दिवाळी सुट्यांचा गोंधळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. याचे उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. शिक्षण विभागाने १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत पाच दिवस ऑनलाईन वर्गाला दिवाळीच्या सुट्या जाहीर केल्या आहेेत. मात्र काही शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत १८ दिवस सुट्ट्या देण्याची मागणी केली आहे. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्यांमध्येही ऑनलाईन वर्ग सुरु होते, असा युक्तीवाद संघटनांनी केला आहे. शिक्षक संघटनांच्या या भुमिकेवर पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ऑनलाईन शिक्षण नावापुरताच मर्यादित आहे. याबाबतीत शिक्षणविभागाचे धोरण म्हणजे एक ना धड भाराभार चिंध्या, असे आहे. त्यात आता काही शिक्षक संघटनांच्या आडमुठे धोरणाची भर पडली आहे.


आठ महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद

कोरोना लॉकडाऊनमुळे मागील आठ महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. आता घरी राहून विद्यार्थीही कंटाळले आहेत. अशावेळी शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. तर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. या विषयावरुन शिक्षक संघटनांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात मिशन बिगिन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यानंतर शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी आणि नियमित वर्गांसाठी बंद राहतील मात्र ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण, दूरस्थ शिक्षण सुरू करण्याासाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण, दूरस्थ शिक्षण, टेलिकाऊंसलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणार्‍या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाईन, ऑफलाईन, दुरस्त शिक्षण संस्थाशी संबंधित कामांसाठी तातडीने कामावर रुजू व्हावे असे सरकारने सांगितले आहे. मात्र महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्य सरकारांनीही ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे काही राज्यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्वकाही सुरळीत व्हायला २०२१ हे साल उजाडण्याची शक्यता 

आसाममध्ये प्राथमिक शाळा वगळता सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था उघडण्यात आल्या आहेत. उत्तराखंडमध्ये दोन नोव्हेंबरपासून शाळा उघडल्या आहेत. मात्र केवळ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाच शाळेत बोलावले आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी त्यांना प्राधान्याने शाळेत बोलावले आहे. हिमाचल प्रदेशातही दोन नोव्हेंबर पासून शाळा उघडल्या आहेत. येथे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले आहे. कोविड-१९ च्या गाइडलाइन्सचे सक्तीने पालन करण्यास सांगितले आहे. आंध्र प्रदेश सरकारनेदेखील दोन नोव्हेंबर पासून शाळा सुरू केल्या आहेत. मात्र येथे एक दिवसाआड शाळा सुरू राहणार आहेत. म्हणजेच महिन्यातील १५ दिवस शाळा बंद असतील. एका वेळी एका वर्गात केवळ १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी दिली गेली आहे. हरयाणा तसेच राज्यात कॉलेज आणि विद्यापीठे १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. ओडिशामध्ये देखील शाळा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तामिळनाडूत दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या जातील का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सर्वकाही सुरळीत व्हायला २०२१ हे साल उजाडण्याची शक्यता आहे. 

विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागतात मात्र यंदा चित्र थोडेसे उलट आहे. सहा महिन्यांपासून घरी असलेल्या मुलांना आता वेध लागले आहेत ते शाळेचे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच प्रश्न त्या सर्वांच्या तोंडी सामावला आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे, यात कुणाचेही दुमत नाही. आपल्याकडे मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक शाळांनी स्वीकारला आहे. मात्र ही व्यवस्था शहरांमधील मोठ्या शाळांपुरती मर्यादित आहे. बर्‍याच ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षण रखडले आहे. दुसरीकडे आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मागील चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये, म्हणून सरकारच्या परवानगीने शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. या वर्षाच्या शैक्षणिक वाटचालीत एप्रिल, मे मधील सर्व वर्गाच्या वार्षिक परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. १५ जूनपासून दरवर्षीच्याच शिरस्त्यानुसार शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचे नियोजन झाले, मात्र हे करीत असताना पहिले ते बारावीपर्यंतचे आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. नुकतेच अकरावीचे वर्गही ५ ऑक्टोबरपासून ऑनलाईन सुरु करण्यात आले आहेत. १५ जुलैपासून बारावीचे ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहे. यात २०२१ ची बोर्ड परीक्षा नेमकी कधी घेण्यात येईल याबाबतचे नियोजन नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर सध्या अनेक प्रश्नांची मालिका उभी आहे. या गोंधळात अजून भर पडली आहे ती दिवाळीच्या सुट्यांवरुन सुरु असलेल्या निरर्थक वादाची. आधीच आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, ही बाब मान्य केली तरी महाराष्ट्रातील ऑनलाईन शिक्षणावर अनेक मर्यादा आहेत. सध्या काहीच पर्याय नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. याकाळात शिक्षक किंवा शिक्षक संघटनांचे फारसे नुकसान झाले नसले तरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व आताही होत आहे. यामुळे दिवाळी सुट्यांच्या वादाचे हसू होवू नये, याची काळजी शिक्षक संघटनांनी घेण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger