निवडणूक टाळा; २१ लाख जिंका!

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या आणि मुदत संपलेल्या जळगाव जिल्ह्यास राज्यात सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे आतापासूनच गावागावात निवडणुकीच्या रणधुमाळीचे नगारे वाजू लागले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची असते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर लढविल्या जात नसल्या तरीही तेथे राज्यातील राजकारणापेक्षा थोडेसे वरचढ राजकारण पहायला मिळते. राज्याच्या राजकारणात स्थानिक वर्चस्वासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला फार महत्व असते. केंद्रीय वित्त आयोगाकडून थेट निधी मिळू लागल्याने ग्राम पंचायतीच्या अर्थकारणाला महत्त्व आले आहे. या ग्रामपंचायती ताब्यात असणे हे जसे राजकियदृष्ट्या महत्वाचे आहे तसेच आर्थिकदृष्ट्याही नाड्या हातात येण्यासारखे आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत ईर्षा, मानमानाच्या राजकारणात वादविवाद विकोपाला जातात. याचा परिणाम गावाच्या विकासावर देखील होतो. गावातील एकोपा टिकून राहावा, यासाठी शिवसेनेचे पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी बिनविरोध निवडणूक करणार्‍या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २१ लाखांचा विकासनिधी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे याची चर्चा तर होणारच!



ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकशाहीचा पाया

ग्रामपंचायती ग्रामविकासाचा पाया तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकशाहीचा पाया आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही उमेदवार राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढत नसला तरी राजकीय पक्षांचा निवडणुकीत शिरकाव असतोच. स्थानिक राजकारणामुळे भाऊबंदीच्या वादासह राजकीय तणाव विकोपाला जातो. निवडणुकीत अनेकदा एकाच घरातील किंवा मैत्रीपूर्ण संबंध असलेले एकमेका विरोधात उभे असतात. यामध्ये अनेकांनी कायमचे शत्रुत्व ओढवूनही घेतले जाते. परिणामी गावातील निकोप वातावरण गढूळ होवून गावच्या विकासाला काही प्रमाणात का होईना खीळ बसते, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. निवडणुकीनंतर सुद्धा समर्थक-विरोधक नियमित एकमेकांसमोर येवून ठाकतात. अनेकदा फक्त विरोधाला विरोध होत असतो. निवडून आलेले उमेदवार हे ‘सर्वमताचे नसून बहुमताचे’ असल्याने ग्रामसभेत फक्त गदारोळ होतो. कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा होत नाही. विषय निकाली लागले जात नाही. हे सर्व टाळण्यासाठी बिनविरोध निवडणूक हाच एक मार्ग आहे. महाराष्ट्रातील हिवरेबाजार आणि इतर काही आदर्श गावांना ‘आदर्श’ होण्यासाठीच्या कारणापैकी तिथे बिनविरोध निवडणूक पार पाडली जाते हेच आहे. बिनविरोध निवडून दिलेल्या ग्रामपंचायतीवर कुठल्याही राजकीय पक्षांचे लेबल न लागल्यामुळे सर्वच विचारांच्या, पक्षांच्या लोकांना तो जवळचा वाटतात. यामुळे केवळ विरोधाला विरोध न होता खेळीमेळीच्या व विश्‍वासार्ह वातावरणात चर्चा व निर्णय होतात. सध्या कोरोनाच्या काळात कितीही राजकारण करायचे नाही असे म्हटले तरीही सत्ताधारी किंवा विरोधक यांचा पिंडच राजकिय असल्याने त्यांच्याकडून प्रत्येक बाबतीत राजकारण केले जाणे हे ओघानेच आहे. मात्र यालाही काही अपवाद आहेतच. 

चिमणराव पाटील यांचा प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आ. निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांना दिले आश्वासन आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही याकामी पुढाकार घेतला आहे. यातही जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा होतेय ती पारोळा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची! निवडणुकीत गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. दुसरीकडे निवडणुकीत वादविवाद होत गावातील एकोप्याला गालबोट लागते. प्रशासनावर ताण येतो. हे प्रकार टाळून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. निवडणुकीवर शासनाचा होणारा खर्च टळावा यासाठी शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी बिनविरोध निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी २१ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. एरंडोल विधानसभा क्षेत्रात बिनविरोध होणार्‍या ग्रामपंचायतींना स्थानिक आमदार निधी कार्यक्रम व इतर योजनांमधून हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा बिनविरोध निवडणुकीसाठी घोषणा झाली आहे. चिमणराव पाटील यांचा हा प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य म्हणावा लागेल. आता त्यांच्या प्रयत्नांना सर्वांची साथ मिळणे गरजेचे आहे. 

ग्रामाविकासाठी बिनविरोध निवडणूक महत्वाची 

हा प्रयोग केवळ खान्देशात अनेक ठिकाणी राबविणे शक्य आहे. त्यासाठी केवळ अपेक्षा आहे ती लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची. धुळे- २१८, जळगाव जिल्ह्यात ७८३, नंदुरबार- ८७ तर धुळे जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. या सर्व ठिकाणी आमदार चिमणराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेवून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गावाचा एकोपा कायम राहण्यासाठी वादाच्या आणि मनभेदाच्या वळणावर घेऊन जाणारी ही निवडणूक सामोपचाराने आणि एकत्र बसून बिनविरोध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. निवडणूक बिनविरोध पार पडल्यास, ग्रामविकासाच्या कामामध्ये लोकसहभाग वाढून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम पार पाडले जाऊ शकतात, ग्रामसभेत फक्त विरोधाला विरोध नाही, तर चर्चा होऊ शकते. ग्रामसभेतील नागरिकांचा सहभाग वाढू शकतो, गावातील राजकारणापासून दूर राहू इच्छिणार्‍या पण समाजाला हात भार लाऊ शकणार्‍या समाजसेवी लोकांचा ग्रामविकासाच्या कामात सहभाग वाढू शकतो, राजकीय चिखलफेकी ऐवजी गावातील स्वच्छता, शिक्षण, शेती, पाणी, ग्रामोद्योग, प्रशासन, आरोग्य, खेळ, उपजीविका, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन इत्यादी महत्वाच्या विषयांना महत्व मिळेल, गावातील शांतता, एकजूट, लोकसहभाग आणि ग्रामाविकासाठी बिनविरोध निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने गावातील सुज्ञ नागरिक व युवांनी या बिनविरोध निवडणुकीसाठी नक्की प्रयत्न करावा. 

Post a Comment

Designed By Blogger