोधनासाठी फोर्ब्सच्या ३० वर्षांच्या आतील ३० जणांच्या यादीत तिचा समावेश झाला. आता गीतांजलीने नवीन अ‍ॅप विकसित केले असून, त्याचे नाव ‘काईन्डली’ असे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत हे अ‍ॅप सायबरबुलींगचा शोध घेते. तसेच तिने ‘टेथिस’ नावाचे एक उपकरण तयार केले असून ते कार्बन नॅनोट्यूबच्या मदतीने पाण्यातील शिशाचे प्रमाण शोधून काढते. सध्या ती वेदनाशामक औषधांचे व्यसन शोधून काढून म्यु-ओपाईड रिसेप्टर जनुकाद्वारे होणार्‍या प्रोटीन उत्पादनावर आधारीत संशोधन करत आहे. २०१८ मध्ये तिने अमेरिकेतील मानाचा, पर्यावरण संरक्षण संस्था प्रेसिडेंट एन्व्हायर्नमेंटल युथ पुरस्कार मिळवला होता. 

 जेनेटीक्समध्ये प्रचंड आवड

‘टाईम’ला दिलेल्या मुलाखतीत गीतांजली म्हणाली, मला टिपिकल सायंटिस्ट आवडत नाहीत. मी टीव्हीवर पाहते ते सायंटिस्ट सगळे गोरे, वयस्क असतात. मी हे काम करू शकते तर तुम्हीही ते करू शकता, कोणीही ते करू शकते.’ गीतांजली एमआयटी टेक रिव्ह्यूची वाचक आहे. ‘तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एमआयटी, हॉर्वर्डचे संशोधक नाविन्यपूर्ण संशोधन करत आहेत, ते वाचायला तीला खूप आवडते. त्यातून प्रेरणा मिळते. जेनेटीक्समध्ये प्रचंड आवड असलेल्या गीतांजलीला एमआयटीमधून जेनेटीक्स आणि साथ रोग या विषयांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. गीतांजलीच्या या वाटचालीबद्दल कौतूक करावे तितके कमीच आहे. खरे सांगयचे म्हटल्यास लहानपणापासून अशा पध्दतीची विचारसरणी तयार होणे ही भविष्याची गरज आहे. एकविसावे शतक हे ज्ञानाधिष्ठित व तंत्रज्ञानाचे युग आहे. आधुनिक जगात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यासाठी सततच्या संशोधनातून, पेटंटद्वारे नवनवीन गोष्टी जगाला देणारी राष्ट्रे जगावर अधिसत्ता गाजवितात, ही शिकवण आपल्याला देणार्‍या डॉ. एपीजे अब्दुल कलामांनी २०२० साली भारत एक प्रगत आणि संपन्न राष्ट्र बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याला सत्यात उतरावयाचे असल्यास तरुण पिढीला शिक्षणासोबत स्वत:हून असे विचार करण्यास व ते सत्यात उतरविण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. आधुनिक युगात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संशोधन क्षेत्रात इनोव्हेशनची संकल्पना राबवायला हवी. 

‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्याची गरज

इनोव्हेटिव्ह किंवा नाविन्यपूर्ण संकल्पनेत नवीन सृजनाची शक्ती असते. ईन्होव्हेशन, इनक्युबेशन व स्टार्टअप ही त्रिसूत्री आज जगभर राबविली जात आहे. त्यातून नवीन पेटंटस्, उद्योग निर्माण होताहेत. आपण या संकल्पनांपासून खूप दूर आहोत. वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर परिषद २०२० च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘भारतात राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाचा उद्देश विज्ञानाविषयी कुतूहल, जिज्ञासा जागी करणे हा आहे. संशोधन आणि नवोन्मेषांला प्रोत्साहन देणारे हे धोरण आहे. या मुक्त आणि व्यापक दृष्टीकोनाच्या शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि नैपुण्य बहरेल’. भारतात नाविन्यपूर्ण संशोधनाचे बीज रोवण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. भारत या युवकांचा देश आहे कारण भारतातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास दोन तृतियांश लोकसंख्या कार्यक्षम वयोगटात मोडते. या युवावर्गाला योग्य दिशा देण्याचे कार्य जनजागृतीतून करायला हवे. लहानमुलं व युवका-युवतींमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, यासाठी गीतांजलीपासून प्रेरणा घ्यायला हवी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍यांची ती खरी रोल मॉडेल आहे. शालेय व महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींनो आपणही केवळ पास होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त टक्के मिळविण्यासाठी स्पर्धा न करत नवीन काहीतरी शिकण्यासाठी स्पर्धा करावी. यासाठी ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्याची गरज आहे. म्हणतात ना, ‘विनर्स डोन्ट डू द डिफरन्ट थिंग्ज, दे डू द डिफरटंली’. 

Post a Comment

Designed By Blogger